आवडीनुसार करिअरची निवड करा!
पालकांशी बोलताना डॉ. शेट्टी म्हणाले, मुलांवर ओरडू नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा
जून महिना म्हणजे दहावी-बारावी निकालांचा, महाविद्यालयीन प्रवेशाच्या धावपळीचा. एकूणच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीसाठी अतिशय महत्त्वाचा. यावेळी विद्यार्थी आणि पालकांना गरज असते ती, सुयोग्य मार्गदर्शनाची. त्यासाठीच लोकसत्तातर्फे मार्ग यशाचा ही करिअर कार्यशाळा आयोजित केली जाते. ठाणे आणि दादर येथे झालेल्या या कार्यशाळेतील वृत्तान्त आजपासून देत आहोत.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी करिअर आणि ताण या विषयावर विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला.
डॉ. शेट्टी म्हणाले, प्रत्येक विद्यार्थी काही ना काही स्वप्न पाहत असतो. स्वप्न पाहणे उत्तमही आहे. पण ते फक्त स्वप्न राहू नये, त्यासाठी काहीतरी ध्येय समोर असले पाहिजे. त्याचा स्वप्नातही ध्यास घेता आला पाहिजे. अनेकदा मुलांनी निवडलेल्या पर्यायांमुळे पालकांना ताण येतो. उदा. आजही उत्तम गुण मिळालेला मुलगा कलाशाखेत जायचे म्हणाला, की घरच्यांच्या पोटात गोळा येतो. पालक आणि विद्यार्थी नेहमी विचारतात की, अमुक त्या शाखेत पुढे करिअर आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, करिअर सगळीकडेच आहे. फक्त तुम्ही ते कसे घडवता यावर सगळे अवलंबून आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय असेल तर तो अधिक लवकर आणि आनंददायी पद्धतीने शिकेल, असा सल्ला डॉ. शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिला.
मात्र करिअर उत्तम घडवायचे असल्यास केवळ आपल्या या ध्येयालाच चिकटून राहा. मग समाजमाध्यमं, पौगंडावस्थेतील नातेसंबंधांचे मृगजळ, प्रेमप्रकरणे या गोष्टी जरा लांब ठेवा. असतील तरी त्यांनी तुमच्या अभ्यासावर परिणाम करता कामा नये. आपल्या आवडीचे क्षेत्र जरूर निवडावे पण मग त्यात पुढे जायचे तर कष्ट आणि चिकाटीला कमी पडू नका, असे डॉ. शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
पालकांशी बोलताना डॉ. शेट्टी म्हणाले, मुलांवर ओरडू नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा. सतत संवाद साधा. आपले मूल चुकत असेल तरी त्याच्यावर लगेच रागावू नका. त्याच्या मनातले जाणून घ्या. बोलते करा. म्हणजे मुलाच्या हातून वावगे काही घडल्यावरही तो पालकांना सांगेल. लोक काय म्हणतील, म्हणून मुलांवर चिडू नका. मूल काय म्हणते, आपले मन काय सांगते, याकडे लक्ष द्या. ज्या घरात भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या जातात त्या घरातल्या मुलांचे करिअर आणि आयुष्यही चांगले घडते.
इंग्रजी भाषेची भीती, न्यूनगंड अनेक विद्यार्थी-पालकांच्या मनात असतो. पण त्याला घाबरू नका. शिक्षण मातृभाषेतूनच द्या. पण इंग्रजी उत्तम करण्यासाठी प्रयत्न करा. इंग्रजी ही तुम्हाला संधी देणारी भाषा आहे. तर मातृभाषा आपल्याला ओळख देते, संस्कृती देते.
शेवटी सातत्य, जिद्द आणि कष्ट यांना पर्याय नाही. हे गुण तुमच्याकडे असतील तर उत्तम करिअर होणारच.
सामाजिक भान हवेच!
डॉ. सागर मुंदडा
वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि आव्हानांविषयी डॉ. सागर मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वैद्यकीय क्षेत्रात येण्यासाठी सामाजिक भान, आवड आणि सेवाभावी वृत्ती असणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छ असणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राविषयी आवड असायला हवी. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट ही पात्रता परीक्षा द्यावी लागते. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी सहा ते सात तास अभ्यास आवश्यक आहे. पात्रता परीक्षेसाठी अकरावी आणि बारावीपासून अभ्यास केला पाहिजे. वैद्यकीय पात्रता परीक्षा देताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी नीट पात्रता परीक्षेचे आणि बारावीच्या परीक्षांमधील गुण प्रवेश घेताना ग्राह्य़ धरले जातात. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याअगोदर त्या महाविद्यालयात जाऊन करिअरच्या दृष्टिकोनातून महाविद्यालयातील सर्व परिस्थितीची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी किती अभ्यास केला यापेक्षा ते कसा अभ्यास करतात हे महत्त्वाचे आहे. अभ्यास करताना आपले जे विषय कमकुवत आहेत, त्यावर आधी लक्ष द्या.
वैद्यकीय क्षेत्र म्हणजे फक्त डॉक्टर हे जणू समीकरणच झाले आहे. मात्र रुग्णसेवेसाठी डॉक्टरांशिवाय विविध पर्याय वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध आहेत. या क्षेत्राविषयी पालकांना माहिती नसते. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पॅरामेडिकल, परिचारिका विभाग, फार्मसी या क्षेत्रांविषयीही माहिती घेणे गरजेचे आहे. दंतवैद्यक अभ्यासक्रम अर्थात बीडी शिकण्यासाठी बीडीएस हा अभ्यासक्रम करावा लागतो. याचसोबत फिजियोथेरपी, अॅक्युपंक्चर आणि पंचकर्म या विभागांकडेसुद्धा विद्यार्थी जाऊ शकतात.
विधि शिक्षणातील संधी
प्रा. नारायण राजाध्यक्ष
विधि शिक्षण आणि त्यातील संधींविषयी प्रा. नारायण राजाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विधि शिक्षण ही पूर्वी एखादी पदवी घेतल्यानंतर करण्याची गोष्ट होती, पण आता तसे नाही. प्रत्येक क्षेत्रात कायद्याला महत्त्व आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या संधी वाढल्या आहेत तसेच येथे येऊ इच्छिणारे विद्यार्थीसुद्धा. विधि क्षेत्रात येण्यासाठी संवादकौशल्य, परीक्षण आणि ऐकण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. कायद्याचे शिक्षण घेतल्यास कोणते कायदे कशासाठी आहेत, त्याचा उपयोग याची माहिती मिळते. चांगले वकील होण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव असणे गरजेचे आहे. वकिलांबद्दल लोकांच्या अनेक गैरसमजुती असतात. परंतु चांगला वकील हा कायम त्याच्या अशिलाशी प्रामाणिक असतो, हे लक्षात ठेवायला हवे. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी सीईटी आणि क्लॅट (उछअळ) अशा परीक्षा द्याव्या लागतात. सीईटी परीक्षा काही फारशी घाबरण्यासारखी नसते. क्लॅट मात्र थोडी कठीण जरूर असते. या परीक्षांसाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान, कायद्याची तत्त्वे, भारतीय संविधान आणि एकूण सामान्य ज्ञान यांवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. विधि शिक्षण कोणालाही घेता येते. त्यासाठी वयाची अट नाही. मुंबई विद्यापीठात तीन आणि पाच वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी पदवी परक्षा देणे आवश्यक आहे. तर पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला बारावीनंतर प्रवेश घेता येतो. त्यासाठी विद्यार्थाना पात्रता परीक्षा द्यावी लागते. विधि शिक्षणामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व असते. महाविद्यालयात तो घ्यायचा असेल तर महाविद्यालयातील कायदेविषयक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये (मूट कोर्ट) हिरिरीने भाग घ्यायला हवा. दररोज वर्गात बसायला हवे. वकिली क्षेत्रात पुस्तकी ज्ञान आणि कामाचा अनुभव या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व आहे. तसेच यामध्ये सरकारी परीक्षा दिल्यास विविध न्यायालयांत वेगवेगळ्या स्तरांवरील न्यायाधीश म्हणून काम करता येते. कोर्टात प्रॅक्टिस करायची असेल तर तो पर्याय आहेच. शिवाय विविध कंपन्यांच्या लीगल डिपार्टमेंटमध्ये सल्लागार म्हणूनही काम करता येते. हा अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये करता येतो. परंतु तो इंग्रजीमध्ये केलेला जास्त बरा, कारण त्यातून बरेच साहित्य उपलब्ध आहे आणि इंग्रजीतून तो करणे तुलनेने सोपे जाते.
– संकलन- पूर्वा साडविलकर, मानसी जोशी
First Published on June 26, 2019 1:42 am
Web Title: expert career advice in loksatta career workshop zws 70
No comments:
Post a Comment