Monday, July 8, 2019

शब्दबोध : यातायात आपल्या मराठीने अनेक भाषांसोबत नातेसंबंध जोडले आहेत.

शब्दबोध : यातायात

आपल्या मराठीने अनेक भाषांसोबत नातेसंबंध जोडले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
एखादे लहानसे काम करण्यासाठी जेव्हा अतिशय हेलपाटे घालावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा आपण म्हणतो, या कामासाठी फारच ‘यातायात’ करावी लागली. आपली सगळी धावपळ, कष्ट यातून व्यक्त होते.
हा शब्द ‘यात’ आणि ‘आयात’ या दोन शब्दांच्या संयोगातून बनला आहे. ‘यात’चा अर्थ आहे गेलेला आणि त्यातील मूळ धातू आहे ‘या’. ज्याचा अर्थ आहे जाणे. आयात म्हणजे परत आलेला. आयात आणि निर्यात हे शब्दही ‘या’ धातूपासून बनले आहेत आणि त्यांचा अर्थही आपल्या परिचयाचा आहे. आपल्या देशात तयार झालेला माल बाहेरच्या देशात विक्रीस पाठवणे म्हणजेच निर्यात करणे, तर बाहेरच्या देशातील माल आपल्या देशात आणणे म्हणजेच आयात करणे होय.
‘या’ धातूपासून यात्रा, यात्रेकरू असे अनेक शब्द तयार झाले आहेत. तीर्थस्थानाला जाणे म्हणजेच यात्रा करणे आणि यात्रा करतो तो यात्रेकरू. अनुयायी या शब्दातही ‘या’ धातू आहे. ‘अनु’ या उपसर्गाचा अर्थ आहे, ‘जवळ’, ‘लागून’, ‘पाठोपाठ’, जसे राधेच्या मागून येते ती अनुराधा. तसेच एखाद्या संताच्या किंवा पंथाच्या मागे जे जातात ते अनुयायी म्हणजेच शिष्य.
आपल्या मराठीने अनेक भाषांसोबत नातेसंबंध जोडले आहेत. मात्र त्या भाषांतले शब्द आपल्या भाषेत येताना काहीवेळा अगदी वेगळ्या अर्थाने आले आहेत. उदा. संस्कृतमधील तिक्त आणि कटु शब्द मराठीत येताना त्यांना विरुद्ध अर्थ चिकटले.
तिक्त म्हणजे तिखट नसून कडू आहे, तर कटु म्हणजे तिखट. तसेच मराठीत या, जा किंवा येतो जातो ह्य़ा शब्दांबाबत झाले आहे. त्यांच्या अर्थाच्या सूक्ष्म छटा आहेत आणि प्रसंगानुरूप त्यांचे अर्थही बदलतात. एखाद्याच्या घरातून निघताना, ‘बरंय येतो’, असे म्हणण्याची प्रथा आहे. पण असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा, ‘आता मी जातो, परत येईन’ असा त्याचा अर्थ असतो. परंतु एखाद्या दु:खदप्रसंगी सांत्वनासाठी गेलो असताना परत निघताना ‘जातो’ असे म्हणतो. त्या वेळी पुन्हा अशा दु:खदप्रसंगी येण्याची वेळ येऊ नये ही भावना दडलेली असते. एखाद्या कंटाळवाण्या व्यक्तीला घरातून थेट जा असे सांगणे उचित दिसत नाही. म्हणून कधी कधी ‘बरंय या आता’ असे म्हणून तिची बोळवण केली जाते. त्या वेळी आपल्या म्हणण्याचा अर्थ ‘जा आता’ असा असतो आणि त्या वेळी या धातूचा मूळ अर्थ जाणे हा त्यातून स्पष्ट होतो. ‘या’ हा धातू आणि त्याचे अर्थ अशा प्रकारे फिरत असतात.
प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनीही हा यातायात शब्द वापरलेला आहे. तोही एका वेगळ्याच संदर्भात. हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्माची कल्पना आहे.
त्यानुसार जीवाचे शरीर बदलते पण अंतरात्मा तोच राहतो. आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन झाला की त्याचे अस्तित्व संपते. यालाच मोक्ष म्हणतात. तो मिळेपर्यंत जन्म-मरणाचे चक्र चालू राहते, अशी ही कल्पना. यालाच संत ज्ञानेश्वरांनी यातायात म्हटले आहे. आठव्या अध्यायातील ओवीत ते म्हणतात-
ना तें समुद्रचि होऊन ठेलें।
तेविं चित्ताचे चतन्य जाहालें।
जेथ यातायात निमालें।
घनानंद जें।
First Published on June 6, 2019 12:03 am
Web Title: article on word scene

No comments:

Post a Comment