मुख्य परीक्षा पेपर एक – भाषा
राज्यसेवा मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै, २०१९ दरम्यान प्रस्तावित आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै, २०१९ दरम्यान प्रस्तावित आहे. एकूण ८०० गुणांसाठी सहा पेपर मुख्य परीक्षेमध्ये विहित करण्यात आले आहेत. या लेखापासून या पेपर्सची अभ्यास पद्धती कशी असावी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.
मुख्य परीक्षेमध्ये पारंपरिक व वस्तुनिष्ठ असे दोन वेगवेगळे पेपर असे भाषा घटकाचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. पारंपरिक पेपर १०० गुणांसाठी तीन तासांत तर वस्तुनिष्ठ पेपर १०० गुणांसाठी एका तासात सोडवायचा आहे. दोन्ही पेपरमध्ये मराठी व इंग्रजी या दोन भाषांसाठी निम्मे निम्मे गुण व प्रश्न असतात.
प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषा वापरल्या जातात. या दोन भाषा महाराष्ट्राच्या राजभाषा (official languages) आहेत. त्यांचे आकलन आणि वापर करण्याची क्षमता या पेपर्सच्या माध्यमातून तपासली जाते. उमेदवाराची विचार-प्रक्रिया, अभिव्यक्ती, लेखनाचे कौशल्य इ. गोष्टी जोखण्यासाठी पारंपरिक भाषा पेपरमध्ये निबंधाचा घटक योजण्यात आला आहे. तर उमेदवाराची आकलनक्षमता, अभिवृत्ती, भाषिक कौशल्ये तपासण्यासाठी सारांश लेखन आणि भाषांतर या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
हा पेपर १०० गुणांसाठी आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या (१२ वीच्या) समकक्ष असेल असे आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केले आहे. या पेपरच्या मराठी व इंग्रजी भागासाठी वेगवेगळ्या उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे लिहायची आहेत. निबंध २५-२५ गुण, भाषांतर १५-१५ गुण व सारांश लेखन १०-१० गुण अशी प्रत्येक भाषेसाठीची गुणविभागणी आहे.
निबंध लेखन
निबंध हा सर्वात जास्त गुण असलेला प्रश्न आहे. दोनपकी एका विषयावर निबंध लिहायचा असल्याचे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. निबंध लेखनास कधीही थेट सुरुवात करू नये. कच्च्या पानावर आधी सुचतील ते मुद्दे मांडावेत. त्यानंतर त्यांचा क्रम ठरवून मग प्रत्यक्ष लेखन करावे. वैचारिक, समस्याधारित निबंधात विषयाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आíथक व इतर काही संबंधित पलू विचारात घ्यावेत. साधारणपणे १० ते १२ मुद्दे निवडून त्यांचा क्रम ठरवून घ्यावा. परिणामकारक सुरुवात करण्यासाठी सुविचार, कविता इ. चा वापर करता येईल. सुरुवातीनंतर ठरलेल्या क्रमाने थोडक्यात मुद्दे मांडावेत व एका Conclusion ने शेवट करावा. विषयाच्या दोन्ही बाजू मांडता आल्या तर उत्तम. मात्र तुमचे मत म्हणून जेव्हा एखादा निष्कर्ष किंवा तात्पर्य मांडायचे असेल तेव्हा ते एकांगी किंवा हट्टाग्रही असू नये. कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेच्या अतिशयोक्त भराऱ्या असू नयेत. ‘कल्पना’सुद्धा तर्कशुद्ध असायला हव्यात. असे निबंध शालेय पद्धतीने मांडले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे विचारांचे गांभीर्य टिकविणे खूप आवश्यक आहे.
भाषांतर
इंग्रजीतून मराठी भाषांतर करताना वाक्यरचना एकदम कृत्रिम होण्याची शक्यता असते. तेव्हा आधी वाक्य व्यवस्थित वाचून त्याचा भावार्थ समजून घ्यावा आणि मग त्याचे मराठी वाक्य लिहावे. आधी मनातल्या मनातच वाक्याचा भावार्थ ज्या भाषेत उत्तर लिहायचे आहे त्या भाषेत उच्चारला की हे सोपे होऊन जाते. इंग्रजी व मराठी भाषेच्या वाक्यरचनेमध्ये मूलभूत फरक आहे. हे व्यवस्थित समजून घ्यायला हवे. काही वेळेला एखाद्या शब्दाला प्रतिशब्द आठवला नाही तर अशा वेळी त्या प्रतिशब्दासाठी अडून बसण्यापेक्षा वाक्याचा भावार्थ नीट मांडला जाईल, अशी वाक्यरचना करावी. मात्र प्रत्येक वेळी असा पाल्हाळीक अनुवाद करण्याचे टाळावे.
सारांश लेखन
दिलेल्या उताऱ्यातील एकूण शब्दसंख्या उजव्या कोपऱ्यात दिलेली असते आणि सारांश उताऱ्याच्या १/३ इतक्या शब्दमर्यादेत व स्वत:च्या शब्दांत लिहिणे अपेक्षित असते. उत्तरपत्रिकेत या प्रश्नासाठी टेबलच्या स्वरूपात वेगळे पान दिलेले असते व प्रत्येक चौकोनात एकच शब्द लिहायचा असतो. त्यामुळे टेबलच्या किती ओळींमध्ये तुमचा सारांश पूर्ण होईल, हे लक्षात येते. संपूर्ण उतारा वाचत बसण्यापेक्षा सरळ पहिला परिच्छेद वाचून त्याचा सारांश लिहावा. मग पुढच्या परिच्छेदाचा सारांश असे करत गेल्यास वेळेची बचत होते. सारांश लिहिताना उताऱ्यातील quotations, उदाहरणे इ. आधी वगळून टाकावी फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा. त्यावरून योग्य व कमीत कमी शब्दयोजना करत सारांश लिहावा पण स्वत:चे मतप्रदर्शन टाळावे. अतिरीक्त स्पष्टीकरण देत बसू नये. विचारले असेल तर छोटेसे समर्पक शीर्षक द्यावे.
First Published on June 5, 2019 1:45 am
Web Title: official languages main examination paper
No comments:
Post a Comment