Tuesday, July 16, 2019

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेच्या काळातील व्यवस्थापन उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो.

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेच्या काळातील व्यवस्थापन

उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो.

फारुक नाईकवाडे
राज्यसेवा मुख्य परीक्षा या आठवडय़ात होत आहे. सलग तीन दिवस प्रत्येकी दोन पेपर अशा प्रकारे ही परीक्षा होत असते. यामध्ये एक पारंपरिक वर्णनात्मक पेपर तर बाकीचे पाच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर आहेत. परीक्षा काळात घ्यायची दक्षता आणि परीक्षा हॉलमधील नियोजन याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
उत्तर पत्रिकेची काळजी
*  भाषा विषयाच्या पारंपरिक पेपरसाठी तीन तास देण्यात आले आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका पुरवण्यात येतात. मराठीची उत्तरे इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेत आणि इंग्रजीची मराठीत असे उलटे झाल्यास ती उत्तरे तपासली जात नाहीत. त्यामुळे उत्तरे लिहायला सुरुवात करताना त्याच भाषेच्या उत्तरपत्रिकेत उत्तरे लिहीत असल्याची खात्री प्रत्येक प्रश्न सोडवताना करावी.
*  पारंपरिक पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उपप्रश्न सलग लिहावे. एखादा उपप्रश्न बाजूला ठेवल्यास त्यासाठी जागा सोडून पुढचा प्रश्न सोडवावा. वेळेअभावी अशा मोकळ्या सोडलेल्या जागेवर प्रश्न सोडवता आला नाही व ती जागा रिकामी राहिली तर त्यावर उभी रेघ काढू ढळड (कृपया मागे पहा) असे नक्की लिहावे, अन्यथा पुढची उत्तरे नजरचुकीने तपासायची राहून जायची शक्यता अनाठायी नाही.
*  बहुपर्यायी पेपरच्या उत्तरपत्रिका या डटफ शीट आहेत. खाडाखेड, फाटणे, चुरगळणे, खराब होणे अशा गोष्टी झाल्यास त्या तपासल्याच जात नाहीत. त्यामुळे त्यात माहिती भरताना उत्तरांसाठीचे पर्याय रंगवताना विशेष काळजी घ्यायला हवी.
*  उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो. यानंतर शाई पुसण्यासाठी टिश्यू पेपर दिला जातोच. पण घाम आल्याने किंवा आणखी काही कारणाने या शाईचा डाग उत्तरपत्रिकेवर पडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
*  उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी. चौकटीमध्ये लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील मार्किंग यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवून घ्यावा.
वेळेचे नियोजन
*  पारंपरिक पेपरमध्ये तीन तास वेळ असला तरी त्याचे नियोजन काळजीपूर्वक करावे. तीन तासांत दोन्ही भाषांसाठी प्रत्येकी एक निबंध, प्रत्येकी सारांश लेखन व भाषांतराचा उतारा लिहायचा आहे. त्यामुळे लेखनाचा सराव महत्त्वाचा आहे.
*  बहुपर्यायी भाषा पेपरमध्ये ६० मिनिटांत १०० प्रश्न सोडवायचे आहेत, तर सामान्य अध्ययनाच्या चार पेपरमध्ये १२० मिनिटांत १५० प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन आणि डटफ शीटची काळजी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत हे लक्षात घ्यावे.
*  नकारात्मक गुणपद्धतीचा विचार करता जास्तीत जास्त १२५ ते १३५ प्रश्न सोडविणे व्यवहार्य ठरते. १०० गोळे रंगवायला किमान १५ मिनिटांचा वेळ लागतो. हा वेळ काळजीपूर्वक वापरला पाहिजे. कारण एका प्रश्नाचा क्रम चुकला की त्या पुढच्या सगळ्याच प्रश्नांचा क्रम चुकतो. एक प्रश्न सोडवून तो शीटवर नोंदवा किंवा सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर शेवटी एकाच वेळी नोंद करा. तुमच्या सोयीने यातला पर्याय तुम्ही निवडा. पण उत्तरे नोंदवण्याचे काम सावधगिरीने केले पाहिजे, हे ध्यानात घ्या.
*  प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर लगेचच सोडवायला सुरुवात करावी. सगळी प्रश्नपत्रिका वाचत बसू नये. जे प्रश्न सोडवता येतात ते सोडवून त्याच्या उत्तराला खूण करत पुढे जायचे.
*  एखाद्या प्रश्नाबाबत काही शंका किंवा गोंधळ असेल, अवघड वाटला असेल तर त्या प्रश्नाच्या क्रमांकाला प्रश्नपत्रिकेमध्ये खूण करून पुढच्या प्रश्नाकडे वळावे. असे करत प्रश्न सोडविण्याची पहिली फेरी संपवावी. जेवढे प्रश्न सोडवले आहेत त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेत रंगवून घ्यावीत. किंवा प्रश्न सोडवतानाच उत्तरपत्रिकेमध्ये रंगवले तरी हरकत नाही. पण त्या वेळी आपण सोडून दिलेल्या प्रश्नासमोरील पर्यायांची खूण रंगवत नाही ना, हे काळजीपूर्वक पाहावे.
*  आता दुसरी फेरी. अवघड वाटणारे प्रश्न सोडवायचा पुन्हा प्रयत्न करायचा. आधीच अशा खुणा केल्याने हे प्रश्न शोधत बसण्यात वेळ वाया जात नाही.
*  थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना आपल्या मनाचा कौल घ्या. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या एका निरीक्षणामधून ही गोष्ट समोर आली आहे, की उमेदवाराला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर बरोबर आहे असे वाटते,  तेच उत्तर बहुतेक वेळा बरोबर असते.
*   पारंपरिक पेपरमध्ये ज्या भाषेच्या लेखनाबाबत जास्त आत्मविश्वास असेल तिचे प्रश्न आधी सोडवावेत. शब्दमर्यादा १० टक्के कमी किंवा जास्त इतक्या मर्यादेत राहील याची खात्री बाळगावी.
उमेदवारांच्या दोन ओळखपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात असे हॉल तिकिटामध्ये नमूद असते. पण ऐन वेळी एका/ दोन्ही ओळखपत्राची प्रतच नसणे किंवा एकच ओळखपत्र बाळगणे अशा बाबींमुळे धावपळ होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण अजूनही बऱ्यापैकी आहे. हे टाळण्यासाठी आदल्या दिवशीच आवश्यक बाबींची तयारी करून  ठेवावी.
First Published on July 10, 2019 3:59 am
Web Title: mpsc exam 2019 mpsc exam preparation tips zws 70

No comments:

Post a Comment