Thursday, November 29, 2018

यशाचे प्रवेशद्वार : एमबीए प्रवेशाची ‘एनमॅट’ संधी एनमॅट ही परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स युनिव्हर्सटिीसाठी ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन कौन्सिलमार्फत घेतली जाते.

यशाचे प्रवेशद्वार : एमबीए प्रवेशाची ‘एनमॅट’ संधी


एनमॅट ही परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स युनिव्हर्सटिीसाठी ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन कौन्सिलमार्फत घेतली जाते.



सुरेश वांदिले
एमबीए प्रवेशासाठीची कॉमन एन्ट्रस एक्झामिनेशन – कॅट आणि कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – सीमॅटनंतर महत्त्वाची परीक्षा म्हणजे नरसी मोनजी मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – एनमॅट.
*     परीक्षेचे स्वरूप
एनमॅट ही परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स युनिव्हर्सटिीसाठी ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन कौन्सिलमार्फत घेतली जाते. हीच संस्था जीमॅट म्हणजेच ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट घेते. एनमॅट ही संपूर्णरीत्या संगणकावर आधारित परीक्षा आहे. व्यवस्थापन शाखेच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कल तपासणीसाठी या परीक्षेची संरचना केली जाते.
या परीक्षेचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या परीक्षेचा कालावधी ७५ दिवसांचा असून या कालावधीत ही परीक्षा प्रत्येक उमेदवारास तीनदा देता येते. समजा, एखाद्या उमेदवाराची पहिली परीक्षा समाधानकारक गेली नसेल तर तो दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदासुद्धा ही परीक्षा देऊ शकतो. या तीनपैकी ज्या परीक्षेत सर्वोच्च गुण मिळाले असतील ते अंतिम गुण म्हणून स्वीकारले जातात. तसेच या तीन प्रयत्नांसाठी विद्यार्थी मोबाइलद्वारे आपल्या सोयीनुसार वेळ, तारीख व जागांच्या उपलब्धतेनुसार परीक्षा केंद्र निवडू शकतात. देशात त्यांची ४८ केंद्रे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे ही केंद्रे आहेत. तसेच या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती नाही, म्हणजेच चुकलेल्या उत्तरांचे गुण कापले जात नाहीत.

वेळापत्रक – या परीक्षेच्या ७५ दिवसांचे वेळापत्रक घोषित झाले आहे. ४ ऑक्टोबर २०१८ पासून त्याची सुरुवात होत असून १७ डिसेंबर २०१८ ला शेवटची परीक्षा घेण्यात येईल. अंतिम निकाल जानेवारी २०१९च्या तिसऱ्या आठवडय़ात घोषित केला जाईल.
या परीक्षेतील गुणांद्वारे खालील संस्था विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या प्रारंभिक टप्प्यासाठी निवडतात.
(१)    एस.पी.जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च-मुंबई,
(२)    बेनेट युनिव्हर्सटिी – ग्रेटर नॉयडा,
(३)    व्हीआयटी युनिव्हर्सटिी-वेल्लोर,
(४)    बीएसई-बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिटय़ूट,
(५)    नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स,
(६)    अथेना इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स- मुंबई,
(७)     अलायन्स युनिव्हर्सटिी – बेंगळूरु,
(८)     एल.एम. थापर स्कूल ऑफ मॅनेजमेंट,
(९)    युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम स्टडिज स्कूल ऑफ मॅनेजमेंट – देहरादून,
(१०)    हैदराबाद स्कूल ऑफ बिझिनेस,
(११)    झेवियर युनिव्हर्सटिी-भुवनेश्वर,
(१२)    आयबीएस बिझिनेस स्कूल- हैदराबाद/मुंबई,
(१३)    स्कूल ऑफ पेट्रोलियम मॅनेजमेंट – गांधीनगर, अहमदाबाद,
(१४)     अहमदाबाद युनिव्हर्सटिी,
(१५)     बीएमल मुंजाळ युनिव्हर्सटिी,
(१६)     शिव नादर युनिव्हर्सटिी, गौतमबुद्धनगर,
(१७)     ओ.पी.जिंदाल युनिव्हर्सटिी, दिल्ली,
(१८)     मोदी युनिव्हर्सटिी,
(१९)     ऑक्सन स्कूल ऑफ मॅनेजमेंट, हैदराबाद,
(२०)     इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, मुंबई,
(२१)     एसडीए बोकोनी एशिया सेंटर, मुंबई
(२२)    आयएसबीआर बिझिनेस स्कूल, बेंगळूरु,
(२३)    अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी,
(२४)    गितम स्कूल ऑफ इंटरनॅशनल-विशाखापट्टण
(२५)    एसआरएम युनिव्हर्सटिी-चेन्नई बिझिनेस यांचा समावेश आहे.
उपरोक्त नमूद ज्या कोणत्या पाच बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पर्याय दिला असेल त्या संस्थेला या विद्यार्थ्यांचे गुण प्रारंभिक नोंदणी रकमेमध्येच (रजिस्ट्रेशन फी)मध्ये पाठवले जातात. मात्र त्यानंतरच्या इतर संस्थांना हे गुण संबंधित संस्थेचे प्रवेश शुल्क भरून विद्यार्थ्यांना पाठवावे लागते. तीनही प्रयत्नांचा निकाल विशिष्ट कालावधीत घोषित केला जातो. हे गुण विद्यार्थ्यांना कळू शकतात. त्यानुसार विद्यार्थी कोणत्या बिझिनेस स्कूलसाठी पात्र ठरू शकतात याचा अदमास घेऊन संबंधित संस्थेसाठी अर्ज करू शकतात.
*     अशी असते परीक्षा –
या परीक्षेत भाषा कौशल्य, संख्यात्मक /परिणामात्मक कौशल्य (क्वांटिटेटिव्ह स्किल्स), ताíकक कौशल्य (लॉजिकल स्किल्स) या तीन घटकांचे तीन विभाग असतात. या तीन घटकांवर आधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. प्रत्येक भागासाठी पुढीलप्रमाणे वेळ दिला जातो व प्रश्न विचारले जातात. भाषा कौशल्य – ३२ प्रश्न, वेळ २२ मिनिटे, संख्यात्मक / परिणामात्मक कौशल्य – ४८ प्रश्न, वेळ ६० मिनिटे, तार्किक कौशल्य- ४० प्रश्न, वेळ ३८ मिनिटे. दिलेल्या वेळेतच हे प्रश्न सोडवणे आवश्यक असतात. एखादा विभाग पूर्ण झाल्यावर विद्यार्थी दुसऱ्या विभागामध्ये गेल्यास त्याला पुन्हा आधीच्या विभागात जाता येत नाही. किंवा आधीचे विभाग अपूर्ण राहिल्यास त्याला त्याचे प्रश्न सोडवता येत नाही.
सोडवलेली उत्तरे प्रत्येक विभागासाठी दिलेल्या वेळेमध्ये पुन्हा तपासता येतात. हा वेळ संपल्यानंतर त्याला अशी तपासणी करता येत नाही. एखाद्या विभागामधील प्रश्न दिलेल्या वेळेआधीचे पूर्ण झाले तरी तो वेळ दुसऱ्या विभागासाठी वापरता येत नाही. विद्यार्थी कोणताही विभाग सर्वात आधी सोडवायला घेऊ शकतो.
*    सरावासाठी साहाय्य
या परीक्षेच्या सरावासाठी एक मोफत सराव परीक्षा देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यातील १२० प्रश्नांच्या उत्तरांचे विश्लेषणही मोफत उपलब्ध करून दिले जाते. तसेच आणखी दोन सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याची सुविधा विशिष्ट शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाते. यातील प्रश्नांच्या उत्तरे आणि त्याच्या विश्लेषणाचा यामध्ये समावेश असतो. ( संपर्क – दूरध्वनी- ८२१ ४२८ २०००, ईमेल – NMATSupport@excelindia.com) या परीक्षेच्या तयारीसाठी एनमॅटने एक अधिकृत पुस्तकही तयार केले आहे. पुस्तकाचे नाव, एनमॅट बाय जीएमएसी, ऑफिसिअल गाइड-२०१८ असे असून ते ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे.
*   एनएमआयएमएस – नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
एनमॅटमधील गुण प्रारंभिक चाळणीसाठी निवडणारी महत्त्वाच्या संस्था म्हणजे एनएमआयएमएस. या बिझनेस स्कूलच्या मुंबई, नवी मुंबई, इंदौर, हैदराबाद आणि बेंगळूरु येथे  शाखा आहेत. प्रारंभिक चाळणीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची समूह चर्चा आणि मुलाखतीनंतर अंतिम निवड केली जाते.मुंबईतील कॅम्पसमध्ये एमबीए अभ्यासक्रम चालविला जातो.
एमबीए (जनरल)
अर्हता – कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी (एकूण जागा- ५००),
एमबीए (फार्मास्युटिकल मॅनेजमेंट)
अर्हता- ५० टक्के गुणांसह
पदवी – विज्ञान, औषधीनिर्माणशास्त्र / एमबीबीएस / बीडीएस / बीएचएमएस / बीएएमएस / बीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी किंवा एम.एस्सी. इन बायोटेक्नॉलॉजी
पदव्युत्तर पदवी – अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र. बीटेक / बीई इन बायोटेक्नॉलॉजी/बायोमेडिकल
(एकूण जागा-६०)
एमबीए (ह्य़ुमन रिसोर्स)
अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी (एकूण जागा- ६०)
एमबीए हा अभ्यासक्रम या तीन शाखांमध्ये करता येतो. यापकी ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात.
नवी मुंबई, हैदराबाद, इंदोर आणि बेंगळूरु येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो.
हे सर्व अभ्यासक्रम दोन वर्षांच्या कालावधीचे आहेत.
संपर्क- हेल्प डेस्क- ०१२० ४३९७८५५
ईमेल – nmatbygmacsupport@pearson.com
संकेतस्थळ – www.nmat.org.in
First Published on September 29, 2018 3:35 am
Web Title: article about mba admission opportunity

शब्दबोध एखाद्याची ख्यालीखुशाली विचारणे यासाठी ‘मिजाज- खुशी’ असा शब्दप्रयोग हिंदीत वापरला जातो.

शब्दबोध

एखाद्याची ख्यालीखुशाली विचारणे यासाठी ‘मिजाज- खुशी’ असा शब्दप्रयोग हिंदीत वापरला जातो.


डॉ. अमृता इंदुरकर
मिजास
मूळ अरबी शब्द आहे ‘मिझाज्’ म्हणजे प्रकृती, तब्येत, बुद्धी. लखनौसारख्या हिंदी बहुसंख्य भागात आजही, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची ‘जनाब आपका मिझाज कैसा है?’ अशा पद्धतीने चौकशी करते. एखाद्याची ख्यालीखुशाली विचारणे यासाठी ‘मिजाज- खुशी’ असा शब्दप्रयोग हिंदीत वापरला जातो.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी नमूद केल्याप्रमाणे – ‘खैर आफियत् मिजाज- खुशीचे वर्तमान पुसिले.’ यावरून हे स्पष्ट होते की शिवकाळापर्यंत मराठीत मिजास या शब्दाचा मूळ अरबी अर्थ कायम होता. पण नंतर साहित्यामध्ये मात्र या ‘मिजाज’चा ‘मिजास’ झाला. अभिमानी, गर्विष्ठ, ऐट, दिमाख दाखविणारे अशा अनेक अर्थानी मिजास हा शब्द वापरला जाऊ  लागला. ‘सत्तेवर आल्याबरोबर केवढी मिजास दाखवायला लागला तो!’ किंवा ‘वयाने आणि कर्तृत्वाने लहान असताना इतकी मिजास दाखवू नये’ इ. यावरून पुढे एखाद्या उदंड अभिमानी, अहंकारी व्यक्तीचे वर्णन करताना ‘तो फार मिजासखोर आहे.’ असाही शब्दप्रयोग रूढ झाला. सुप्रसिद्ध शाहीर प्रभाकर यांच्या पोवाडय़ामध्ये ‘घूत्कार धुन्द फुन्दात मिजाशित टाकी’ असे वर्णन आले आहे. म्हणजे एखाद्याच्या प्रकृतीची चौकशी करणे हा मूळ सभ्य अर्थ मागे पडून मिजास दाखवणे अशी मूळ अर्थच्युती झालेला अर्थ रूढ झाला.

मेणा
‘युवराजांच्या चौकशीसाठी राजमाता मेण्यात बसून तातडीने गडावर आल्या.’ ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये हमखास वाचनात येणारा हा शब्द. शिवाय मराठीत अनुवादित झालेले जे बंगाली साहित्य आहे त्या कादंबऱ्यांमध्येही – मेण्यात बसून ठाकुराईन जमीनदाराला भेटायला गेल्या असे उल्लेख येतात. मूळ फारसी शब्द ‘मियाना’ म्हणजे डोली किंवा पालखीसारखे परंतु चारी बाजूंनी बंद करता येईल असे पेटीवजा खांद्यावर वाहून न्यावयाचे वाहन. मराठीत यासाठी पालखी शब्द अधिक प्रचलित आहे. कालौघात मियानाचे उच्चारसुलभतेसाठी मेणा झाले. हा मेणा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय बऱ्याच अंशी जुन्या हिंदी-मराठी चित्रपटांना नक्कीच द्यायला हवे.
amrutaind79@gmail.com
First Published on September 29, 2018 3:32 am
Web Title: article about vocabulary words 3

एमपीएससी मंत्र : मराठीचे बोलू कौतुके.. पहिला संयुक्त पेपर आणि दुसरा पदनिहाय पेपर अशा स्वरूपात ही पहिलीच परीक्षा होत आहे

एमपीएससी मंत्र : मराठीचे बोलू कौतुके..

पहिला संयुक्त पेपर आणि दुसरा पदनिहाय पेपर अशा स्वरूपात ही पहिलीच परीक्षा होत आहे


सुनील शेळगावकर
पहिला संयुक्त पेपर आणि दुसरा पदनिहाय पेपर अशा स्वरूपात ही पहिलीच परीक्षा होत आहे. संयुक्त पेपर १मध्ये मराठी व इंग्रजी विषयांचा समावेश आहे. यातील मराठी घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
 अभ्यासपूर्व विश्लेषण –
परीक्षा योजना पाहता मराठी या विषयावर परीक्षेत विचारला जाणारा एक प्रश्न एका गुणासाठी आहे. प्रश्नांचा दर्जा बारावी असा दिल्यामुळे एखाद्या संकल्पनेचे किंवा व्याकरण घटकाचे उप-उपप्रकार अभ्यासले नाही तरी चालतील असे लक्षात येते. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न स्वरूप असल्यामुळे पाठांतराला जास्त महत्त्व द्यावे लागेल यात शंका नाही. या ठिकाणी पाठांतर म्हणजे संकल्पना समजून घेऊन लक्षात ठेवणे होय.
अभ्यासक्रम – मराठीच्या या ६० प्रश्नांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढील अभ्यासक्रम निश्चित केला आहे.
सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
अभ्यासपूर्ण प्रश्नसंख्या विश्लेषण –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागील इतर परीक्षांचे व समान काठिण्यपातळीच्या अभ्यासक्रमाचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, सर्वसामान्य शब्दसंग्रहावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या सर्वाधिक आहे (सुमारे २० प्रश्न), त्या खालोखाल मराठी व्याकरणावर प्रश्न विचारलेले आढळतात (सुमारे १५-२० प्रश्न), तद्नंतर वाक्यप्रकार आणि म्हणी व वाक्प्रचार यावर समसमान (सुमारे १० प्रश्न) विचारलेले आढळतात, तर एका उताऱ्यावरील पाच प्रश्न विचारले जातात. (हा आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पाहून व्यक्त केलेला अंदाजे विचार आहे.)

अभ्यासक्रमातील घटक व उपघटक – वरील अभ्यासक्रमात पुढील घटक व उपघटकांचा समावेश असतो.
सर्वसामान्य शब्दसंग्रह – या घटकांतर्गत शब्दसिद्धी (सिद्ध व साधित शब्द संकल्पना आणि उदाहरणे) वैशिष्टय़पूर्ण शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दार्थ, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, पारिभाषिक शब्द या उपघटकांचा समावेश होतो.
वाक्यरचना – या विषयीचा व्याकरण शिकण्याचा भाग पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शक्य तेवढय़ा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका यातील उपघटकांनुसार सरावासाठी सोडवा.
व्याकरण – या घटकांतर्गत वर्णविचार (वर्णमाला, वर्णप्रकार, वर्णाची उच्चारस्थाने), शब्दविचार (शब्दाच्या जाती, शब्दाचे विकरण म्हणजे लिंग, वचन, विभक्ती व काळ.)
म्हणी व वाक्प्रचार आणि त्यांचा वाक्यातील उपयोग – या घटकांतर्गत ५ वी ते १२ वीपर्यंतच्या मराठी पुस्तकातील यांचा साठा, दैनंदिन व्यवहार व बोली भाषेतील शब्दसामर्थ्यांचा समावेश होतो.
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे- आपल्या परीक्षेसाठी काठिण्यपातळी बारावी असल्यामुळे उताऱ्यातील भाषा सोपी असते, मात्र उताऱ्याची लांबी जास्त असेल असा अंदाज आहे. आपणास परीक्षेत एका उताऱ्यावरीलच प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. (यात बदल होऊ शकतो.)
असा करावा अभ्यास – मराठी हा विषय आपल्या स्पर्धापरीक्षेतील पकीच्या पकी गुण देणारा विषय आहे. जाणीवपूर्वक आणि नियोजनपूर्वक प्रयत्न केल्यास त्यात आपण नक्की यशस्वी होऊ. चला तर मग मराठीचा अभ्यास पुढीलप्रमाणे करा.
सर्वसामान्य शब्दसंग्रह – डिक्शनरीप्रमाणे त्या त्या उपगटातील शब्दांची मांडणी वर्णाच्या चढत्या क्रमाने करून ते शब्द स्वत लिहून काढा. लिहिल्यानंतर त्यांचे वर्गीकरण करून समजून घेऊन रोज थोडय़ा थोडय़ा शब्दधनाचे पाठांतर करा.
वाक्यरचना – याविषयीचा व्याकरण शिकण्याचा भाग पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शक्य तेवढय़ा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका यातील उपघटकांनुसार सरावासाठी सोडवा.
व्याकरण – व्याकरणातील घटक व उपघटक यांचा कोणत्याही एका चांगल्या व्याकरणाच्या पुस्तकातून सर्वप्रथम अभ्यास पूर्ण करा. नंतर झालेला अभ्यास टिपणांच्या व तक्त्यांद्वारे पुनर्वाचनासाठी तयार करा. मागील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून प्रश्नाचे स्वरूप, प्रश्नाची काठिण्यपातळी समजावून घ्या. नंतर तत्सम सराव करण्यावर भर द्या.
म्हणी व वाक्प्रचार – सर्वप्रथम याची एक यादी तयार करून घ्या. अर्थ लक्षात आल्यानंतर त्यांचा वाक्यातील योग्य उपयोग कसा करावा किंवा ओळखावा हे लक्षात येईल. यासाठी वाक्याचा अर्थ समजणे महत्त्वाचे असते.
उताऱ्यावरील प्रश्न – यासाठी सराव अधिक महत्त्वाचा आहे. सरळ सेवा भरती, दुय्यम सेवा, इतर गट ‘ब’, व
गट ‘क’ पदांच्या परीक्षेत आलेली उतारे पहिल्यांदा वेळ न लावता सोडवा. नंतर उतारे सोडविण्याची तुमची पद्धती पक्की झाल्यास वेळ लावून उतारे सोडविण्याचा प्रयत्न करा.
यशाची चतु:सूत्री – अभ्यासक्रमातील घटक व उपघटक यांचे पहिल्यांदा आकलन होईपर्यंत वाचन करा. वाचनानंतर शब्दधनाचे आकलन होईपर्यंत वाचन करा. वाचनानंतर शब्दधनाचे संकलन व पाठांतर वाढवा. जुन्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांतून घटकवार प्रश्न सोडविण्याचा सराव करा. सरावाअंती स्वत:ची घटकवार टिपणे तयार करा.
अभ्याससाहित्य  –
सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी व वाक्प्रचार आणि शब्दविचार – शब्दधन, लाइफ पब्लिकेशन, पुणे.
वाक्यरचना व मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे, नितीन प्रकाशन, पुणे.
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभ्याससाहित्य कोणाचे वाचतो यापेक्षा महत्त्वाचे आहे, की त्यात चुका तर नाहीत ना. शिवाय  पूर्ण अभ्यासक्रम सापडणे महत्त्वाचे असते.
महाराष्ट्र ‘गट-क’ सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २०१८
गट क सेवेच्या बदललेल्या स्वरूपाबाबत तसेच नव्या अभ्यासक्रमाबाबत या स्तंभामध्ये यापूर्वी चर्चा करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क व कर सहाय्यक या गट क सेवांसाठीच मुख्य परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत प्रस्तावित आहे.
First Published on September 28, 2018 4:33 am
Web Title: article about appreciation of marathi
94
Shares

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम मराठी, हिंदी, उर्दू व हिंदी माध्यम. पदविका- पत्रकारिता व जनसंज्ञापन, मूल्य व आध्यात्मिक शिक्षण, मूल्य व आध्यात्मिक शिक्षण.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम

मराठी, हिंदी, उर्दू व हिंदी माध्यम. पदविका- पत्रकारिता व जनसंज्ञापन, मूल्य व आध्यात्मिक शिक्षण, मूल्य व आध्यात्मिक शिक्षण.

 द.वा.आंबुलकर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या खालील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत. –
१) मानव्य विद्या व सामाजिकशास्त्राचे विद्याशाखा –
प्रमाणपत्र – पूर्वतयारी- मराठी, हिंदी, उर्दू व हिंदी माध्यम. पदविका- पत्रकारिता व जनसंज्ञापन, मूल्य व आध्यात्मिक शिक्षण, मूल्य व आध्यात्मिक शिक्षण.अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा- मूल्य व आध्यात्मिक शिक्षण. पदवी- बीए- जनरल, पत्रकारिता व जनसंज्ञापन, उर्दू, ग्रंथालय शास्त्र, मूल्य व आध्यात्मिक शिक्षण.
पदव्युत्तर पदवी- एमए- मराठी, हिंदी, इंग्रजी व ग्रंथालयशास्त्र.
२) वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा-
पदविका- सरकारी व्यवस्थापन, बँकिंग,
ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम.
पदवी- बीकॉम- मराठी, इंग्रजी माध्यम, सहकार व्यवस्थापन, बीबीए- ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम.
पदव्युत्तर पदवी- एमकॉम, एमबीए, ह्युमन रिसोर्सेस, फायनान्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग
३) विज्ञान आणि तंत्रज्ञान
पदवी- बीएससी (गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र)
पदव्युत्तर पदवी- एमएससी-  गणित, पर्यावरणशास्त्र.
४) आरोग्य विज्ञान विद्याशाखा-
प्रमाणपत्र- आरोग्यमित्र, रुग्ण-साहाय्यक.
पदविका- प्रयोगशाळा साहाय्यक, योग्य शिक्षक.
पदवी- बीएससी- प्रयोगशास्त्र तंत्रज्ञान.
५) संगणकशास्त्र- विद्याशाखा
प्रमाणपत्र- बालसंगोपन, स्वयंसाहाय्यता गट, प्रेरिका, मूल्य शिक्षण, घरकामगार कौशल्य.
पदविका- शालेय व्यवस्था.
पदव्युत्तर पदवी- एमए- शिक्षणशास्त्र.
६) शैक्षणिक सेवा विभाग –
प्रमाणपत्र- मानवी हक्क, संगणक प्रशिक्षण.
पदविका- गांधी विचार दर्शन
पदवी- बीए (ग्राहकसेवा)
पदव्युत्तर पदवी- एमए व एमएससी
अधिक माहिती व तपशील- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक महिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जाहिरात पाहावी अथवा मुक्त विद्यापीठाच्या  http://ycmou.digitaluniversity.ac/ अथवा https://www.ycmou.ac.in/ या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख– संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१८.
First Published on September 28, 2018 4:31 am
Web Title: article about yashwantrao chavan maharashtra open university syllabus

यूपीएससीची तयारी : राज्यव्यवस्था विषयाची तयारी संविधान, राज्यव्यवस्था, समाजिक न्याय, कारभारप्रक्रिया व आंतरराष्ट्रीय संबंध या पाच घटकांचा समावेश आहे.

यूपीएससीची तयारी : राज्यव्यवस्था विषयाची तयारी

संविधान, राज्यव्यवस्था, समाजिक न्याय, कारभारप्रक्रिया व आंतरराष्ट्रीय संबंध या पाच घटकांचा समावेश आहे.


प्रविण चौगुले
प्रस्तुत लेखापासून आपण यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-२ या पेपरच्या तयारीविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम या पेपरमध्ये समाविष्ट अभ्यास घटकांचा थोडक्यात आढावा घेऊ. यामध्ये प्रामुख्याने संविधान, राज्यव्यवस्था, समाजिक न्याय, कारभारप्रक्रिया व आंतरराष्ट्रीय संबंध या पाच घटकांचा समावेश आहे.
आजच्या लेखामध्ये भारतीय संविधान या अभ्यास घटकाविषयी जाणून घेऊ या. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून हा घटक पूर्व व मुख्य या दोन्ही टप्प्यांमध्ये महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट होते. या घटकाची तयारी ब्रिटिश राजवटीमध्ये झालेल्या संविधानाच्या विकासापासून करावी लागते. ब्रिटिशांनी १७७३साली केलेला नियामक कायदा ते १९३५ सालच्या भारत सरकार कायद्यापर्यंत जो ऐतिहासिक आधार तयार झाला त्याविषयी जाणून घ्यावे. तसेच भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान, प्रमुख नेत्यांनी स्वतंत्र भारतासाठी कशा प्रकारचे संविधान असावे याविषयी वेळोवेळी घेतलेला पुढाकार अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. उदा. नेहरू रिपोर्ट यासोबतच संविधानसभेची स्थापना, उद्दिष्टांचा ठराव, घटनानिर्मितीची प्रक्रिया, घटनेवरील प्रभाव, २६ जानेवारी १९५०मध्ये प्रचलनात येईपर्यंत झालेला विकास याचा मागोवा घेणे श्रेयस्कर ठरते.
संविधानाची तयारी करण्यापूर्वी ठळक वैशिष्टय़े जाणून घ्यावीत. या वैशिष्टय़ांमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, जनतेचे सार्वभौमत्व, संसदीय लोकशाही, संघराज्यीय स्वरूप, घटनादुरुस्ती प्रक्रियेतील लवचीकता व ताठरता यांचा मेळ, आणीबाणीविषयक तरतूद, एकल नागरिकत्व या बाबींसोबतच मूलभूत अधिकार, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये आदी वैशिष्टय़पूर्ण तरतुदींचा समावेश होतो. संविधान निर्मिती प्रक्रियेदरम्यान घटनाकर्त्यांनी भारतातील आíथक, सामाजिक व राजकीय परिस्थिती ध्यानात घेऊन घटनेमध्ये आवश्यक त्या तरतुदींचा समावेश केला. परिणामी आपले संविधान विस्तृत बनले.

संविधानाच्या वैशिष्टय़ांसोबतच मूलभूत संरचना समजून घेणे आवश्यक ठरते. मूलभूत संरचनेशी संबंधित केशवानंद भारती खटला तसेच मूलभूत संरचनेमध्ये समाविष्ट तरतुदी अभ्यासाव्यात.
भारतामध्ये संसदीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संसद, राज्य विधिमंडळ त्यांची रचना, काय्रे, सभागृहातील कामकाज, अधिकार, विशेष हक्क, संसदेतील विविध समित्या, कायदे करण्याची प्रक्रिया व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संसदेची समर्पकता यांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. या घटकाशी संबंधित समकालीन घडामोडी जसे विधेयकांची संख्या, विरोधी पक्षांची भूमिका, संसदेतील चर्चाचा खालावत जाणारा दर्जा याविषयी माहिती ठेवावी.
कायदे मंडळासोबत कार्यकारी मंडळाची रचना यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ अशी केंद्रपातळीवरील रचना तर राज्यपातळीवरील राज्यपाल, मुख्यमंत्री यांचा समावेश होतो. कार्यकारी मंडळाचे कार्य, संघटन, विविध मंत्रालये, विभाग यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. अलीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेदरम्यान राज्यपालांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. या पाश्र्वभूमीवर चालू घडामोडींची सांगड घालणे उचित ठरेल.
यासोबतच लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणवल्या जाणाऱ्या न्यायमंडळाचा अभ्यास करताना रचना, संघटना, काय्रे यासंबंधी जाणून घ्यावे. न्यायमंडळाचा अभ्यास चालू घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर करणे श्रेयस्कर ठरते. उदा. अलीकडे न्यायमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये अधिकार क्षेत्रावरून अप्रत्यक्षपणे सुरू असणारा वाद, कॉलेजियम पद्धत, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आदी बाबींचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.
कोणत्याही संविधानामध्ये काळानुरूप बदल करणे महत्त्वाचे ठरते. भारताच्या राज्यघटनेमध्ये आजतागायत १०१ घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. घटनेच्या ३६८ व्या कलमामध्ये घटनादुरुस्तीची तरतूद नमूद केलेली आहे. कलम ३६८ मधील घटनादुरुस्तीच्या तरतुदी अभ्यासाव्यात व आजवर झालेल्या घटनादुरुस्त्यांमध्ये महत्त्वाच्या घटनादुरुस्तीची सविस्तर माहिती घ्यावी.
राज्यघटनेमध्ये विविध संविधानिक संस्थांची तरतूद आहे – निवडणूक आयोग, वित्त आयोग, संघ लोकसेवा आयोग, तसेच महालेखापाल, महाधिवक्ता यासारखी पदे, त्यांची नियुक्ती, रचना, काय्रे अधिकार व जबाबदाऱ्या अभ्यासाव्यात.
भारतीय संविधानाच्या अध्ययनाकरिता ‘इंडियन पॉलिटी’ एम. लक्ष्मीकांत, भारतीय संविधान व राजकारण – तुकाराम जाधव आणि महेश शिरापूरकर कॉन्स्टिटय़ूशन ऑफ इंडिया – पी. एम. बक्षी, आपली संसद-सुभाष कश्यप हे संदर्भग्रंथ उपयोगी ठरतात. या घटकाच्या मूलभूत आकलनाकरिता डेमोकट्रिक पॉलिटिक्स भाग १ आणि इंडियन कॉन्स्टिटय़ूशन अँट वर्क्‍स आदी एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके वापरावीत. तसेच या विषयासंबंधीच्या चालू घडामोडींचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस इ. वृत्तपत्रे, http://www.prsindia.org/  हे संकेतस्थळ व  राज्यसभा टीव्हीवरील कार्यक्रम पाहणे श्रेयस्कर ठरेल.
First Published on September 27, 2018 4:21 am
Web Title: article about preparation of state administration

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्जदार विद्यार्थी मुसलमान, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी वा जैन यासारख्या अल्पसंख्याक जमातीचा असावा.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती 

अर्जदार विद्यार्थी मुसलमान, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी वा जैन यासारख्या अल्पसंख्याक जमातीचा असावा.


द.वा.आंबुलकर
केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयातर्फे भारत सरकारद्वारा सूचित सहा अल्पसंख्याक जमातींच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दहावीपूर्व व दहावीनंतरच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती- २०१८-१९ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
*    आवश्यक पात्रता- अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत.
अर्जदार विद्यार्थी मुसलमान, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी वा जैन यासारख्या अल्पसंख्याक जमातीचा असावा. अर्जदाराच्या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्षांचा असावा व त्यांनी त्यासाठी देशांतर्गत विद्यापीठ महाविद्यालय वा शाळा यांसारख्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. अर्जदार विद्यार्थ्यांनी मागील वार्षिक परीक्षेत किमान ५०% गुण प्राप्त केलेले असावेत. अर्जदाराचे स्वत:चे व प्रचलित बँक खाते असायला हवे.
*    अधिक माहिती व तपशील – शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाची जाहिरात पाहावी अथवा अल्पसंख्याक मंत्रालयाच्या https://scholarships.gov.in/ अथवा  http://www.minorityaffairs.gov.in/  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
*    अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने प्रथम अर्जदार अथवा ज्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी २०१७-१८ मध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे अशांनी शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१८.
First Published on September 27, 2018 4:19 am
Web Title: educational scholarship for minority students

संशोधन संस्थायण : संशोधनाची पंढरी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे एनआयआयएसटी हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

संशोधन संस्थायण : संशोधनाची पंढरी

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे एनआयआयएसटी हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.


प्रथमेश आडविलकर
नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इंटरडिसीप्लिनरी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, तिरुअनंतपुरम.
itsprathamesh@gmail.com
केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे असलेली नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इंटरडिसीप्लिनरी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (एनआयआयएसटी) ही देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. अ‍ॅग्रोप्रोसेसिंगपासून प्रोसेस इंजिनीअिरग, एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजी इत्यादी आंतरविद्याशाखीय वैविध्य असणाऱ्या विषयांमध्ये ही संस्था संशोधन करते. तिची स्थापना १९७५ साली झाली असून, आपल्या संशोधन कार्याचा सर्वसामान्यांपर्यंत प्रसार करण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे एनआयआयएसटी हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.
 संस्थेविषयी 
नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इंटरडिसीप्लिनरी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी(एनआयआयएसटी) म्हणजेच राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्था ही सुरुवातीला १९७५मध्ये सीएसआयआर कॉम्प्लेक्स म्हणून स्थापित करण्यात आली. नंतर १९७८ साली या संस्थेला केरळ राज्याच्या प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळेचा दर्जा देण्यात आला म्हणून संस्थेचे नाव बदलून रिजनल रिसर्च लॅबोरेटरी तिरुअनंतपुरम असे करण्यात आले. नंतर २००७ मध्ये पुन्हा एकदा संस्थेचे नामकरण एनआयआयएसटी असे करण्यात आले.
देशात उपलब्ध असलेले स्रोत प्रभावीपणे वापरणे आणि मूलभूत महत्त्व असलेल्या क्षेत्रातील उच्च गुणवत्तेचे संशोधन करणे या हेतूने संस्था कार्यरत आहे. संस्थेने संशोधन क्षेत्रात प्रगत संशोधन करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा स्थापन केल्या आहेत. मसाल्यांच्या आणि तेलबियांच्या क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण तसेच त्यांच्या प्रक्रिया आणि उत्पादनाच्या विकासासाठी आवश्यक सोयीसुविधा संस्थेमध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत. संस्था करत असलेल्या संशोधनावर आधारित एकूण २५२ विद्यार्थ्यांना आतापर्यंत पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आलेली आहे. संस्थेमध्ये आजघडीला सुमारे ६० शास्त्रज्ञ आणि २०० रिसर्च फेलो विविध संशोधन विषयांत कार्यरत आहेत.

आपल्या संशोधनामध्ये मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञान विकास आणि व्यावसायीकरण यांचे मिश्रण संस्थेने केलेले आहे. त्यामुळेच संस्था संशोधनाव्यतिरिक्त प्रादेशिक स्रोतांवर आधारित विविध क्रियाकलाप आणि आर अ‍ॅण्ड डी – उद्योग व शैक्षणिक वातावरणात सहज संचार करत असते.
संशोधनातील योगदान 
एनआयआयएसटी ही मूलभूत विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. ही संस्था पर्यावरण तंत्रज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि अभियांत्रिकी इत्यादी शाखांमधील संशोधनाच्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय संशोधन करत आलेली आहे. इनऑरगॅनिक मटेरियल्स, ऑरगॅनिक केमिस्ट्री, फोटोसायन्सेस अ‍ॅण्ड फोटॉनिक्स, नॅनोसिरॅमिक्स, एनर्जी मटेरियल्स, पॉलीमेरिक मटेरियल्स, इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स, मॅग्नेटिक मटेरियल्स, फंक्शनल मटेरियल्स अ‍ॅण्ड मिनरल्स, मेटॅलिक मटेरियल्स सेक्शन्स, अ‍ॅग्रोप्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी, मायक्रोबियल प्रोसेस अँड टेक्नॉलॉजी, मटेरियल्स सायन्स, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, प्रोसेस इंजिनीअिरग अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजी, केमिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये प्रामुख्याने आपले संशोधन आणि विकासकार्य करणारी ही प्रयोगशाळा आहे. संस्थेने विविध उद्योगातील देश-विदेशातील अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. एनआयआयएसटी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन संस्था व आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्राशी संलग्न आहे. एनआयआयएसटीमधील शास्त्रज्ञांनी आतापर्यंत जवळपास दोनशे आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच ८ भारतीय पेटंट्स तर ९ विदेशी पेटंट्स दाखल केले आहेत. संस्थेच्या लक्षवेधी संशोधनांमध्ये औद्योगिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण एंझाइम, बायोफ्यूल्स आणि बायोपॉलिमर्सच्या उत्पादनासाठी जैव -आधारित प्रक्रिया आणि उत्पादनांचा विकास तसेच तेलाच्या उत्पादनांमध्ये, उत्पादनांचे मूल्यमापन इको – फ्रेंडली प्रक्रिया स्वरूपात कसे करता येईल याचे संशोधन आणि मसाले व तेल वनस्पती इत्यादी उत्पादनांमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करणे इत्यादी बाबींचा समावेश करता येईल.
विद्यार्थ्यांसाठी संधी
एनआयआयएसटीने विद्यार्थ्यांसाठी
पदव्युत्तर व पीएच.डी. या स्तरावर अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. यामध्ये मग  सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार एनआयआयएसटीमध्ये academy of Scientific & Innovative Research (AcSIR)) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. दरवर्षी विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.
संपर्क 
नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर इंटरडिसीप्लिनरी
सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी
इंडस्ट्रियल इस्टेट, पप्पनमकोडे,
तिरुअनंतपुरम, केरळ – ६९५०१९
दूरध्वनी  + ९१- ४७१- २५१ ५२२६.
ई-मेल – director@niist.res.in
संकेतस्थळ  – http://www.niist.res.in/
First Published on September 27, 2018 4:17 am
Web Title: article about national institute for interdisciplinary science and technology