Tuesday, July 16, 2019

यूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो

यूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत

सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो

– श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना भारताची फाळणी, तिचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूंचे परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व याच्याशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड-बांग्लादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी-वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी; पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिक वादाचे राजकारण तसेच या सर्व घटकाशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने तयारी करावी लागते. या घटकातील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत म्हणजे येथून पुढे होणाऱ्या मुख्य परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या घटकाची सर्वप्रथम मूलभूत माहिती अभ्यासणे गरजेचे आहे.
या घटकावर २०१३ ते २०१८ मध्ये एकूण सात प्रश्न विचारण्यात आले आहेत.
ते पुढीलप्रमाणे –
* विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उदेशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा.
* ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा.
* कोणत्या परिस्थितीमुळे १९६६चा ताश्कंद करार करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ांची चर्चा करा.
* कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उदयामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली, याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा.
* लेनिन याच्या १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणाने, भारताने स्वातंत्र प्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना प्रभावित केलेले होते. मूल्यांकन करा.
* भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का ?
* स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनुसूचित जमाती
(STs)विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी, कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले?
या प्रश्नांचे योग्य आकलन करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन उपरोक्त प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र प्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकातील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. उपरोक्त प्रश्नांमधील ‘भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला दृढता मिळालेली आहे का?’ हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी भाषावार प्रांत रचना का करण्यात आलेली होती, त्याची कोणती कारणे होती आणि नेमका इतिहास काय आहे? यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व याची उद्दिष्टे यांसारख्या पलूंचा एकत्रित विचार करून उदाहरणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.
उपरोक्त प्रश्नांमधील दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धाच्या पाश्र्वभूमीला ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत. या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपल्याला भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी, तत्कालिक कारणे, ताश्कंद कराराची वैशिष्टे काय होती याबाबत सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे लिहिता येत नाहीत. थोडक्यात हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.
वरील प्रश्नांमध्ये भूदान व ग्रामदान चळवळीवरील प्रश्न तसेच ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याशी संबंधित प्रश्न हे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करून नेमकी यांची तत्कालीन सामजिक आणि आर्थिक विकासामध्ये उपयुक्तता काय होती आणि यामुळे काय साध्य झाले, या पलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित आहे. याचबरोबर भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जे धोरण आखलेले होते त्यावर लेनिनच्या १९२१च्या नवीन आर्थिक धोरणाचा प्रभाव कसा होता हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित होते. या सर्व प्रश्नांच्या चच्रेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आणि याची उत्तरे नेमकी कशी लिहावीत याची दिशा मिळते.
संदर्भ साहित्य
सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता १२वीचे राज्यशास्त्राचे ‘पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडस’ हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करण्यासाठी बिपन चंद्र लिखित ‘इंडिया आफ्टर इंडिपेंडस’ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात.
First Published on July 16, 2019 3:42 am
Web Title: upsc exam preparation tips upsc exam 2019 zws 70 2

विद्यापीठ विश्व : इंग्लंडमधील शिक्षणकेंद्र मँचेस्टर विद्यापीठाकडून विविध स्वरूपात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते.

विद्यापीठ विश्व  : इंग्लंडमधील शिक्षणकेंद्र

मँचेस्टर विद्यापीठाकडून विविध स्वरूपात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते.

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
युनिव्हर्सिटि ऑफ मँचेस्टर
विद्यापीठाची ओळख
इंग्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विद्यापीठ म्हणजे ‘युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर’ हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले एकोणतीसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. २००४ साली ‘युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ आणि ‘व्हिक्टिोरिया युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर’ या दोन संस्थांना एकत्र करून ‘युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर’ची स्थापना केली गेली. तसा मात्र विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास एकोणिसाव्या शतकापर्यंत जातो. ‘नॉलेज, विस्डम अ‍ॅण्ड ह्य़ुमॅनिटी’ हे मँचेस्टर विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. विद्यापीठामध्ये तीन प्रमुख शैक्षणिक व संशोधन विभाग आहेत. मँचेस्टर विद्यापीठामध्ये जवळपास चाळीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत तर जवळपास चार हजार प्राध्यापक-संशोधक वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत आहेत. उच्चशिक्षणासाठी जगातील १६० पेक्षाही अधिक देशांमधील विद्यार्थ्यांचा ओढा या विद्यापीठाकडे आहे.
अभ्यासक्रम
मँचेस्टर विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम तीन किंवा चार वर्षांच्या कालावधीचे आहेत. काही पदवी व पदव्युत्तर एकात्मिक अभ्यासक्रम पाच वर्षांच्या कालावधीचेदेखील आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम हे एक, दोन किंवा तीन वर्षांच्या कालावधीचे आहेत. दोन्ही स्तरांवर फॅकल्टी ऑफ बायोलॉजी, मेडिसिन अ‍ॅण्ड हेल्थ, फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीयिरग, फॅकल्टी ऑफ ह्य़ुमॅनिटीज हे तीन प्रमुख विभाग आहेत. या सर्व विभागांमधून जवळपास एक हजार अभ्यासक्रम पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरल स्तरावर अभ्यासले जातात. फॅकल्टी ऑफ बायोलॉजी, मेडिसिन अ‍ॅण्ड हेल्थ अंतर्गत ऑडीओलॉजी, बायोसायन्सेस, डेंटिस्ट्री, मेडिसिन, नìसग, मिड वाईफरी अ‍ॅण्ड सोशल वर्क, ऑप्टॉमेट्री अ‍ॅण्ड ऑप्थॅल्मॉलॉजी, फार्मसी, सायकोलॉजी, स्पीच अ‍ॅण्ड लँग्वेज थेरपी इत्यादी विषय येतात. तर फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग अंतर्गत गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, केमिकल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिटिकल सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, अर्थ अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्स, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनीयिरग, मटेरियल्स हे विभाग येतात. फॅकल्टी ऑफ ह्य़ुमॅनिटीज अंतर्गत लॉ, सोशल सायन्सेस, एन्व्हायर्नमेंट, एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, आर्ट्स लँग्वेजेस अ‍ॅण्ड कल्चर्स आणि बिझनेस हे विभाग येतात. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक स्तराप्रमाणे विद्यापीठातील प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा वेगवेगळ्या असतील. प्रवेश परीक्षांसह विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.
सुविधा
मँचेस्टर विद्यापीठाकडून विविध स्वरूपात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती आणि टय़ूशन फी वेव्हर म्हणजेच शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. विद्यापीठाने आपल्या परिसरातील वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील निवासासाठी लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. याशिवाय विद्यापीठाचे ‘अकोमोडेशन ऑफिस’ विद्यार्थ्यांना ऑफ कॅम्पस हाउसिंग किंवा तात्पुरती राहण्याची सोय यांसारख्या निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच कॅफेटेरिया व रेस्टॉरंट्स आहेत. क्रीडा, आरोग्य, हेल्थ इन्शुरन्स, ग्रंथालय इत्यादी सुविधांसह मँचेस्टर विद्यापीठाच्या परिसरात मँचेस्टर म्युझियम, व्हाइटवर्थ आर्ट गॅलरी, जॉन रेलँड्स लायब्ररी, लॉवेल दुर्बीण आणि जॉर्डेल बँक ऑब्झव्‍‌र्हेटरी इत्यादी वास्तू आहेत.
वैशिष्टय़
युरोपीय विद्यापीठांमध्ये मँचेस्टर विद्यापीठ हे नेहमीच पहिल्या दहा क्रमांकामध्ये  राहिलेले आहे. विद्यापीठाच्या संशोधनाला जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे. संशोधनासाठी ब्रिटिश विद्यापीठांनी स्थापन केलेल्या ‘रसेल ग्रुप’ या सदस्यांपैकी एक मँचेस्टर विद्यापीठ आहे. कदाचित त्यामुळेच ब्रिटनमधील औद्योगिक क्षेत्राकडून सर्वाधिक अनुदान मिळवलेली संस्था म्हणजे मँचेस्टर विद्यापीठ आहे. नुकत्याच एका सर्वेक्षणानुसार विद्यापीठाच्या दहा पदवीधर विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी थेट पुढील उच्चशिक्षण किंवा रोजगाराची संधी मिळवतात. मँचेस्टर विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या विद्यार्थी व प्राध्यापकवर्गापैकी २५ नोबेल विजेते आहेत. सध्या यांपैकी चार नोबेल पारितोषिक विजेते विद्यापीठामध्ये अध्यापन-संशोधन करत आहेत. जॉन डाल्टन आणि अन्रेस्ट रुदरफोर्ड हे प्रख्यात शास्त्रज्ञ या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होत.
संकेतस्थळ  https://www.manchester.ac.uk/
First Published on July 16, 2019 3:38 am
Web Title: the university of manchester zws 70

प्रश्नवेध यूपीएससी : भूगोल स्वरूप आणि प्रश्न आजपासून पुढील लेखांमध्ये आपण भूगोल विषयातील घटकांनुसार जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न व त्यासंबंधीची रणनीती पाहणार आहोत.

प्रश्नवेध यूपीएससी : भूगोल स्वरूप आणि प्रश्न

आजपासून पुढील लेखांमध्ये आपण भूगोल विषयातील घटकांनुसार जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न व त्यासंबंधीची रणनीती पाहणार आहोत.

डॉ. अमर जगताप
मागील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययनातील भूगोल विषयाची रणनीती पाहिली. आजपासून पुढील लेखांमध्ये आपण भूगोल विषयातील घटकांनुसार जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न व त्यासंबंधीची रणनीती पाहणार आहोत.
सामान्यत: भूगोलाचा अभ्यास करताना पुढील प्रमुख घटक आढळतात –
(१) प्राकृतिक रचना, (२) हवामान,
(३) नदीप्रणाली, (४) मृदा, (५) वने, (६) कृषी, (७) उद्योग, (८) नसíगक साधनसंपत्ती (विशेषत: ऊर्जा, खनिज, जल इ.), (९) लोकसंख्या,
(१०) वसाहत, (११) पर्यावरण वनसíगक आपत्ती.
या प्रत्येक घटकातील प्रश्नाचा आढावा आपण घेणार आहोत. यापकी प्राकृतिक  रचना या घटकापासून आपण सुरुवात करू. या घटकावर गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये पुढील प्रश्न विचारण्यात आले होते.
(1) The Himalayas are highly prone to landslides. Discus the causes and suggest suitable measures of mitigation. (2016 – 12 marks)
(2) Explain the formation of thousands of islands in Indonesian and Philippines archipelagos.  (2012 – 10 marks)
(3) Why are the worldls fold mountains systems located along the margins of continents? Bring out the association between the global distribution of fold mountains and the earthquakes and volcanoes. (2014 – 10 marks)
(4)  There is no formation of Deltas by rivers of the Western Ghats.  (2013 – 5 marks)
(5)  Bring out the causes for more frequent occurrence of landslides in the Himalaya, than is the Western Ghats. (2013 – 5 marks)
वरील पाच प्रश्नांचा विचार केल्यास असे स्पष्ट होते की, पहिला व पाचवा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे; तर उर्वरित तिन्ही प्रश्न मूलभूत संकल्पनांवर आधारित आहेत. थोडक्यात प्राकृतिक रचना घटकावर संकल्पनात्मक प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. जर त्या कालावधीत एखादी घटना की जो भूरूपशास्त्रीय प्रक्रियांशी संबंधित घडली तर त्यावर चालू घडामोडींच्या स्वरूपात निश्चितच प्रश्न विचारला जातो.
प्रश्न क्र.१ – हा प्रश्न थेट स्वरूपाचा व वर्णनात्मक आहे. हिमालयामध्ये वारंवार घडणाऱ्या भूस्खलनाच्या पाश्र्वभूमीवर हा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तराचे दोन प्रमुख भाग असतील व दोन्हीस समान गुण असतील. प्रथम हिमालयामध्ये भूस्खलनाचा धोका जास्त का आहे याचे कारणासह स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व कारणांचा समावेश झाला पाहिजे.
उदा. (१) हिमालयाची उंची, त्यामुळे उताराची तीव्रता, (२) हिमालयातील खडकाचा प्रकार- स्तरीत खडक,
(३) हिमालयातील खडकावर कार्यरत तीव्र स्वरूपाची भूअंतर्गत बले- दाबजन्य बले- त्यामुळे येणारा ठिसूळपणा,
(४) हिमालयाच्या रांगांमधील पर्जन्याचे स्वरूप. या मुद्दय़ांचे स्पष्टीकरण शब्दांमध्ये संकल्पनात्मक रीतीने करणे आवश्यक आहे व सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या कारणांव्यतिरिक्त मानवी हस्तक्षेप, पर्यावरणाचा ऱ्हास. घटकांचा परिणाम विशद करावा. त्यानंतर प्रश्नाच्या उर्वरित भागामध्ये त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय स्पष्ट करावे. त्यामध्ये मूलभूत उपाय व प्राधान्याने मानवी हस्तक्षेप नियंत्रित करण्याचे मार्ग, वनीकरण, विकास प्रकल्प मर्यादित ठेवण्याचे मार्ग स्पष्ट करणे अपेक्षित आहे. थोडक्यात, पर्यावरण ऱ्हास व मानवी हस्तक्षेप याचा परिणाम ठळकपणे मांडणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र. ५ – हा प्रश्न देखील भूस्खलनाशी संबंधित आहे. मात्र या उत्तरामध्ये तुलनात्मक मुद्दे मांडणे आवश्यक आहे. उत्तरामध्ये पश्चिम घाट व हिमालयामधील भूस्खलनाशी संबंधित कारणे तुलनात्मक पद्धतीने मांडणे आवश्यक आहे. यामध्ये दोन्ही पर्वतांचा उतार, खडकांचा प्रकार, पर्वतांवर कार्यरत बले, पर्वतांमधील पर्जन्याचे स्वरूप, दोन्ही पर्वतांमधील मानवी हस्तक्षेप या घटकांचे तुलनात्मक स्पष्टीकरण आवश्यक आहे. उत्तराच्या समारोपामध्ये दोन्ही पर्वतांतील मानवी हस्तक्षेप व त्याचा परिणाम याबाबत मत मांडणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र. २, ३, ४ – या प्रश्नांचा विचार केल्यास हे प्रश्न थेट संकल्पनांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा चालू घडामोडींशी संबंध नाही. या प्रश्नांची उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांनी संबंधित संकल्पना, आवश्यक असल्यास तिचे उपयोजन अचूकपणे योग्य शब्दांमध्ये मांडणे आवश्यकअसते. या प्रश्नांची उत्तरे लिहिताना आकृती व नकाशा या दोन्हींचा वापर आवश्यक असतो.
प्रश्न क्र. 2 व 3 – हे दोन्ही प्रश्न भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतावर (Plate Tectonic Theory) आधारित आहेत. प्रश्न क्र. २ मध्ये उत्तराच्या पहिल्या परिच्छेदामध्येच या संकल्पनेचा उल्लेख असणे आवश्यक आहे. उत्तराच्या मुख्य भागामध्ये (गाभा) इंडोनेशिया व फिलिपाइन्स द्वीपकल्पांचे भूपट्टांच्या सीमेवरील स्थान, त्या ठिकाणची भूपट्टांची हालचाल, त्या प्रकारच्या हालचालींचा परिणाम आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करावा. तसेच नकाशावरदेखील तो प्रदेश व भूपट्टांच्या सीमा दाखवाव्यात. या उत्तरामध्ये आकृतीचे स्थान उत्तराचा मुख्य भाग (गाभा) सुरू करण्याआधी असावे. या सर्व स्पष्टीकरणामध्ये भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताची माहिती थोडक्यात, अचूक शब्दांत देणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र. ३ – हा प्रश्न देखील भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतावरच आधारित आहे. या प्रश्नामध्ये दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये घडीच्या पर्वतांचे स्थान व त्याच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी रॉकी, अँडीज या पर्वतांची उदाहरणे आकृती व नकाशासह देऊन, भूपट्टांची हालचाल कशा प्रकारे घडीच्या पर्वतांच्या निर्मितीस कारणीभूत ठरते हे सविस्तर स्पष्ट करणे अपेक्षित आहे. प्रश्नाच्या दुसऱ्या भागामध्ये घडीच्या पर्वतांचे स्थान व तेथील भूकंप, ज्वालामुखीचा धोका यांचा सहसंबंध स्पष्ट करावा. त्याकरिता हिमालय पर्वताचे उदाहरण देऊन आकृतीच्या साहाय्याने भूपट्ट हालचाल या घटनांना कशा प्रकारे कारणीभूत आहे ते स्पष्ट करावे.
वरील दोन्ही प्रश्नांमध्ये (प्रश्न क्र. २ व ३) उत्तरामध्ये तुटकपणा जाणवता कामा नये. उत्तर वाचताना आकृतीच्या मदतीने प्रक्रिया डोळ्यांसमोर उभी राहणे आवश्यकआहे. याकरिता लेखन कौशल्यावर भर देणे आवश्यक आहे.
प्रश्न क्र. 4 – हा प्रश्न देखील संकल्पनात्मकआहे. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सर्वप्रथम त्रिभूज निर्मितीस आवश्यक घटक कोणते आहेत त्याचे स्पष्टीकरण देऊन, हे घटक पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या नद्यांबाबत कसे प्रतिकूल आहेत याचे स्पष्टीकरण द्यावे. या प्रश्नामध्ये पश्चिम घाटातील नद्या असा उल्लेख आहे. त्यामुळे उत्तरामध्ये पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या व पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशेस वाहणाऱ्या नद्यांबाबत स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे.
वरील सर्व प्रश्न व त्याची संभाव्य उत्तरे, उत्तरांमधील घटक विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन त्यानुसार अभ्यासास योग्य दिशा द्यावी. पुढील लेखामध्ये आपण भूगोलामधील इतर घटकांमधील प्रश्नांबाबतची रणनीती याच प्रकारे अभ्यासणार आहोत.
First Published on July 13, 2019 12:59 am
Web Title: geography format and questions abn 97

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असतो.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असतो.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
दुय्यम सेवा (गट ब) मुख्य परीक्षा २८ जुलपासून सुरू होत आहे. या लेखापासून मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येईल.
मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक हा तिन्ही पदांसाठी संयुक्त पेपर आहे आणि पेपर दोन हा सामान्य क्षमता चाचणी आणि त्या त्या पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर आधारित वेगळा अभ्यासक्रम यांवर आधारित असेल. केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असतो.
एकूण दोनशे गुणांसाठी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या दोन प्रश्नपत्रिका असतात व त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.
या लेखामध्ये संयुक्त पेपरच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. तर पदनिहाय पेपरच्या तयारीबाबत स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल.
पेपर १ (संयुक्त पेपर) तयारी
*    मराठी व इंग्रजी
*   या पेपरच्या अभ्यासक्रमाचे व्याकरण, म्हणी-वाक्प्रचार आणि आकलन असे ढोबळ मानाने तीन भाग दिसून येतात. व्याकरणावरील प्रश्नांची तयारी करताना दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे नियम समजून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमामध्ये संधी, समास, अलंकार, शब्दरचना, काळ, वाक्य पृथक्करण अशा बाबींचा स्वतंत्र उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे व्याकरण या व्याख्येत जे येते त्याबाबत आपल्याला माहिती असणे आणि ही माहिती नेमकी व अचूक असणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.
*   मराठीतील विभक्ती प्रत्ययांचे कोष्टक, सामासिक शब्दांची उकल, महत्त्वाचे तत्सम, तद् भव आणि देशी शब्द पाठ करावेत आणि त्यांचे नियम व्यवस्थित समजून घ्यावेत. इंग्रजीमधील काळ व प्रयोगांच्या वाक्यरचनेचा टेबल, तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषांसाठीचे कोष्टक आणि महत्त्वाच्या क्रियापदांची, past participle, past perfect participle  यांचे कोष्टक पाठच असायला हवेत. वाक्यरचनेचे नियम पक्के माहीत असतील तर वाक्य रूपांतरणाचे प्रश्न नक्कीच सोडवता येतात. शब्दरचनेचे मराठीतील नियमही माहीत असणे आवश्यक आहे.
*   तयारीच्या काळात अवांतर वाचनासाठी वेळ काढणे काही वेळेस शक्य होत नाही. अशा वेळी म्हणी, वाक्प्रचार यांचे संकलन असलेले छोटेसे पुस्तक किंवा प्रिंन्ट आऊट सोबत बाळगावे. अधूनमधून त्यातील म्हणी, वाक्प्रचार वाचून त्यांचा अर्थ समजून घ्यावा. अर्थाची उकल झाली की त्यांचा उदाहरणांमध्ये वापर करणे किंवा केलेला वापर योग्य आहे की नाही हे कळणे सोपे होते.
*   आकलनासहित वाचन आणि नियमांचा सराव अशी रणनीती या घटकाच्या तयारीसाठी योग्य ठरेल.
सामान्य ज्ञान –
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींची टिपणे नोटस् सूत्रबद्धपणे पुढीलप्रमाणे काढता येतील –
केंद्र व राज्य सरकारच्या योजना, धोरणे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे, देशावर प्रभाव टाकू शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना, ठळक पर्यावरणीय व भौगोलिक घटना, त्याबाबतचे निर्णय, अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्थेसंबंधी घडामोडी, विज्ञान तंत्रज्ञानविषयक घडामोडी, महत्त्वाच्या परिषदा, संघटना, चच्रेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या-निवड-बढती, पुरस्कार, सन्मान, पारितोषिके, ग्रंथ लेखक, निधन, महत्त्वाच्या चच्रेतील कंपन्या, संस्था त्यांचे प्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र, चच्रेतील ठिकाणे, विज्ञानातील शोध व त्यातील संकल्पना, महत्त्वाच्या समित्या-आयोग व त्यांचे अहवाल, महत्त्वाची आर्थिक आकडेवारी, महत्त्वाची विधेयके, कायदे व घटनादुरुस्त्या, महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इ.
माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
दोन्ही अधिनियमांतील महत्त्वाच्या व्याख्या, तरतुदी, विहित कालावधी, सेवा / माहिती देणारे व अपिलीय प्राधिकारी यांचे अधिकार, कर्तव्ये, नियमांतील अपवाद, दंडांची /  शास्तीची तरतूद या बाबी मुख्य अधिसूचनेतून आणि नियमांतून तयार कराव्यात.
*    संगणक व माहिती तंत्रज्ञान
*   आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवासुविधा मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य या बाबींची तयारी संदर्भ साहित्यासहित वृत्तपत्रीय चच्रेतून अपडेट कराव्यात.
*  डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी यातील महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजून घ्याव्यात व थोडक्यात प्रणालीची माहिती करून घ्यावी.
*   शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी बाबी उद्देश, प्रक्रिया, लाभार्थी यांचा आढावा घ्यावा.
*   सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध याबाबतचे कायदे मुळातून वाचून त्यांची तयारी करावी.
First Published on July 12, 2019 1:24 am
Web Title: secondary service main examination joint paper mpsc abn 97

यूपीएससीची तयारी : भारतीय स्वातंत्र्यसमर परदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला

यूपीएससीची तयारी : भारतीय स्वातंत्र्यसमर

परदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला

श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
या घटकाचे स्वरूप 
* १८५७ च्या उठावामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आलेली होती. भारतावर ब्रिटिश राजसत्तेचे थेट नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेले होते. हे सत्तांतर १८५८ च्या भारत सरकारच्या कायद्याद्वारे झालेले होते. पण १९व्या शतकामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. या शतकामधील सुशिक्षित भारतीयांनी धार्मिक विश्वास, रिवाज व सामाजिक प्रथांची पाश्चिमात्य शिक्षणाद्वारे प्राप्त केलेल्या विज्ञान व तत्त्वज्ञानाच्या आधारे चिकित्सा करण्यास सुरुवात केलेली होती. प्रबोधन युगातील विचार, युरोपातील बौद्धिक विचारप्रवाह, विकास, इ. घटकांमुळे पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा हाती घेतल्या. या सुधारणांनी जातीप्रथा, अस्पृश्यता, सामाजिक आणि कायदेशीर भेदभाव यांसारख्या सामाजिक परंपरा आणि मूर्तिपूजा तसेच अंधश्रद्धा यांसारख्या धार्मिक बाबींवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. या सुधारणांना १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक चळवळी असे संबोधले जाते. या चळवळी पुरोगामी स्वरूपाच्या होत्या. या चळवळीचा व्यक्तिगत समानता, सामाजिक समानता, विवेकवाद, प्रबोधन आणि उदारमतवाद यांसारख्या लोकशाही मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे हा उद्देश होता.
* पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीयांनी आधुनिक विवेक, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि राष्ट्रवादी राजकीय दृष्टिकोनाचा अंगीकार केलेला होता. इंग्रजी भाषेने देशात राष्ट्रवादाची वाढ होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. ही भाषा भारतातील विविध प्रदेशांतील उच्चशिक्षित लोकांची वैचारिक देवाणघेवाण करण्याची माध्यम बनली. पाश्चिमात्य शिक्षणामुळे देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता या संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली व शिक्षित भारतीयांमध्ये दृष्टिकोन आणि हितसंबंध यामध्ये काहीसा एकसारखेपणा निर्माण झाला. तसेच काही भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या आर्थिक धोरणाची समीक्षा करून ब्रिटिश आर्थिक धोरणे भारतीयांचे शोषण कशा प्रकारे करत आहेत, हे दाखवून दिले. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झाला की भारतात राष्ट्रवादाची उभारणी झाली व १८८५मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली, येथूनच पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय राष्ट्रीय चळवळीची वाटचाल सुरू झाली.
* साधारणत: भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे तीन टप्पे केले जातात. १८८५ ते १९०५ (मवाळ कालखंड), १९०५ ते १९२० (जहाल कालखंड) आणि १९२० ते १९४७ (गांधी युग).
या टप्प्यांनिहाय भारतीय राष्ट्रीय चळवळीतील इतर प्रवाह या अंतर्गत क्रांतिकारी चळवळी, कनिष्ठ जातीतील चळवळी, कामगार चळवळ, भारतीय संस्थाने व संस्थानातील प्रजेच्या चळवळी, भारतीय राष्ट्रीय चळवळीमधील महिलांचे योगदान, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी आणि गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय यांचे कार्य व ब्रिटिशांच्या काळातील भारतातील घटनात्मक विकास यांसारख्या बाबींचा अधिक विस्तृत आणि सखोल अभ्यास करावा लागणार आहे.
या घटकावर २०१३ ते २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये एकूण १४ प्रश्न  विचारण्यात आलेले होते. यातील काही प्रश्न खालीलप्रमाणे होते.
* सद्य:स्थितीमध्ये महात्मा गांधींच्या विचारांचे महत्त्व यावर प्रकाश टाका. (२०१८)
* आधुनिक भारतात महिलांसंबंधी असणारे प्रश्न १९व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा भाग म्हणून उचलण्यात आलेले होते. त्या काळात महिलांसंबंधी कोणते मुख्य मुद्दे आणि वादविवाद होते? (२०१७)
* स्वातंत्र्य लढय़ामधील सुभाष चंद्र बोस आणि महत्मा गांधी यांच्या भिन्न दृष्टिकोनावर प्रकाश टाका. (२०१६)
* महात्मा गांधींविना भारताला स्वातंत्र्य प्राप्त करणे कसे भिन्न राहिले असते? चर्चा करा. (२०१५)
* स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा फक्त तीन वर्षांमध्ये तयार करण्याचे ऐतिहासिक कार्य संविधान सभेला पूर्ण करणे कठीण गेले असते, पण १९३५च्या भारत सरकारच्या कायद्याच्या अनुभवामुळे हे करता आले. चर्चा करा. (२०१५)
* परदेशी व्यक्तींनी भारतात राहून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भाग घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढय़ात त्यांनी घेतलेल्या भूमिकांचे विश्लेषण करा. (२०१४)
* जगामध्ये घडलेल्या कोणत्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींनी भारतातील वसाहतविरोधी संघर्षांला प्रेरणा दिलेली होती? (२०१४)
* वय, लिंगभाव आणि धर्म यांसारखी बंधने झुगारून भारतीय महिला स्वातंत्र्य लढय़ात अग्रेसर राहिल्या. चर्चा करा. (२०१३)
वरील प्रश्नांवरून आपणाला या घटकाची कशी तयारी करावी याची एक योग्य दिशा निश्चित करता येऊ शकते. तसेच यातील अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासून या विषयाच्या विविध पलूंचे योग्य आकलन करणे महत्त्वाचे ठरते. कारण हा घटक पारंपरिक पद्धतीचा आहे. यावर विचारण्यात येणारे प्रश्न बहुतांश वेळा सर्वागीण पलूंचा विचार करून विश्लेषणात्मक पद्धतीने विचारले जातात. अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे खूपच कठीण जाते म्हणून विषयाचे योग्य आकलन आणि चिकित्सक पद्धतीने केलेला अभ्यास यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो.
या घटकाची मूलभूत माहिती आपल्याला एनसीईआरटीच्या आधुनिक भारताशी संबंधित पुस्तकांमधून मिळते आणि या विषयाची सर्वागीण आणि सखोल तयारी करण्यासाठी ग्रोवर आणि ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, बिपिन चंद्र लिखित ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ यासारख्या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.
First Published on July 11, 2019 1:17 am
Web Title: upsc exam preparation tips upsc exam 2019 zws 70

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेच्या काळातील व्यवस्थापन उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो.

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेच्या काळातील व्यवस्थापन

उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो.

फारुक नाईकवाडे
राज्यसेवा मुख्य परीक्षा या आठवडय़ात होत आहे. सलग तीन दिवस प्रत्येकी दोन पेपर अशा प्रकारे ही परीक्षा होत असते. यामध्ये एक पारंपरिक वर्णनात्मक पेपर तर बाकीचे पाच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर आहेत. परीक्षा काळात घ्यायची दक्षता आणि परीक्षा हॉलमधील नियोजन याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
उत्तर पत्रिकेची काळजी
*  भाषा विषयाच्या पारंपरिक पेपरसाठी तीन तास देण्यात आले आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका पुरवण्यात येतात. मराठीची उत्तरे इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेत आणि इंग्रजीची मराठीत असे उलटे झाल्यास ती उत्तरे तपासली जात नाहीत. त्यामुळे उत्तरे लिहायला सुरुवात करताना त्याच भाषेच्या उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहीत असल्याची खात्री प्रत्येक प्रश्न सोडवताना करावी.
*  पारंपरिक पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उपप्रश्न सलग लिहावे. एखादा उपप्रश्न बाजूला ठेवल्यास त्यासाठी जागा सोडून पुढचा प्रश्न सोडवावा. वेळेअभावी अशा मोकळ्या सोडलेल्या जागेवर प्रश्न सोडवता आला नाही व ती जागा रिकामी राहिली तर त्यावर उभी रेघ काढू ढळड (कृपया मागे पहा) असे नक्की लिहावे, अन्यथा पुढची उत्तरे नजरचुकीने तपासायची राहून जायची शक्यता अनाठायी नाही.
*  बहुपर्यायी पेपरच्या उत्तरपत्रिका या डटफ शीट आहेत. खाडाखेड, फाटणे, चुरगळणे, खराब होणे अशा गोष्टी झाल्यास त्या तपासल्याच जात नाहीत. त्यामुळे त्यात माहिती भरताना उत्तरांसाठीचे पर्याय रंगवताना विशेष काळजी घ्यायला हवी.
*  उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो. यानंतर शाई पुसण्यासाठी टिश्यू पेपर दिला जातोच. पण घाम आल्याने किंवा आणखी काही कारणाने या शाईचा डाग उत्तरपत्रिकेवर पडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
*  उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी. चौकटीमध्ये लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील मार्किंग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवून घ्यावा.
वेळेचे नियोजन
*  पारंपरिक पेपरमध्ये तीन तास वेळ असला तरी त्याचे नियोजन काळजीपूर्वक करावे. तीन तासांत दोन्ही भाषांसाठी प्रत्येकी एक निबंध, प्रत्येकी सारांश लेखन व भाषांतराचा उतारा लिहायचा आहे. त्यामुळे लेखनाचा सराव महत्त्वाचा आहे.
*  बहुपर्यायी भाषा पेपरमध्ये ६० मिनिटांत १०० प्रश्न सोडवायचे आहेत, तर सामान्य अध्ययनाच्या चार पेपरमध्ये १२० मिनिटांत १५० प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन आणि डटफ शीटची काळजी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत हे लक्षात घ्यावे.
*  नकारात्मक गुणपद्धतीचा विचार करता जास्तीत जास्त १२५ ते १३५ प्रश्न सोडविणे व्यवहार्य ठरते. १०० गोळे रंगवायला किमान १५ मिनिटांचा वेळ लागतो. हा वेळ काळजीपूर्वक वापरला पाहिजे. कारण एका प्रश्नाचा क्रम चुकला की त्या पुढच्या सगळ्याच प्रश्नांचा क्रम चुकतो. एक प्रश्न सोडवून तो शीटवर नोंदवा किंवा सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर शेवटी एकाच वेळी नोंद करा. तुमच्या सोयीने यातला पर्याय तुम्ही निवडा. पण उत्तरे नोंदवण्याचे काम सावधगिरीने केले पाहिजे, हे ध्यानात घ्या.
*  प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर लगेचच सोडवायला सुरुवात करावी. सगळी प्रश्नपत्रिका वाचत बसू नये. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून त्याच्या उत्तराला खूण करत पुढे जायचे.
*  एखाद्या प्रश्नाबाबत काही शंका किंवा गोंधळ असेल, अवघड वाटला असेल तर त्या प्रश्नाच्या क्रमांकाला प्रश्नपत्रिकेमध्ये खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडविण्याची पहिली फेरी संपवावी. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेत रंगवून घ्यावीत. किंवा प्रश्न सोडवतानाच उत्तरपत्रिकेमध्ये रंगवले तरी हरकत नाही. पण त्या वेळी आपण सोडून दिलेल्या प्रश्नासमोरील पर्यायांची खूण रंगवत नाही ना, हे काळजीपूर्वक पाहावे.
*  आता दुसरी फेरी. अवघड वाटणारे प्रश्न सोडवायचा पुन्हा प्रयत्न करायचा. आधीच अशा खुणा केल्याने हे प्रश्न शोधत बसण्यात वेळ वाया जात नाही.
*  थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या मनाचा कौल घ्या. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या एका निरीक्षणामधून ही गोष्ट समोर आली आहे, की उमेदवाराला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर बरोबर आहे असे वाटते,  तेच उत्तर बहुतेक वेळा बरोबर असते.
*   पारंपरिक पेपरमध्ये ज्या भाषेच्या लेखनाबाबत जास्त आत्मविश्वास असेल तिचे प्रश्न आधी सोडवावेत. शब्दमर्यादा १० टक्के कमी किंवा जास्त इतक्या मर्यादेत राहील याची खात्री बाळगावी.
उमेदवारांच्या दोन ओळखपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात असे हॉल तिकिटामध्ये नमूद असते. पण ऐन वेळी एका/ दोन्ही ओळखपत्राची प्रतच नसणे किंवा एकच ओळखपत्र बाळगणे अशा बाबींमुळे धावपळ होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण अजूनही बऱ्यापैकी आहे. हे टाळण्यासाठी आदल्या दिवशीच आवश्यक बाबींची तयारी करून  ठेवावी.
First Published on July 10, 2019 3:59 am
Web Title: mpsc exam 2019 mpsc exam preparation tips zws 70

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वेकरून व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास

ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वेकरून व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या

श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास यावर चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून होते, असे मानले जाते. प्रस्तुत लेखामध्ये १८व्या आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७पर्यंतच्या इतिहासाची थोडक्यात उकल करून घेऊन यावर मागील परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप कसे होते आणि यासाठी लागणारा आकलनात्मक दृष्टिकोन याचा आढावा घेणार आहोत.
सर्वप्रथम १८व्या शतकाची काही महत्त्वाची वैशिष्टे अभ्यासणे गरजेचे आहे. या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती. त्यामुळे मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली साम्राज्य हा नावलौकिक राहिलेला नव्हता. या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्तांचा उदय झालेला होता, यातील काही सत्तांची स्थापना मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी केलेली होती (उदा-बंगाल, अवध आणि हैदराबाद) तसेच काही सत्तांचा उदय हा मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून झालेला होता (उदा- मराठे, अफगाण, जाट आणि शीख) व काही सत्ता या स्वतंत्ररित्या उदयाला आलेल्या होत्या (उदा: राजपूत, म्हैसूर, त्रावणकोर) तसेच १५व्या शतकापासून सागरी मार्गाचा वापर करून युरोपमधून आलेला व्यापारी वर्ग (पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच) व भारतासोबत होणाऱ्या व्यापारावर स्वत:ची मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी लागलेली स्पर्धा आणि यामध्ये अंतिमत: इंग्रजांचा झालेला विजय. या महत्त्वाच्या घटनांचा आधी अभ्यास करावा लागतो. भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा इतिहास अभ्यासताना नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करता आली याची योग्य आणि मुद्देसूद माहिती असावी लागते. तसेच ब्रिटिश सत्तेचा भारतावर झालेला परिणाम याअंतर्गत आपणाला राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिणामांची माहिती असावी लागते. गव्हर्नर जनरल व त्यांचे कार्य, या कालखंडातील ब्रिटिशांनी भारतात स्थापन केलेली प्रशासन व्यवस्था, ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यांचा झालेला परिणाम अभ्यासावा लागतो.
मागील परीक्षेतील प्रश्न आणि त्यासाठी आवश्यक असलेला आकलनात्मक दृष्टिकोन * कोणत्या कारणामुळे ब्रिटिशांनी भारतातून करारबद्ध कामगार त्यांच्या इतर वसाहतीमध्ये आणलेले होते? ते त्यांची सांस्कृतिक ओळख तेथे जतन करू शकले का? (२०१८)
ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वेकरून व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या. त्यातूनच पुढे ब्रिटिश साम्राज्यवादाची सुरुवात झाली होती. अशातच १८व्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. तसेच यापूर्वीच ब्रिटिशांनी आफ्रिका, आशिया आणि अमेरिका खंडांमध्ये वसाहती स्थापन केलेल्या होत्या. या वसाहतींमध्ये त्यांनी कामासाठी कामगार भारतातून आणलेले होते, कारण या वसाहती ब्रिटनमधील औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल निर्यात करत असत. अशा पद्धतीने या प्रश्नाची उकल करून घेऊन उदाहरणासह हे कामगार तेथील वसाहतीमध्ये स्वत:ची सांस्कृतिक ओळख जतन करू शकले का; याचे विश्लेषण उत्तरामध्ये द्यावे लागते.
* ‘स्पष्ट करा की अठराव्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती.’ (२०१७)
मुघल साम्राज्याचा १८व्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झालेला ऱ्हास व प्रादेशिक सत्तांचा झालेला उदय; ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय स्पर्धक म्हणून झालेला उदय या दोन्हीचा आधार घेऊन भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती हे सह उदाहरण स्पष्ट करावे लागते.
* ‘स्पष्ट करा की १८५७चा उठाव हा वसाहतिक भारतातील ब्रिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’ (२०१६)
या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील ब्रिटीश धोरणांची मुलभूत माहिती असणे गरजेचे आहे. कारण १८५७च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली ब्रिटीश धोरणे कारणीभूत होती. उत्तर लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते आणि १८५७च्या उठावाचे महत्व नमूद करावे लागते.
* ‘१७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या?’ (२०१४)
हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आहे. याचे आकलन करताना आपल्याला १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घेऊन हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते.
उपरोक्त प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. या घटकाचा मुलभूत अभ्यास करण्यासाठी बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी.एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.
First Published on July 9, 2019 7:44 am
Web Title: upsc exam preparation tips history of modern india zws 70

विद्यापीठ विश्व : संशोधनाला प्राधान्य या विद्यापीठाची स्थापना १८२७ साली झालेली आहे. हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे लोकसत्ता टीम | July 9, 2019 07:43 am Share [विद्यापीठ विश्व : संशोधनाला प्राधान्य] टोरन्टो विद्यापीठ, कॅनडा प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com विद्यापीठाची ओळख – टोरन्टो शहरामध्ये असलेले ‘युनिव्हर्सिटी ऑफ टोरन्टो’ (टोरन्टो विद्यापीठ) हे कॅनडामधील पहिल्या क्रमांकाचे तर जागतिक स्तरावरील एक अग्रणी संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार टोरन्टो विद्यापीठ हे जगातले एकोणतिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १८२७ साली झालेली आहे. हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. शांघाय रँकिंग कन्सल्टन्सीच्या अहवालानुसार विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व विषयांपैकी नऊ विषय हे विषयांच्या क्रमवारीनुसार जगातील ‘पहिल्या दहा’ क्रमांकामध्ये आहेत. टोरन्टो विद्यापीठाचे डाऊनटाऊन टोरन्टो (सेंट जॉर्ज), पश्चिमेतील मिसीसोगा आणि पूर्वेकडील स्काबरेरो असे तीन कॅम्पस आहेत. विद्यापीठामध्ये सध्या जवळपास पंधरा हजार (फॉल २०१७ च्या आकडेवारीनुसार) तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून नव्वद हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. दीर्घ आणि सखोल संशोधनामुळे विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहे. टोरन्टो विद्यापीठ हे संशोधनातून अभिनवता साकारणारे विद्यापीठ आहे. इन्सुलिन आणि स्टेम सेलसारख्या महत्त्वाच्या विषयांमधील संशोधनाची सुरुवातच या विद्यापीठामधून झाली आहे. अभ्यासक्रम – टोरन्टो विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम हे चार वर्षांचे संशोधन अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठातील सर्व विभागांमधून एकूण सातशे पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पदवी अभ्याक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून कला आणि विज्ञान शाखांना प्राधान्य दिले जाते. आपल्याकडील कित्येक भारतीय विद्यापीठांसारखे अनेक महाविद्यालये जशी विद्यापीठाशी संलग्न असतात तशीच टोरन्टो विद्यापीठाची एकंदरीत रचना आहे. या विद्यापीठाशी संलग्न नोंदणीकृत महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयातील वर्गाना हजर राहू शकतात आणि महाविद्यालयाचे वाचनालय वापरू शकतात. विद्यापीठातील बहुतांश पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन वर्षांचे आहेत. टोरन्टो विद्यापीठात एकूण दोनशे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची उपलब्धता आहे. विद्यापीठामधील प्रमुख विभागांमध्ये अप्लाईड सायन्सेस अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लँडस्केप अ‍ॅण्ड डिझाइन, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स, कंटिन्यूइंग स्टडीज, डेंटीस्ट्री, एज्युकेशन, फॉरेस्ट्री, ग्रॅज्युएट स्टडीज, इन्फोम्रेशन, कायनेसिओलॉजी अ‍ॅण्ड फिजिकल एज्युकेशन, लॉ, मॅनेजमेंट, मेडिसिन, म्युझिक, नìसग, फार्मसी, पब्लिक हेल्थ, सोशल वर्क इत्यादी विभागांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी GRE/ GMAT, TOEFL/IELTS, SAT किंवा ACT या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. सुविधा – टोरन्टो विद्यापीठास आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. जगातील १५७ देशांमधून विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात. २०१८-१९ मध्ये एकवीस हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला होता. टोरन्टो विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय व चिनी विद्यार्थ्यांचे प्रमाण जास आहे. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व टय़ुशन फी वेव्हर यांसारखी आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कॅफेटेरिया, आंतरराष्ट्रीय हेल्थ इन्शुरन्स, क्रीडा आणि करिअर मार्गदर्शन यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. टोरन्टो विद्यापीठामध्ये एकूण ८०० विद्यार्थी क्लब्स आहेत. टोरन्टो विद्यापीठामधून मी नुकतीच एअरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक अतिशय सहकार्य करणारे आहेत. जवळपास प्रत्येक अभ्यासक्रमातील बरेचसे विषय हे संशोधनावर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्व-अध्ययनावर विशेष भर द्यावा लागतो. त्यामुळेच तुमच्या प्रत्येक विषयाच्या गुणांमध्ये प्रकल्पांचा वाटा ६५ टक्के तर परीक्षेतील गुणांचा वाटा ३५ टक्के असतो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संधी निवडण्यासाठी मदत केली जाते. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या गटांचे उत्कृष्ट संघटन (Alumni Network) जपलेले आहे. भविष्यातील संधी मिळवण्याकरिता याचा उत्तम उपयोग होतो.’’ – शिल्पा डीसुझा, एअरोस्पेस इंजिनीअर टोरन्टो विद्यापीठ, कॅनडा. संकेतस्थळ https://www.utoronto.ca/ ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा. First Published on July 9, 2019 7:43 am Web Title: university of toronto university in canada zws 70

विद्यापीठ विश्व : संशोधनाला प्राधान्य

या विद्यापीठाची स्थापना १८२७ साली झालेली आहे. हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे

टोरन्टो विद्यापीठ, कॅनडा
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
विद्यापीठाची ओळख – टोरन्टो शहरामध्ये असलेले ‘युनिव्हर्सिटी ऑफ टोरन्टो’ (टोरन्टो विद्यापीठ) हे कॅनडामधील पहिल्या क्रमांकाचे तर जागतिक स्तरावरील एक अग्रणी संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार टोरन्टो विद्यापीठ हे जगातले एकोणतिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.
या विद्यापीठाची स्थापना १८२७ साली झालेली आहे. हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. शांघाय रँकिंग कन्सल्टन्सीच्या अहवालानुसार विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व विषयांपैकी नऊ विषय हे विषयांच्या क्रमवारीनुसार जगातील ‘पहिल्या दहा’ क्रमांकामध्ये आहेत. टोरन्टो विद्यापीठाचे डाऊनटाऊन टोरन्टो (सेंट जॉर्ज), पश्चिमेतील मिसीसोगा आणि पूर्वेकडील स्काबरेरो असे तीन कॅम्पस आहेत.
विद्यापीठामध्ये सध्या जवळपास पंधरा हजार (फॉल २०१७ च्या आकडेवारीनुसार) तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून नव्वद हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. दीर्घ आणि सखोल संशोधनामुळे विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहे. टोरन्टो विद्यापीठ हे संशोधनातून अभिनवता साकारणारे विद्यापीठ आहे. इन्सुलिन आणि स्टेम सेलसारख्या महत्त्वाच्या विषयांमधील संशोधनाची सुरुवातच या विद्यापीठामधून झाली आहे.
अभ्यासक्रम – टोरन्टो विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम हे चार वर्षांचे संशोधन अभ्यासक्रम आहेत. विद्यापीठातील सर्व विभागांमधून एकूण सातशे पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पदवी अभ्याक्रमांसाठी विद्यार्थ्यांकडून कला आणि विज्ञान शाखांना प्राधान्य दिले जाते. आपल्याकडील कित्येक भारतीय विद्यापीठांसारखे अनेक महाविद्यालये जशी विद्यापीठाशी संलग्न असतात तशीच टोरन्टो विद्यापीठाची एकंदरीत रचना आहे. या विद्यापीठाशी संलग्न नोंदणीकृत महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयातील वर्गाना हजर राहू शकतात आणि महाविद्यालयाचे वाचनालय वापरू शकतात. विद्यापीठातील बहुतांश पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन वर्षांचे आहेत. टोरन्टो विद्यापीठात एकूण दोनशे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची उपलब्धता आहे. विद्यापीठामधील प्रमुख विभागांमध्ये अप्लाईड सायन्सेस अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लँडस्केप अ‍ॅण्ड डिझाइन, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स, कंटिन्यूइंग स्टडीज, डेंटीस्ट्री, एज्युकेशन, फॉरेस्ट्री, ग्रॅज्युएट स्टडीज, इन्फोम्रेशन, कायनेसिओलॉजी अ‍ॅण्ड फिजिकल एज्युकेशन, लॉ, मॅनेजमेंट, मेडिसिन, म्युझिक, नìसग, फार्मसी, पब्लिक हेल्थ, सोशल वर्क इत्यादी विभागांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी GRE/ GMAT, TOEFL/IELTS, SAT किंवा ACT या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
सुविधा – टोरन्टो विद्यापीठास आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. जगातील १५७ देशांमधून विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात. २०१८-१९ मध्ये एकवीस हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला होता. टोरन्टो विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय व चिनी विद्यार्थ्यांचे प्रमाण जास आहे. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व टय़ुशन फी वेव्हर यांसारखी आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कॅफेटेरिया, आंतरराष्ट्रीय हेल्थ इन्शुरन्स, क्रीडा आणि करिअर मार्गदर्शन यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. टोरन्टो विद्यापीठामध्ये एकूण ८०० विद्यार्थी क्लब्स आहेत.
टोरन्टो विद्यापीठामधून मी नुकतीच एअरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक अतिशय सहकार्य करणारे आहेत. जवळपास प्रत्येक अभ्यासक्रमातील बरेचसे विषय हे संशोधनावर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना  स्व-अध्ययनावर विशेष भर द्यावा लागतो. त्यामुळेच तुमच्या प्रत्येक विषयाच्या गुणांमध्ये प्रकल्पांचा वाटा ६५ टक्के तर परीक्षेतील गुणांचा वाटा ३५ टक्के असतो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना संधी निवडण्यासाठी मदत केली जाते.   विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या गटांचे   उत्कृष्ट संघटन (Alumni Network) जपलेले आहे. भविष्यातील संधी मिळवण्याकरिता याचा उत्तम उपयोग होतो.’’
 – शिल्पा डीसुझा, एअरोस्पेस इंजिनीअर टोरन्टो विद्यापीठ, कॅनडा.
संकेतस्थळ  https://www.utoronto.ca/
First Published on July 9, 2019 7:43 am
Web Title: university of toronto university in canada zws 70