मानवी हक्क
या लेखामध्ये मानवी हक्क या घटकाबाबत चर्चा करण्यात येत आहे.
या लेखापासून सामान्य अध्ययन पेपर ३ मानव संसाधन विकास व मानवी हक्क या विषयाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. या पेपरचे दोन मुख्य घटक विषय आहेत. ‘मनुष्यबळ विकास’ आणि दुसरा ‘मानवी हक्क.’ आधी ‘मानवी हक्क’ हा घटक समजून घेऊन मग मनुष्यबळ विकास भागाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या लेखामध्ये मानवी हक्क या घटकाबाबत चर्चा करण्यात येत आहे.
- अभ्यासाची सुरुवात मानवी हक्कांची संकल्पना, तिचा इतिहास, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कांची आंतरराष्ट्रीय मानके, युनोची घोषणापत्रे व भारतीय संविधानातील मानवी हक्कांचे प्रतिबिंब या बाबी बारकाईने समजून घेऊन करायला हवी.
- अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या मुद्दय़ांच्या अनुषंगाने संस्था व संघटनांचा वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत – स्थापनेची पार्श्वभूमी, उद्देश व कार्यकक्षा, संस्थापक, बोधवाक्य, मुख्यालय, स्थापनेचे वर्ष, रचना, कार्यपद्धती, ठळक काय्रे, निर्णय, घोषणा, वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, मिळालेले पुरस्कार, संस्थेकडून देण्यात येणारे पुरस्कार, भारत सदस्य/संस्थापक सदस्य आहे का? असल्यास भारतीय सदस्य, संस्थेचे अहवाल व त्यातील भारताचे स्थान.
- वरीलपैकी शेवटचे चार मुद्दे वगळून भारतातील मानव संसाधनामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी संघटनांचा अभ्यास करायला हवा. त्याबरोबर पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. शिफारस करणारा आयोग/ समिती, जबाबदाऱ्या, अधिकार, नियंत्रण करणारे विभाग, खर्चाची विभागणी.
- कुटुंब, शिक्षणसंस्था या औपचारिक व अनौपचारिक संस्थांच्या माध्यमातून मूल्ये व नीतितत्त्वे कशा प्रकारे रुजविण्यात येतात त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. धर्म व प्रसारमाध्यमे यांद्वारे होणारे मूल्यशिक्षण हा चिंतन व विश्लेषणाचा विषय आहे.
- मानवी हक्कांपासून वंचित राहिल्यास कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीला जाणवणाऱ्या समस्या सर्वप्रथम समजून घ्यायला हव्यात. निरक्षरता, बेरोजगारी, दारिद्रय़, हिंसा, शोषण, गुन्हेगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार इत्यादी समस्यांचे मानवी हक्कांच्या संदर्भाने समस्यांचे स्वरूप, त्यांची कारणे, परिणाम, उपाय या मुद्दय़ांच्या आधारे विश्लेषण करणे आवश्यक आहे. याबाबत काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे अहवाल असल्यास त्यांचा आढावा घ्यायला हवा. या अनुषंगानेच जागतिकीकरणामुळे या समस्यांच्या स्वरूपामध्ये, तीव्रतेमध्ये होणाऱ्या परिणामांबाबत वृत्तपत्रे, टीव्ही, इंटरनेट, इ. माध्यमांतून होणारी विश्लेषणात्मक चर्चासुद्धा पाहायला हवी.
- अभ्यासक्रमामध्ये महिला, बालके, युवक, वृद्ध, अपंग व्यक्ती, सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्ग, आदिम जमाती, कामगार, व आपत्तीग्रस्त/ प्रकल्पग्रस्त व्यक्ती असे व्यक्तिगट स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत व त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्यक्तिगटांची वैशिष्टय़े व त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, व्याख्या इत्यादी व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.
- त्यानंतर या व्यक्तिगटांच्या समस्यांचा मुद्देसूद अभ्यास सुरू करायला हवा. सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती/जमाती, भटक्या/विमुक्त जमाती, इतर मागास प्रवर्ग या सामाजिक घटकांचा स्वतंत्र व समांतरपणे अभ्यास आवश्यक आहे. या सामाजिक घटकांबाबत राज्यघटनेमध्ये असलेल्या तरतुदींचा नोट्समध्ये समावेश करावा व हे संदर्भ इतर विश्लेषणात्मक मुद्दय़ांचा अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवावेत.
- या प्रत्येक व्यक्तिगटासाठी शैक्षणिक, आíथक, सामाजिक इत्यादी प्रकारच्या समस्यांचा अभ्यास समस्येचे स्वरूप, कारणे, परिणाम, उपाय, संबंधित संस्था, संघटना, आयोग, राबविण्यात येणाऱ्या योजना अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.
- उपायांचा विचार करताना विविध कायदे, शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय संस्था व त्यांचे प्रस्ताव तसेच घोषणा व करार यांचा समावेश करायला हवा.
- शासकीय योजनांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावेत. शिफारस करणारा आयोग /समिती, उद्देश, योजनेबाबतचा कायदा, योजनेचा कालावधी, स्वरूप व बारकावे, लाभार्थ्यांचे निकष, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी यंत्रणा, योजनेचे मूल्यमापन. मूळ कायदे वाचून त्यातील महत्त्वाच्या तरतूदींच्या नोट्स काढणे बहुविधानी प्रश्न सोडविण्यामध्ये उपयोगी ठरते.
- या पेपरमधील काही कायदे पेपर २ मध्येही समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांचा एकत्रित अभ्यास उपयोगी ठरेल. पेपर ४ मध्ये पंचवार्षकि योजनांचा अभ्यास करताना या व्यक्तिगटांशी संबंधित कार्यक्रम, योजना किंवा धोरणाचा समावेश असेल तर त्या पंचवार्षकि योजनेचा संदर्भ देऊन त्या कार्यक्रम / योजना किंवा धोरणाचा त्या त्या व्यक्तिगटासाठीच्या नोट्समध्ये समावेश करावा.
- मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास या दोन्ही क्षेत्रांशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, त्यांचे स्वरूप, पुरस्कार मिळविणाऱ्या व्यक्ती / संस्था या बाबी पाहणेही आवश्यक आहे.
- ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदींचा अभ्यास आवश्यक आहे. या कायद्याच्या अनुषंगाने ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंच /संस्थांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करावा संस्थेतील विविध पातळ्या, प्रत्येक पातळीवरील मंचाची रचना, प्रत्येक पातळीवरील मंचाची कार्यपद्धती, प्रत्येक पातळीवरील मंचाचे अधिकार, जबाबदाऱ्या, काय्रे इत्यादी. या संपूर्ण अभ्यासामध्ये प्रत्येक उपघटक / सामाजिक व्यक्तिगटाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
First Published on June 12, 2019 2:01 am
Web Title: human rights
No comments:
Post a Comment