Friday, July 5, 2019

विद्यापीठ विश्व : प्रयोगशाळांची पंढरी संस्थेमध्ये किंवा संस्थेशी संलग्न अशा एकूण साडेतीनशे प्रयोगशाळा आहेत.

विद्यापीठ विश्व : प्रयोगशाळांची पंढरी

संस्थेमध्ये किंवा संस्थेशी संलग्न अशा एकूण साडेतीनशे प्रयोगशाळा आहेत.

ईपीएफएल, लोसान, स्वित्र्झलड
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
संस्थेची ओळख – स्वित्र्झलडमधील एकोल पॉलिटेक्निक फेडरल दे लोसान म्हणजेच ईपीएफएल विद्यापीठ हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले बाविसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. स्वित्र्झलडमधील अत्यंत महत्त्वाच्या अशा स्वीस फेडरल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या शासकीय संस्थेच्या दोन शाखांपैकी ईपीएफएल ही एक आहे. ईपीएफएल हे विज्ञान-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयांमध्ये गुणात्मक संशोधन-अध्यापन करणारे एक प्रतिथयश शासकीय विद्यापीठ आहे. गतवर्षीच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्येही या संस्थेने बारावा क्रमांक पटकावलेला होता. या संस्थेची स्थापना १८५३ मध्ये एक पॉलिटेक्निक स्कूल म्हणून झालेली होती. शिक्षण, संशोधन आणि अभिनवता ही ईपीएफएल संस्थेची ओळख आहे. संशोधन ही या विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांची मूलभूत आवश्यकता आहे. संस्थेमध्ये किंवा संस्थेशी संलग्न अशा एकूण साडेतीनशे प्रयोगशाळा आहेत. पॉलिटेक्निक लोसानमधील १३६ एकरच्या परिसरामध्ये स्थित आहे. संस्थेच्या या मुख्य कॅम्पसमध्ये एकूण ६५ इमारती असून त्यात शैक्षणिक-संशोधन विभाग, ग्रंथालय, निवासी सुविधा, कॅफेटेरिया, लॅबोरेटरीज, रेडिओ, बार, बँक, म्युझियम यांसारख्या महत्त्वाच्या वास्तूंचा समावेश आहे. सध्या संस्थेमध्ये सुमारे चार हजार प्राध्यापक-संशोधकवर्ग आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास दहा हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.
अभ्यासक्रम –  ईपीएफएलमध्ये सर्व शाखांमधील विषयांची उपलब्धता आहे, मात्र विद्यार्थी मूलभूत विज्ञान, स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. संस्थेच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. संस्थेमधील सर्व पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. फ्रेंच आणि इंग्रजी या दोन संस्थेच्या अधिकृत भाषा असल्याने संस्थेतील अभ्यासक्रम या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या संस्थेमध्ये पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात. संस्थेचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सिव्हिल अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअिरग, स्कूल ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड कम्युनिकेशन सायन्सेस, स्कूल ऑफ बेसिक सायन्सेस, स्कूल ऑफ इंजिनीअिरग, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, कॉलेज ऑफ ह्य़ुमॅनिटीज, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी अशा एकूण सात शैक्षणिक-संशोधन विभागांच्या अंतर्गत सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतात. ईपीएफएल संस्थेतील सर्व पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. स्वित्र्झलडमधील एकंदरीत शैक्षणिक अभ्यासक्रमांची संरचना ही विषयांतील आणि संशोधनातील प्रगत ज्ञान, प्रात्यक्षिकांवर असलेला भर आणि प्राथमिक-माध्यमिकसारख्या शालेय स्तरावरही अभ्यासक्रमाचा संशोधनाशी जोडला गेलेला थेट संबंध या तीन अक्षांभोवती फिरत राहते. त्यामुळेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम हे मुख्यत्वे संशोधन अभ्यासक्रम आहेत. संस्थेने  विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, डिप्लोमा, ऑनलाइन व ऑफलाइन असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. संस्थेतील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना या संस्थेत पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी सॅट तर पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेल्या जीआरई/जीमॅट आणि टोफेल या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.
सुविधा – ईपीएफएलने आपल्या परिसरात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीस चालना देण्यासाठी ‘इनोव्हेशन पार्क’ उभारलेला आहे. या पार्कच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स, डिझाइन टेक्नॉलॉजी, एनर्जी, फूड सायन्स इत्यादी विषयांतील अभिनव स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक यांसारखे शक्य ते सर्व पाठबळ दिले जाते. संस्थेकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक साहाय्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही.
वैशिष्टय़
ईपीएफएल ही एक संशोधनासाठी समर्पित असलेली संस्था आहे. शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून अभिनव कल्पनांना नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे. याचाच परिपाक म्हणून संस्थेतून आतापर्यंत जवळपास अडीचशे स्टार्टअप्स तयार झालेली आहेत. २०१७ या एका वर्षांत संस्थेचे एकूण ४२०० शोधनिबंध जागतिक दर्जाच्या संशोधनपत्रिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. संस्थेतून दर महिन्याला सरासरी ३८२ शोधनिबंध प्रकाशित होतात. संस्थेचे बरेचसे माजी विद्यार्थी हे संशोधन आणि उद्योग-व्यवस्थापन क्षेत्रांत कार्यरत आहेत.
संकेतस्थळ –  https://www.epfl.ch/en/home/
First Published on May 28, 2019 3:15 am
Web Title: swiss federal institute of technology lausanne epfl

No comments:

Post a Comment