शब्दबोध : काळ्या दगडावरची रेघ
दगडावर लेखनासाठी काळ्या दगडाची शिळा वापरली जाई. ही शिळा प्रथम सारख्या आकाराची व गुळगुळीत करून घेतली जाई.
(संग्रहित छायाचित्र)
आदिमानवाने त्याला अद्भुत, विस्मयकारक आणि भीतीदायक वाटलेल्या गोष्टी तसेच त्याच्या बहादुरीच्या घटना चिरकाल स्मरणात राहण्यासाठी गुहेतील भिंतींवर तीक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने कोरून ठेवल्या. हजारो वर्षांपूर्वीच्या त्या घटना अशा गुहांतून आजही आपल्याला पाहायला मिळतात. पुढे माणसाची जसजशी प्रगती होत गेली तसतशी लेखनकलाही विकसित होत गेली. आपल्याला झालेलं ज्ञान पुढील पिढीला ज्ञात करून देण्यासाठी लेखनाचा उपयोग होतो हे लक्षात आल्यावर माणसाने लेखनासाठी वेगवेगळी साधने निर्माण केली. भूर्जपत्र, पपायरस, वस्त्र यांच्यावर नैसर्गिक रंगाने लिखाण केले जाऊ लागले. अनेक जुने ग्रंथ, काव्यही अशा विविध साधनांवर लिहिलेले आढळतात. अर्थात हे लिखाण दीर्घकाळ टिकणार नाही हेसुद्धा माणसाला समजले. त्यामुळे कायम स्मरणात राहण्यासाठी आणि चिरकाल टिकण्यासाठी वेगळे साधन वापरायला हवे हे त्याच्या ध्यानात आले. त्यातून दगडावर लेखन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यात उत्तरोत्तर प्रगती होत गेली. दगडावर लेखन करण्याची वेगळी कला विकसित झाली.
दगडावर लेखनासाठी काळ्या दगडाची शिळा वापरली जाई. ही शिळा प्रथम सारख्या आकाराची व गुळगुळीत करून घेतली जाई. दगडावर जो मजकूर लिहावयाचा असेल तो जाणकार कवी पंडितांकडून तयार करवून घेत. नंतर सूत्रधार कारागिरांकडून मजकूर कोरून घेतला जाई. प्राचीन काळी लोकप्रिय पद्धती म्हणून राजाज्ञा आणि प्रसंगानुरूप राजादिकांच्या प्रशंसा यावर कोरीत. हे दगड शिलालेख म्हणून प्रसिद्ध आहेत. शिलालेख लिहिणं हे अत्यंत कष्टाचे आणि कौशल्याचे काम होते. कोरताना टवका उडाला तर दगडाच्या रंगाच्या धातूने जागा भरून काढीत. अक्षर उडाले तर धातूने भरून काढीत व अक्षर कोरीत. असे शिलालेख शेकडो वर्षे टिकून राहिले आहेत. त्यावरूनच एखादी गोष्ट कधीही न बदलणारी, खात्रीची असेल तर तिचे वर्णन करताना ‘काळ्या दगडावरची रेघ’ असा वाक्प्रचार वापरला जातो. काळ्या दगडावरची रेघ या वाक्प्रचाराबरोबरच ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असाही एक वाक्-प्रचार रूढ आहे. पूर्वी दगडाप्रमाणेच मातीची वीटसुद्धा लेखन माध्यम म्हणून वापरत असत. बौद्धांची धर्मसूत्रे अशा विटांवर लिहिलेली आहेत. कच्च्या विटांवर लेख लिहून नंतर त्या विटा भाजून काढत. भाजलेल्या विटा खूप काळ टिकतात. नैनितालच्या पायथ्याशी सापडलेल्या विटा इ.स.च्या तिसऱ्या शतकातील आहेत. विटांवर लिहिणे हे दगडावर लिहिण्यापेक्षा सोपे आणि कमी श्रमाचे होते. कदाचित त्यावरूनच हालअपेष्टा, संकट इ. दोन स्थितींची तुलना करताना त्या दोघींमधील एक त्यातल्या त्यात बरी हे दाखवताना ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असा वाक्प्रचार व्यवहारात रूढ झाला असावा.
First Published on April 25, 2019 1:16 am
Web Title: article on word sense 2
No comments:
Post a Comment