यूपीएससीची तयारी : निबंध लेखन निष्कर्षांचे लिखाण
निष्कर्षांच्या परिच्छेदामधील आधी लिहिलेले मुद्देच परत लिहिण्याने निष्कर्ष प्रभावी होत नाही.
मागील लेखात आपण निबंधाच्या मांडणीतील बारकावे तसेच प्रस्तावनेचा परिच्छेद कसा लिहावा याविषयी सविस्तर चर्चा केली. प्रभावी प्रस्तावनेबरोबरच नेमके आणि निबंधाला न्याय देणारे निष्कर्षांचे लिखाणही व्हायला हवे.
निबंधाच्या शेवटचे परिच्छेद प्रभावी असणे महत्त्वाचे आहे. निष्कर्षांचे परिच्छेद डौलदार भाषेत, योग्य शैलीचा वापर करून लिहावेत. एखादा संस्मरणीय विचार, चलाख तार्किक युक्तिवाद किंवा सामाजिक परिप्रेक्ष्यातील प्रश्न सोडवण्यासाठीचा कृतिक्रम या किंवा अशा मुद्दय़ांनी निबंधाचा शेवट करावा. निबंध वाचून पूर्ण झाल्यानंतर वाचणाऱ्याच्या मनात कोणती छाप असावी असे आपल्याला वाटते? त्यास धरून निष्कर्ष लिहावा.
निष्कर्षांच्या परिच्छेदामधील आधी लिहिलेले मुद्देच परत लिहिण्याने निष्कर्ष प्रभावी होत नाही. असे केल्याने निष्कर्ष एकसुरी आणि निष्प्रभ ठरतो. प्रभावी शेवट करण्यासाठी वरती दिलेल्या मुद्दय़ांव्यतिरिक्त विषयाचे महत्त्व पुन्हा एकदा, अर्थपूर्ण शब्दांची योजना करून वाचणाऱ्याच्या लक्षात आणून दिले जाऊ शकते. निष्कर्षांचा परिच्छेद आटोपशीर असावा. २० ओळींपेक्षा मोठा निष्कर्ष लिहिण्याचे टाळावे. अतिशय हुशारीने तुम्ही विषयाच्या गुंतागुंतीतून बाहेर पडत आहात, अशा भूमिकेतून निष्कर्ष लिहिला जाणे अपेक्षित आहे. पूर्णत: नवीन संकल्पना, विचारांची साखळी या परिच्छेदात मांडू नये. परंतु असे करत असताना निबंधातील मुद्दे पुन्हा पुन्हा देण्याचे टाळावे. अशा प्रकारचा निष्कर्षांचा परिच्छेद लिहिण्यासाठी पुरेसा सराव अत्यावश्यक आहे.
भाषा आणि शैली
व्याकरणाच्या दृष्टीने योग्य, सुटसुटीत आणि प्रभावी वाक्ये कोणत्याही चांगल्या निबंधाचा महत्त्वाचे घटक असतात. सुटसुटीत भाषा म्हणजे बोलीभाषा नाही. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या निबंध विषयांवर लेखन करताना मजकुराबरोबरच भाषेचीही प्रगल्भता दिसणे आवश्यक आहे.
एखाद्या मुद्दय़ाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कशा प्रकारे भर द्यावा, दोन वाक्यांमधील तर्कसंगती स्पष्ट करण्यासाठी कोणते शब्द वापरावेत, आपल्याजवळील माहितीचा वापर करून ठामपणे मत मांडत असताना अनावश्यक अधिकाराचा सूर कसा टाळावा या सर्व गोष्टी योग्य भाषेच्या वापरामधून साध्य होतात.
प्रगल्भ विचार आणि भाषा यांचा वापर म्हणजे केवळ जड आणि मोठय़ा शब्दांची खिरापत नाही. ज्या शब्दांच्या अर्थाबद्दल आपल्याला खात्री नाही, असे शब्द वापरणे टाळावे. तसेच मोठे, अलंकारिक शब्द वापरल्यामुळे आपले लिखाण दिखाऊ होत नाही ना याची काळजी घ्यावी. मात्र आपले लिखाण जर नैसर्गिकरीत्या गुंतागुंतीचे आणि अनेक पातळ्यांवर विश्लेषण करणारे असेल तर, शब्दांचा वापर आपोआपच अधिक प्रगल्भ होत जातो.
प्रत्येक वाक्य छोटे, सुटसुटीत असेल याची खबरदारी घ्यावी. वाक्य मोठे झाल्यास योग्य ठिकाणी स्वल्पविराम, अर्धविराम, विसर्गचिन्हांचा योग्य वापर करावा. अर्थबोध होऊ शकणार नाही इतकी मोठी वाक्ये करण्याचे मुळातच टाळावे. कोणतेही अर्थपूर्ण लेखन करण्यासाठी वरील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
निबंधाच्या परिच्छेदांची शैलीही नेमका मुद्दा मांडणारी असावी. यासाठी खाली काही उदाहरणे दिली आहेत. यातील एका मांडणीचा वापर करून निबंधाचा प्रभावी समारोप करता येऊ शकतो.
१) भविष्याचे छाप टाकणारे किंवा लक्षात राहणारे चित्र वाचकांसमोर उभे करणे.
२) विषय महत्त्वाचा का आहे हे विशद करणे.
३) कोणत्या उपयोजनांची आवश्यकता आहे, हे थोडक्यात सांगणे.
४) परिणामांची साधकबाधक चर्चा करणे.
५) रंजक किंवा वेधक विचार मांडणे.
६) विचारांना चालना देणारा सुविचार लिहिणे.
First Published on June 18, 2019 2:19 am
Web Title: upsc exam preparation tips upsc exam 2019 2
No comments:
Post a Comment