Wednesday, July 3, 2019

यूपीएससीची तयारी : नागरी सेवा क्षमता चाचणी (CSAT) २०० गुणांचा हा पेपर २०१५ पासून पात्रता पेपर ठरवण्यात आला आहे.

यूपीएससीची तयारी : नागरी सेवा क्षमता चाचणी (CSAT)

२०० गुणांचा हा पेपर २०१५ पासून पात्रता पेपर ठरवण्यात आला आहे.

विक्रांत भोसले
सर्व उमेदवारांना आता २ जून २०१९ रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे वेध आता सर्व उमेदवारांना लागले आहेत. त्या परीक्षेमधील  CSAT  हा एक महत्त्वाचा पेपर आहे. २०० गुणांचा हा पेपर २०१५ पासून पात्रता पेपर ठरवण्यात आला आहे. तयारी करताना महत्त्वाचे मुद्दे लक्षात न आल्याने किंवा लक्षात न ठेवल्याने किंवा याच्या तयारीला पुरेसे महत्त्व न दिल्याने बऱ्याच उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण मिळवणेसुद्धा अवघड होऊन बसते. या महत्त्वाच्या मुद्दय़ांची थोडक्यात उजळणी व्हावी हाच या लेखाचा हेतू आहे.
सर्वसाधारणपणे  CSAT च्या अभ्यासक्रमाचे तीन विभाग करता येतात. त्यामधील पहिला म्हणजे उताऱ्यावर आधारित आकलनक्षमता, दुसरा म्हणजे अंकगणित आणि सामान्य बौद्धिक क्षमता आणि तिसरा म्हणजे तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता.
आजच्या या लेखामध्ये आपण उताऱ्यावर आधारित आकलन क्षमता या घटकाच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करूयात.
आकलन क्षमतेची पुरेशी तयारी करतानाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या भाषेतून उतारे आणि प्रश्न दिले जातात त्या भाषेचे पुरेसे ज्ञान असणे. बहुतांश मराठी भाषिक उमेदवार पेपर सोडवताना हिंदी भाषेऐवजी इंग्रजी भाषेलाच प्राधान्य देतात. म्हणून इंग्रजी शब्दांचा पुरेसा साठा, व्याकरण, आणि वाक्या-वाक्यांमधील संबंध दाखवणारे निर्देशक शब्द इत्यादी प्राथमिक पण अत्यंत महत्त्वाच्या घटकांची तयारी खूप अगोदरपासूनच सुरू व्हायला हवी.
उताऱ्यावर विचारले जाणारे प्रश्न सर्वसाधारपणे दोन गटांत मोडतात. एक म्हणजे सर्वसमावेशक प्रश्न जसे की, उताऱ्याची मुख्य संकल्पना, उताऱ्यावरून निघणारे अनुमान, लेखकाचा उद्देश आणि त्याने काय गृहीत धरले आहे. दुसरा गट हा विशिष्ट ठरावीक माहितीवर आधारित प्रश्नांचा आहे. यामध्ये उताऱ्यातील एखाद्या विशिष्ट भागावर प्रश्न विचारले जातात. पहिल्या गटामध्ये शब्द, वाक्य आणि त्यांमधील संबंधांवरून अर्थ लावून उत्तर द्यावे लागते तर दुसऱ्या गटात फक्त उत्तर हे उताऱ्यामध्ये नेमके कुठे आहे हे शोधावे लागते. म्हणून अशा विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगवेगळी रणनीती वापरावी लागते.
मुख्य संकल्पनेबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी वापरले जाणारे काही वाक्यांश –  main idea, central theme, best sums up, passage refers to  B. मुख्य संकल्पनाही अशी सर्वसमावेशक संकल्पना वा वाक्य असते की ज्याला उताऱ्यातील बाकीच्या गोष्टी आधार देत असतात.
अनुमान वाक्य ही अशी बाब आहे की, जी लेखकाने उताऱ्यामध्ये अप्रत्यक्षरीत्या सांगितलेली असते. उताऱ्यामध्ये केलेला युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो. पण अनुमान हे मुख्य संकल्पनेसारखे सर्वसमावेशक असेलच असे नाही, कारण ते संपूर्ण उताऱ्यावर आधारित असेलच असे नाही. हा या दोघांमधील अत्यंत महत्त्वाचा फरक आहे याची नोंद घ्यावी. अनुमानाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी वापरले जाणारे काही वाक्यांश –  inference, passage implies, view implied, conclusion B. लेखकाचा हेतू वा उद्देश ठरवताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. जसे की, कोणत्या मुद्दय़ावर लेखक जास्त वारंवार चर्चा करत आहे, कशा प्रकारचे शब्द त्याच्या लिखाणात येत आहेत, कशा पद्धतीने त्याने उताऱ्याचा समारोप केला आहे वा कोणता निष्कर्ष काढला आहे. तसेच स्वत:च्या युक्तिवादाला आधार देण्यासाठी कोणत्या प्रकारची उदाहरणे वा पुरावे देत आहे या बाबींचा विचार करावा लागतो.
उताऱ्यावर गृहीतकाबद्दल (Assumption) विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी असे पर्याय शोधावे लागतात की, ज्याबद्दल लेखकाने पुरेसे विवरण देणे आवश्यक समजलेले नाही. अथवा त्याने असे गृहीत धरले आहे की वाचकांना याचे पुरेसे ज्ञान वा माहिती असेल. म्हणजे गृहीतकदेखील अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असते. परंतु ते लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते. इथे अनुमान आणि गृहीतक यातील फरक लक्षात घ्यावा. कारण दोन्ही अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असतात. पण गृहीतक हे लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते आणि लेखकाचा युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो.
जर उतारा हा दोन वा जास्त परिच्छेदांचा असेल तर अगोदर प्रश्न वाचून घ्यावेत आणि त्यातील महत्त्वाचे कळीचे शब्द लक्षात ठेवावेत. उतारा वाचताना ते अधोरेखित करावेत म्हणजे विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी परत शोधाशोध करावी लागणार नाही. याव्यतिरिक्त मोठय़ा उताऱ्यासाठी Structure of the Passage Approach, Story-line Approach आणि Optimized Reading Approach चा गरजेनुसार वापर करावा. पण हे करण्याअगोदर वरील पद्धतींची माहिती घेऊन पुरेसा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे.
पुढील लेखामध्ये आपण अंकगणित आणि सामान्य बौद्धिक क्षमता, आणि तार्किक क्षमता व विश्लेषण क्षमता या घटकांच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांची चर्चा करणार आहोत.
First Published on May 1, 2019 2:07 am
Web Title: upsc exam 2019 useful tips for upsc exam preparation 2

No comments:

Post a Comment