Friday, July 5, 2019

संशोधनाचा जपानी मार्ग टोक्यो विद्यापीठ, जपान कॅम्पसमधील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम १० प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात.

संशोधनाचा जपानी मार्ग टोक्यो विद्यापीठ, जपान

कॅम्पसमधील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम १० प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात.

|| प्रथमेश आडविलकर
विद्यापीठाची ओळख- जपानमधील सर्वात प्रतिष्ठित असलेले टोक्यो विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले बावीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १८७७ साली करण्यात आली. स्थापनेवेळी विद्यापीठाचे नाव इम्पिरियल युनिव्हर्सिटी असे होते. कालांतराने ते बदलून टोक्यो इम्पिरियल युनिव्हर्सिटी असे करण्यात आले. टोक्यो विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. राजधानी टोक्योमधील बुन्क्यो या मध्यवर्ती परिसरात टोक्यो विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस आहे. विद्यापीठाचे इतर पाच कॅम्पस अनुक्रमे होण्गो, कोमाबा, काशीवा, शिरोकेन आणो नाकानो या ठिकाणी स्थित आहेत. टोक्यो विद्यापीठामध्ये सध्या जवळपास अडीच हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास तीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या सर्व कॅम्पसमध्ये एकूण १० प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, १५ ग्रॅज्युएट स्कूल्स, विद्यापीठाशी संलग्न ११ संशोधन संस्था, १३ विद्यापीठ विस्तार केंद्रे, तीन ग्रंथालये आणि अतिप्रगत अभ्यास-संशोधनासाठी दोन संस्था एकमेकांच्या सहकार्याने नांदत आहेत. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. कॅम्पसमधील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम १० प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात.
अभ्यासक्रम- टोक्यो विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर असे सर्व अभ्यासक्रम जपानी आणि इंग्रजी भाषेमध्ये शिकवले जातात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी फक्त इंग्रजी भाषेमध्ये शिकवले जाणारे असेही काही अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अशा विषयांची यादी दिलेली आहे. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी फक्त इंग्रजी भाषेमध्येच त्यांचे अध्ययन करू शकतात असा नाही. जपानी भाषेमधील अभ्यासक्रमांनाही ते प्रवेश घेऊ शकतात. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचे जपानी भाषेवर उत्तम प्रभुत्व असणे आवश्यक आहे. हे चार वर्षांचे पूर्णवेळ आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आहेत. पदवी अभ्यासक्रमातील पहिल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना इतर विद्याशाखांमधील देखील विषय हाताळावे लागतात. एकंदरीत पहिल्या दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना व्यापक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय आणि अखेरच्या वर्षांत विद्यार्थ्यांची गुणवत्ता विद्यापीठाकडून तपासली जाते आणि त्याने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विषयांमध्ये त्याला अभ्यास करून पदवी पूर्ण करता येते. टोक्यो विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमामधील प्रत्येक विद्याशाखेतील नेहमीच्या वर्गाचे व परीक्षांचे वातावरण अतिशय शिस्तबद्ध आहे. इथल्या प्राध्यापकांकडून संशोधनावर आधारित आणि गुणवत्तेने परिपूर्ण असलेले नियमित वर्ग विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. विद्यापीठाकडून बहाल केले जाणारे पदव्युत्तर आणि डॉक्टरल अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. टोक्यो विद्यापीठामध्ये एकूण दहा शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स आहेत. विद्यापीठातील अ‍ॅग्रिकल्चर, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, इकॉनॉमिक्स, एज्युकेशन, सायन्सेस, इंजिनीअिरग, लॉ, मेडिसिन, फार्मास्युटिकल सायन्सेस आणि लेटर्स या १० प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.
सुविधा- टोक्यो विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी लघुकालीन व दीर्घकालीन अशा दोन प्रकारे निवासाची सोय केलेली आहे. विद्यापीठाचे यासाठी हौसिंग ऑफिस हे स्वतंत्रपणे कार्यरत असून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी जपानमध्ये सुरक्षित वावरत यावे यासाठी ते कटिबद्ध आहे. टोक्यो विद्यापीठाकडून विविध स्वरूपात अधिकाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली ‘मेक्स्ट स्कॉलरशिप’ ही शिष्यवृत्ती टोक्यो विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी जपानी भाषा शिकण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हेल्थ सव्‍‌र्हिस सेंटर व विद्यापीठाचे रुग्णालय, आंतरराष्ट्रीय हेल्थ इन्शुरन्स, पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, करिअर सपोर्ट सुविधा यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सर्व गोष्टींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
संकेतस्थळ
https://www.u-tokyo.ac.jp/en/
टोक्यो विद्यापीठाच्या कोमाबा कॅम्पसमध्ये अभियांत्रिकीमधून मी माझी पीएचडी पूर्ण केली. या विद्यापीठातील अद्ययावत प्रयोगशाळा, हा माझ्या शैक्षणिक अनुभवातील सर्वात महत्त्वाचा आणि  समृद्ध करणारा भाग होता. जपानमधील संशोधनात तंत्रज्ञानाचा वापर अधिक केला जातो, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रांचा वापरही विद्यार्थी अत्यंत सफाईने आणि सातत्याने करतात. म्हणूनच माझ्यासारख्या भारतीयांसाठी इथे शिकणे ही नक्कीच चांगली संधी ठरते.      -प्रतिभा सिंग,  पीएचडी, टोक्यो विद्यापीठ, कोमाबा कॅम्पस.
वैशिष्टय़
विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये जपानमधील अनेक नामवंतांचा समावेश आहे. जपानचे एकूण १५ अध्यक्ष या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाच्या १० माजी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.
itsprathamesh@gmail.com
First Published on June 4, 2019 2:06 am
Web Title: the university of tokyo

No comments:

Post a Comment