निबंध लेखन वैचारिक प्रक्रिया आणि स्पष्टता
आजच्या लेखात आपण अधिक बारकाव्यांसह निबंध लिखाणाबद्दलची चर्चा करणार आहोत.
आजच्या लेखात आपण अधिक बारकाव्यांसह निबंध लिखाणाबद्दलची चर्चा करणार आहोत. कुठल्याही विषयावर निबंध लिहीत असताना एकाच प्रकारे लिहिला जाऊ शकत नाही. विविध व्यक्ती एकच विषय विविध प्रकारे हाताळताना दिसतात, तर अनेकदा एकच व्यक्ती एक विषय विविध पद्धतीने सक्षमपणे मांडत असते, असेही दिसते. मग अशा वेळेस, आपण निवडलेली मांडणी आणि मुद्देच आपण का निवडले? याचे काही एक स्पष्टीकरण निबंध लिहीत असतानाच दिले तर लिखाण अधिक परिपूर्ण होते. त्याचबरोबर आपले म्हणणे हे केवळ माहिती आणि तथ्ये (facts) यांची जंत्री न उरता, त्यामध्ये युक्तिवाद असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे लिखाण सरावानेही जमते. त्यासंबंधी अजून चर्चा आपण करणार आहोत.
मुद्देसूदपणा आणि अचूकता हेदेखील चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे निकष मानले जातात. अशा लिखाणाने युक्तिवाद अधिक ठळकपणे पुढे येतात. तसेच १०००-१२०० शब्दांत व्यापक विषयावर चर्चा पूर्ण करण्यासाठी जी शिस्त लेखनामध्ये आवश्यक असते, तीदेखील येते.
१) युक्तिवादात्मक दावा (Arguable Claim) – तुम्ही मांडत असलेले ठाम मत युक्तिवादात्मक असावे. तसेच हे मत मांडत असताना तुमचे लेखन त्या विषयावरील अधिक बारकावे व खोली असणाऱ्या चच्रेचा भाग होऊ शकते असे असावे. आपले मत युक्तिवादात्मक आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता, आपल्या मताच्या विरुद्ध मताचे समर्थन केले जाऊ शकते का? असा विचार केला पाहिजे. जर का आपण मांडत असलेल्या मुद्यांच्या विरोधी कोणतेही मत अथवा युक्तिवाद शक्य नसेल तर, आपला मुद्दा केवळ ‘माहिती’ असण्याची शक्यता आहे.
अ-युक्तिवादात्मक (non-arguable) – संगणक हे कामकाज सांभाळण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. तसेच माहितीच्या देवाणघेवाणीसाठी अतिशय उपयुक्त असे साधन आहे. (याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. म्हणूनच हे विधान म्हणजे केवळ माहिती आहे.)
युक्तिवादात्मक (arguable) – संगणकाच्या अतिवापरामुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते. तसेच घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणाचे हे एक कारण असू शकते. (विविध माहिती व आकडेवारी सादर करून वरील विधानाचे समर्थन केले जाऊ शकते. तसेच वरील विधान असत्य मानणे व त्या बाजूने युक्तिवाद करणे शक्य असू शकते.)
२) मुद्देसूदपणा व अचूकता – तुम्ही लिहीत असलेल्या मतांवरून सार्वत्रिक निष्कर्ष काढणे टाळा. खूप व्यापक मुद्यांना किंवा सामाजिक प्रश्नांना हात घालण्याआधी आपल्याकडे आवश्यक अचूक माहिती आहे का? याचा विचार करा.
अचूकतेचा अभाव – आपण कोणत्याही परिस्थितीत अन्नसुरक्षा विधेयक मंजूर होऊ देता कामा नये. (हे विधान नुसतेच मूल्यात्मक कल दर्शवणारे आहे. अशा प्रकारचा कल असण्यामागील कारण अथवा युक्तिवाद करण्यामागील भूमिका अचूकपणे मांडलेली नाही.)
अचूक विधान – अन्नसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने देशातील अन्नधान्य वितरण व्यवस्थेवर प्रचंड ताण येणे साहजिक आहे. याकरिता देशातील यंत्रणा सक्षम नाहीत. तसेच अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांचा योग्य आढावा घेतल्याशिवाय असे विधेयक मंजूर होऊ देणे योग्य नाही. (वरील मांडणीमध्ये मूळ मुद्याबरोबर तशा मतापर्यंत येण्यासाठी आवश्यक कारणे दिलेली आहेत. म्हणूनच वाचणाऱ्यालासुद्धा अधिक स्पष्टपणे एकंदर युक्तिवादाची भूमिका कळते.)
यादीरूपात मुद्यांची मांडणी करणे टाळावे.
तुमच्या निबंधामध्ये अनेक प्रमुख मुद्दे येणार असतील तरी ते सर्व मुद्दे यादी रूपात मांडू नयेत. अशा प्रकारची मांडणी केल्याने लेखन उथळ व वरवरचे वाटते. समजा अन्नसुरक्षा विधेयकाविरोधात मांडण्यायोग्य ६-७ वेगवेगळी कारणे तुम्हास माहीत आहेत. परंतु इतके विस्तारपूर्ण लिखाण करण्याचा हेतू बाळगला तर विविध मुद्यांना नुसते स्पर्शून पुढे जावे लागते. या ऐवजी कोणतीही २-३ महत्त्वाची कारणे निवडून त्याबद्दल अधिक बारकाईने लेखन करणे जास्त योग्य आहे. विविध मुद्यांच्या मोठमोठय़ा याद्या केल्याने त्या मुद्यांचे गांभीर्य कमी होते. तसेच यादीत दिलेल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला पुरेशी माहिती असतेच असे नाही. जास्त शब्दमर्यादा असलेला निबंध लिहीत असताना अनेक मुद्यांचा समावेश होतोच. तरीही कोणत्याही स्वरूपाच्या याद्या करणे टाळावे.
उदा. – भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने या विषयासंदर्भात पुढील वाक्याचा विचार करा. भारतीय शिक्षण व्यवस्थेपुढे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, गळतीचे वाढते प्रमाण, शाळांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, स्त्री शिक्षणाचे प्रश्न, शिक्षणव्यवस्थेचे खासगीकरण, अचूक ध्येय नसणारे अभ्यासक्रम, शाळांमधील पायाभूत सोई-सुविधांचा अभाव ही प्रमुख आव्हाने आहेत. वरील वाक्यातील विविध मुद्दे पाहता आपल्या हे सहज लक्षात येते की, वरील सर्व मुद्यांचे महत्त्व व गांभीर्य सारखे नाही. तरीही या सर्व मुद्यांचा एकाच यादीत समावेश केल्यामुळे लेखनातील ठामपणा कमी होतो.
वरील गोष्टी लक्षात घेऊन लिखाण केल्यास ते वरवरचे राहत नाही, तसेच विषयालाही योग्य न्याय दिला जातो. पुढील लेखात आपण यूपीएससीतील निबंध विषयासंदर्भात इतर काही पलूंची चर्चा करणार आहोत.
First Published on June 11, 2019 12:22 am
Web Title: essay writing 3
No comments:
Post a Comment