शब्दबोध : मक्ता घेणे
नेक संस्कृत स्तोत्रांमध्ये शेवटी त्याच्या कवीचे नाव घेऊन ओळ गुंफलेली असते
(संग्रहित छायाचित्र)
मक्ता घेणे
‘घरातली सगळी कामे करण्याचा मक्ता मी काय एकटीने घेतला नाही.’ किंवा ‘दर वेळी समारंभाच्या व्यवस्थेचे काम मीच का करायचं? मी काय त्याचा मक्ता घेतलाय?’ गृहसंस्था आणि सार्वजनिक संस्था अशा दोन्ही ठिकाणी वेळोवेळी कानी पडणारी ही वाक्ये. दोन्ही वाक्यांत ‘मक्ता घेणे’ हा वाक्प्रचार वापरला आहे. ‘मक्ता’ याचा अर्थ विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा काही पुरवण्याचा हक्क व जबाबदारी असा आहे. ठेका, बोली, कंत्राट, इजारा किंवा हमी घेणे यासाठी मक्ता घेणे असा शब्दप्रयोग केला जातो. ठेकेदार, कंत्राटदार, मक्ता घेणारी खंडकरी यांना मक्तेदार असे म्हणतात. शब्दकोशांत मक्ता संबंधात असे वेगवेगळे शब्द सापडले; पण मक्ता शब्दाचा उगम नेमका कोणत्या भाषेतून झाला ते कळले नाही.
हा शब्द आणखी वेगळ्या प्रकारे भेटले. कविवर्य सुरेश भट यांच्या एल्गारह्ण या काव्यसंग्रहात. त्यातील सुरुवातीची कैफियत वाचताना गजलेसंबंधी विशेष माहिती मिळाली. तिथेच मकता हा शब्दही भेटला. गझलेच्या शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव गुंफलेले असते. या शेराला ‘मकता’ असे म्हणतात. पूर्वीच्या काळी छापखाने नव्हते, त्यामुळे गजला कागदांवर हातानेच लिहाव्या लागत. तसेच वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके किंवा आकाशवाणी, दूरदर्शन यांसारखी प्रसारमाध्यमेही नव्हती. त्यामुळे गझल कोणाची आहे हे कळण्यासाठी मकत्यात म्हणजेच शेवटच्या शेरात कवीचे टोपणनाव नमूद करण्याची प्रथा होती. कवीचे टोपणनाव म्हणजेच तखल्लुस, मकत्यात गुंफलेले असे. थोडक्यात मकत्यामुळे कवीचा गजलेवरील हक्क शाबीत होत असे. त्यावरूनच एखाद्या गोष्टीचा हक्क मिळणे या अर्थाने मक्ता घेणे हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
अर्थात तसे पाहिल्यास काव्यात स्वत:च्या नावाचा उल्लेख करण्याची प्रथा आपल्याकडे प्राचीन काळापासून रूढ आहे. अनेक संस्कृत स्तोत्रांमध्ये शेवटी त्याच्या कवीचे नाव घेऊन ओळ गुंफलेली असते. संतकवींनीही ही प्रथा पाळलेली दिसते. समर्थ रामदास, संत तुकाराम यांच्या रचनांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख येतो. एकूण सांगायचा मुद्दा हा की, काव्याच्या शेवटी आपले नाव गुंफण्याचा मक्ता फक्त गझलकारांचाच नव्हे तर संत कवींचाही तितकाच आहे.
First Published on May 30, 2019 12:15 am
Web Title: article on word sense 6
No comments:
Post a Comment