यूपीएससीची तयारी : भारतीय स्वातंत्र्यसमर
परदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला
प्रस्तुत लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
या घटकाचे स्वरूप
* १८५७ च्या उठावामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आलेली होती. भारतावर ब्रिटिश राजसत्तेचे थेट नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेले होते. हे सत्तांतर १८५८ च्या भारत सरकारच्या कायद्याद्वारे झालेले होते. पण १९व्या शतकामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. या शतकामधील सुशिक्षित भारतीयांनी धार्मिक विश्वास, रिवाज व सामाजिक प्रथांची पाश्चिमात्य शिक्षणाद्वारे प्राप्त केलेल्या विज्ञान व तत्त्वज्ञानाच्या आधारे चिकित्सा करण्यास सुरुवात केलेली होती. प्रबोधन युगातील विचार, युरोपातील बौद्धिक विचारप्रवाह, विकास, इ. घटकांमुळे पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा हाती घेतल्या. या सुधारणांनी जातीप्रथा, अस्पृश्यता, सामाजिक आणि कायदेशीर भेदभाव यांसारख्या सामाजिक परंपरा आणि मूर्तिपूजा तसेच अंधश्रद्धा यांसारख्या धार्मिक बाबींवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. या सुधारणांना १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी असे संबोधले जाते. या चळवळी पुरोगामी स्वरूपाच्या होत्या. या चळवळीचा व्यक्तिगत समानता, सामाजिक समानता, विवेकवाद, प्रबोधन आणि उदारमतवाद यांसारख्या लोकशाही मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे हा उद्देश होता.
* पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीयांनी आधुनिक विवेक, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि राष्ट्रवादी राजकीय दृष्टिकोनाचा अंगीकार केलेला होता. इंग्रजी भाषेने देशात राष्ट्रवादाची वाढ होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. ही भाषा भारतातील विविध प्रदेशांतील उच्चशिक्षित लोकांची वैचारिक देवाणघेवाण करण्याची माध्यम बनली. पाश्चिमात्य शिक्षणामुळे देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता या संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली व शिक्षित भारतीयांमध्ये दृष्टिकोन आणि हितसंबंध यामध्ये काहीसा एकसारखेपणा निर्माण झाला. तसेच काही भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करून ब्रिटिश आर्थिक धोरणे भारतीयांचे शोषण कशा प्रकारे करत आहेत, हे दाखवून दिले. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झाला की भारतात राष्ट्रवादाची उभारणी झाली व १८८५मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली, येथूनच पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय राष्ट्रीय चळवळीची वाटचाल सुरू झाली.
* साधारणत: भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे तीन टप्पे केले जातात. १८८५ ते १९०५ (मवाळ कालखंड), १९०५ ते १९२० (जहाल कालखंड) आणि १९२० ते १९४७ (गांधी युग).
या टप्प्यांनिहाय भारतीय राष्ट्रीय चळवळीतील इतर प्रवाह या अंतर्गत क्रांतिकारी चळवळी, कनिष्ठ जातीतील चळवळी, कामगार चळवळ, भारतीय संस्थाने व संस्थानातील प्रजेच्या चळवळी, भारतीय राष्ट्रीय चळवळीमधील महिलांचे योगदान, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी आणि गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय यांचे कार्य व ब्रिटिशांच्या काळातील भारतातील घटनात्मक विकास यांसारख्या बाबींचा अधिक विस्तृत आणि सखोल अभ्यास करावा लागणार आहे.
या घटकावर २०१३ ते २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये एकूण १४ प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील काही प्रश्न खालीलप्रमाणे होते.
* सद्य:स्थितीमध्ये महात्मा गांधींच्या विचारांचे महत्त्व यावर प्रकाश टाका. (२०१८)
* आधुनिक भारतात महिलांसंबंधी असणारे प्रश्न १९व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा भाग म्हणून उचलण्यात आलेले होते. त्या काळात महिलांसंबंधी कोणते मुख्य मुद्दे आणि वादविवाद होते? (२०१७)
* स्वातंत्र्य लढय़ामधील सुभाष चंद्र बोस आणि महत्मा गांधी यांच्या भिन्न दृष्टिकोनावर प्रकाश टाका. (२०१६)
* महात्मा गांधींविना भारताला स्वातंत्र्य प्राप्त करणे कसे भिन्न राहिले असते? चर्चा करा. (२०१५)
* स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा फक्त तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेला पूर्ण करणे कठीण गेले असते, पण १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याच्या अनुभवामुळे हे करता आले. चर्चा करा. (२०१५)
* परदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढय़ात त्यांनी घेतलेल्या भूमिकांचे विश्लेषण करा. (२०१४)
* जगामध्ये घडलेल्या कोणत्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींनी भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला प्रेरणा दिलेली होती? (२०१४)
* वय, लिंगभाव आणि धर्म यांसारखी बंधने झुगारून भारतीय महिला स्वातंत्र्य लढय़ात अग्रेसर राहिल्या. चर्चा करा. (२०१३)
वरील प्रश्नांवरून आपणाला या घटकाची कशी तयारी करावी याची एक योग्य दिशा निश्चित करता येऊ शकते. तसेच यातील अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासून या विषयाच्या विविध पलूंचे योग्य आकलन करणे महत्त्वाचे ठरते. कारण हा घटक पारंपरिक पद्धतीचा आहे. यावर विचारण्यात येणारे प्रश्न बहुतांश वेळा सर्वागीण पलूंचा विचार करून विश्लेषणात्मक पद्धतीने विचारले जातात. अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे खूपच कठीण जाते म्हणून विषयाचे योग्य आकलन आणि चिकित्सक पद्धतीने केलेला अभ्यास यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो.
या घटकाची मूलभूत माहिती आपल्याला एनसीईआरटीच्या आधुनिक भारताशी संबंधित पुस्तकांमधून मिळते आणि या विषयाची सर्वागीण आणि सखोल तयारी करण्यासाठी ग्रोवर आणि ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, बिपिन चंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ यासारख्या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.
First Published on July 11, 2019 1:17 am
Web Title: upsc exam preparation tips upsc exam 2019 zws 70
No comments:
Post a Comment