यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास
साधारणत: खालील पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते.
(संग्रहित छायाचित्र)
प्रस्तुत लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील, सामान्य अध्ययन पेपर एकमधील भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास या विषयाचे स्वरूप समजून घेणार आहोत. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. आपल्याला या घटकाची तयारी सर्वागीण पद्धतीने करावी लागते. साधारणत: खालील पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते. यातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे हे आपल्याला या घटकावर मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून समजून घेता येईल.
२०१३ ते २०१८ मधील मुख्य परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या –
* भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकावर एकूण १४ प्रश्न
* आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारत यावर एकूण ३० प्रश्न
* तर आधुनिक जगाचा इतिहास यावर एकूण १० प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
भारतीय वारसा आणि संस्कृती
हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने अधिकच कठीण जातो, कारण या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे. या घटकाअंतर्गत प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे कला प्रकार, साहित्य आणि स्थापत्य कला यांच्या मुख्य वैशिष्टय़ांचा अभ्यास करावा लागतो. या घटकामध्ये आपणाला भारतीय चित्रकला, स्थापत्यकला, शिल्पकला, संगीत, नृत्य आणि नाटय़, साहित्य, उत्सव, हस्तकला इत्यादीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या घटकाची तयारी आपणाला प्राचीन काळापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत करावी लागते. त्यामुळे विविध कला प्रकार, साहित्य, उत्सव यांची उत्पत्ती तसेच प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडनिहाय यामध्ये नेमके कोणते बदल झाले व याची वैशिष्टय़े काय आहेत इत्यादी संबंधित बाबींची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. तसेच सरकारने वारसा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचीही माहिती असावी लागते.
आधुनिक भारताचा इतिहास
या घटकाअंतर्गत आपणाला १८व्या शतकापासून ते १९४७ पर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्ती, मुद्दे, भारतीय स्वातंत्र्य चळवळ व या चळवळीचे विविध टप्पे याचबरोबर देशाच्या विविध प्रदेशांतील योगदान किंवा महत्त्वाचे योगदान इत्यादीशी संबंधित अभ्यास करावा लागणार आहे. या घटकात आपणाला १८व्या शतकातील भारतातील राजकीय परिस्थिती, ब्रिटिशांच्या विरोधातील बंड आणि उठाव, १९व्या शतकातील भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, ब्रिटिशांची आíथक धोरणे व त्याचा परिणाम, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे, १८८५ पासून ते १९४७ मधील स्वातंत्र्य चळवळीचे विविध टप्पे आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती व ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे, क्रांतिकारी चळवळी, महिलांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान इत्यादी महत्त्वाच्या घडामोडींची माहिती असणे गरजेचे आहे. या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करणे अधिक गरजेचे आहे.
स्वातंत्र्योत्तर भारत
या घटकामध्ये भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूंचे परराष्ट्र धोरण व भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व याच्याशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड- बांगलादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवसामाजिक चळवळी – वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी, पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यांतील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिक वादाचे राजकारण तसेच या सर्व घटकांशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने याची तयारी करावी लागते.
आधुनिक जगाचा इतिहास
या घटकाअंतर्गत आपणाला १८व्या शतकातील महत्त्वाच्या घटना उदा. राजकीय क्रांती – अमेरिकन, फ्रेंच, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडामधील युरोपियन साम्राज्यवाद, जपानचा आशिया खंडातील साम्राज्यवाद, राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान – भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद इत्यादी, तसेच १९व्या शतकातील युरोपातील राज्यक्रांती व राष्ट्रवादाचा उदय आणि जर्मनीचे आणि इटलीचे एकत्रीकरण, तसेच २०व्या शतकातील घडामोडी – दोन जागतिक महायुद्धे, रशियन क्रांती, लीग ऑफ नेशन्स, अरब राष्ट्रवाद, फॅसिवाद आणि नाझीवाद, आíथक महामंदी, तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धनंतरचे जग – संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना, निर्वसाहतीकरण, चीनची क्रांती, शीतयुद्ध व संबंधित घटना, युरोपियन संघ इ. घटकांशी संबंधित अभ्यास करावा लागतो.
संदर्भ साहित्य
या विषयावर बाजारामध्ये अनेक संदर्भ पुस्तके तसेच नोट्स पद्धतीने लिहिलेली गाईडस उपलब्ध आहेत आणि नेमके यातील कोणती संदर्भ पुस्तके वाचावीत याची निवड करणे कठीण जाते. या घटकासाठी उपरोक्त वर्गीकरणानुसार लागणारी एनसीईआरटीची पुस्तके तसेच या घटकाची तयारी करण्यासाठी लागणारी महत्त्वाची संदर्भ पुस्तके, गतवर्षीय परीक्षामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि अभ्यासाचे परीक्षाभिमुख नियोजन कसे करावे इत्यादी महत्त्वाच्या पलूंवर पुढील लेखांमध्ये चर्चा करणार आहोत.
First Published on June 27, 2019 12:07 am
Web Title: indian heritage culture and history upsc abn 97
No comments:
Post a Comment