प्रश्नवेध यूपीएससी : प्राचीन व मध्ययुगीन भारत
आजच्या भागात प्राचीन व मध्ययुगीन भारत या घटकासंबंधीचे प्रश्न पाहू या. हा यूपीएससी पूर्वपरीक्षेतील महत्त्वाचा भाग आहे.
(संग्रहित छायाचित्र)
मागील लेखात आपण ‘आधुनिक भारत’ या विषयावर चर्चा केली. आजच्या भागात प्राचीन व मध्ययुगीन भारत या घटकासंबंधीचे प्रश्न पाहू या. हा यूपीएससी पूर्वपरीक्षेतील महत्त्वाचा भाग आहे.
* प्र. १) ह्युएन त्संगसंदर्भात खालील विधानांचा विचार करा.
१) नरसिंहवर्मन पहिला याच्या कारकीर्दीत त्याने पल्लवांची राजधानी कांचीपुरमला भेट दिली.
२) कांचीमध्ये १०० बौद्धविहार असून त्यात १० हजार भिक्खू राहतात असे तो वर्णन करतो.
यापैकी कुठले/कुठली विधान/ विधाने योग्य आहे/आहेत?
पर्याय :
अ) फक्त १ ब) फक्त २
क) १ व २ दोन्हीही
ड) १ व २ दोन्हीही नाही.
उत्तर : क) १ व २ दोन्हीही.
स्पष्टीकरण : ह्युएन त्संग हा भारताला भेट देणारा चिनी प्रवासी होता. भारतातील १७ वर्षांच्या प्रवासामुळे तो प्रसिद्ध आहे. त्याचे लिखाण तत्कालीन भारतातील राजकीय, सामाजिक, आíथक आणि धार्मिक परिस्थितीवर चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकते. नरसिंहवर्मन पहिला याच्या कारकीर्दीत त्याने पल्लवांची राजधानी कांचीपुरमलाही भेट दिली. भव्य, सुंदर तसेच चांगले शिक्षण केंद्र असे तो या शहराचे कौतुक करतो.
* प्र. २) खालीलपैकी कुठला ग्रंथ कालिदासाने लिहिलेला नाही?
पर्याय :
अ) मालविकाग्नीमित्र
ब) विक्रमोर्वासीय
क) दारिद्रय़-चारुदत्त
ड) कुमारसंभव
उत्तर : क) दारिद्रय़-चारुदत्त
स्पष्टीकरण : चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारातील नवरत्नांमध्ये कालिदास ही सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती होती. ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’, ‘ऋतुसंहार’ आणि ‘मेघदूत’ यासारखी महाकाव्ये त्याने लिहिली. दारिद्रय़-चारुदत्त हे नाटक कालिदास याने लिहिलेले नसून भास याने लिहिले आहे.
* प्र. ३) मौर्य व गुप्त राज्यव्यवस्थांमधील फरकांबाबत खालीलपैकी कुठले विधान योग्य नाही?
अ) मौर्यानी आपल्याकरिता महाराजाधिराज हे नामाभिधान घेतले.
ब) मौर्य व्यवस्थेमध्ये नोकरशाही व्यवस्था मोठय़ा प्रमाणात होती. तर गुप्त राज्यव्यवस्थेत नोकरशाहीमध्ये घट झाली होती.
क) मौर्य काळात एखादी व्यक्ती जिवंत असेपर्यंतच संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती अबाधित असे. तर गुप्त काळात अधिकाऱ्यांची वारसाहक्काप्रमाणे नेमणूक होई.
ड) मौर्य राज्यकर्त्यांनी अर्निबध सत्ता उपभोगली. तर सामंतव्यवस्थेमुळे गुप्तांची सत्ता मर्यादित राहिली.
उत्तर : अ) फक्त पहिले विधान चुकीचे आहे. मौर्यानी नव्हे तर गुप्तांनी महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक यासारखी बिरुदे आपल्यासाठी घेतली.
* प्र. ४) गुप्त काळातील प्रशासकीय विभाजनाबाबत खालीलपैकी कुठला क्रम योग्य आहे ?
पर्याय :
अ) विषय-भुक्ती-विथी-ग्राम
ब) विथी-भुक्ती-विषय-ग्राम
क) भुक्ती-विषय-विथी-ग्राम
ड) भुक्ती-विथी-विषय-ग्राम
उत्तर : क) भुक्ती-विषय-विथी-ग्राम
स्पष्टीकरण : गुप्त साम्राज्य भुक्तींमध्ये विभागलेले होते. प्रत्येक भुक्ती उपरिकाच्या नियंत्रणाखाली होती. भुक्तींचे विभाजन विषयांमध्ये करण्यात आले होते. विषयांचे विभाजन विथींमध्ये करण्यात आले होते. विथी गावांमध्ये विभागलेल्या होत्या.
* प्र. ५) कांस्यपाषाण संस्कृतीसंदर्भात खालीलपैकी कुठली विधाने योग्य आहेत?
१) कांस्यपाषाण संस्कृती वायव्य भारत आणि गंगेच्या खोऱ्यापुरतीच मर्यादित होती.
२) दगड आणि तांब्याच्या हत्यारांनी ओळखला जाणारा हा ग्रामसमाज होता.
३) त्यांची अर्थव्यवस्था पूर्णत: शेतीवर आधारलेली होती.
४) ते भाजलेल्या विटांच्या घरात राहात.
पर्याय :
१) १,२,३ ब) ३,४
क) २,३ ड) यापैकी नाही.
उत्तर : ड) वरीलपैकी नाही.
स्पष्टीकरण : कांस्यपाषाण संस्कृतीसंदर्भात केलेली सर्व विधाने चुकीची आहेत. देशाच्या उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व आणि दक्षिण भागात या संस्कृतीचे पुरावे आढळले आहेत. लोह आणि तांब्याच्या हत्यारांनी ओळखला जाणारा हा ग्रामसमाज हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य नसणारा समाज होता. त्यांची अर्थव्यवस्था हडप्पा संस्कृतीप्रमाणे पूर्णत: शेतीवर आधारलेली नव्हती. तर निर्वाहापुरत्या शेतीवर होती. त्यांची घरे आयताकृती आणि गोलाकार असून ती मातीच्या भिंती व गवताच्या छपरांनी बनलेली होती.
* प्र. ६) सातवाहन राजवटीबाबत खालीलपैकी कुठली विधाने योग्य आहेत?
१) सातवाहन राजवट मातृप्रधान सामाजिक व्यवस्थेकडे निर्देश करते.
२) पगाराच्या बदल्यात सातवाहनांनी आपल्या अधिकाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर जमिनी दिल्या.
३) अजिंठा व वेरुळच्या लेण्यांना सातवाहनांनी आश्रय दिला.
४) सातवाहनांचे सर्व शिलालेख प्राकृत भाषा व ब्राह्मी लिपीत आहेत.
५) सातवाहन राजा हल याने गाथासप्तशती/गाथासत्तासाई हा प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिल्याचे मानले जाते.
पर्याय :
अ) १,३,४,५ ब) १,४,५
क) १,२,५ ड) सर्व योग्य आहेत.
उत्तर : ब) १,४,५
स्पष्टीकरण : दुसरे विधान चुकीचे आहे. ब्राह्मण व बौद्ध भिक्खूंना करमुक्त जमिनी देण्याची प्रथा सातवाहनांनी सुरू केली. परंतु अधिकाऱ्यांना पगाराच्या बदल्यात जमिनी देण्याची प्रथा गुप्तकाळात सुरू झाली. गुप्त काळानंतर या प्रथेचा विस्तार झाला. तिसरे विधानही चुकीचे आहे. सातवाहनांनी कार्ला, भाजे, अमरावती, नागार्जुनकोंडा इथल्या लेण्यांना आश्रय दिला. अजिंठा व वेरुळनंतरच्या काळातील आहेत.
* प्र. ७) मंदिर वास्तुकलेतील पंचायतन शैली सगळ्यात अगोदरचे उदाहरण खालीलपैकी कोणते?
पर्याय :
अ) दशावतार मंदिर
ब) कांडरीय महादेव मंदिर
क) लिंगराज मंदिर
ड) महाबोधी मंदिर
उत्तर : अ) दशावतार मंदिर
स्पष्टीकरण : पंचायतन शैलीच्या मंदिरात मुख्य गाभारा चार उपगाभाऱ्यांनी वेढलेला असतो. दिलेले सगळे पर्याय हे दशावतार शैलीची उदाहरणे आहेत. परंतु देवगढचे दशावतार मंदिर हे या शैलीचे सगळ्यात सुरुवातीचे उदाहरण आहे.
First Published on May 4, 2019 12:20 am
Web Title: ancient and medieval india
No comments:
Post a Comment