Tuesday, July 16, 2019

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वेकरून व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास

ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वेकरून व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या

श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास यावर चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून होते, असे मानले जाते. प्रस्तुत लेखामध्ये १८व्या आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७पर्यंतच्या इतिहासाची थोडक्यात उकल करून घेऊन यावर मागील परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप कसे होते आणि यासाठी लागणारा आकलनात्मक दृष्टिकोन याचा आढावा घेणार आहोत.
सर्वप्रथम १८व्या शतकाची काही महत्त्वाची वैशिष्टे अभ्यासणे गरजेचे आहे. या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती. त्यामुळे मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली साम्राज्य हा नावलौकिक राहिलेला नव्हता. या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्तांचा उदय झालेला होता, यातील काही सत्तांची स्थापना मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी केलेली होती (उदा-बंगाल, अवध आणि हैदराबाद) तसेच काही सत्तांचा उदय हा मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून झालेला होता (उदा- मराठे, अफगाण, जाट आणि शीख) व काही सत्ता या स्वतंत्ररित्या उदयाला आलेल्या होत्या (उदा: राजपूत, म्हैसूर, त्रावणकोर) तसेच १५व्या शतकापासून सागरी मार्गाचा वापर करून युरोपमधून आलेला व्यापारी वर्ग (पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच) व भारतासोबत होणाऱ्या व्यापारावर स्वत:ची मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी लागलेली स्पर्धा आणि यामध्ये अंतिमत: इंग्रजांचा झालेला विजय. या महत्त्वाच्या घटनांचा आधी अभ्यास करावा लागतो. भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा इतिहास अभ्यासताना नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करता आली याची योग्य आणि मुद्देसूद माहिती असावी लागते. तसेच ब्रिटिश सत्तेचा भारतावर झालेला परिणाम याअंतर्गत आपणाला राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिणामांची माहिती असावी लागते. गव्हर्नर जनरल व त्यांचे कार्य, या कालखंडातील ब्रिटिशांनी भारतात स्थापन केलेली प्रशासन व्यवस्था, ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यांचा झालेला परिणाम अभ्यासावा लागतो.
मागील परीक्षेतील प्रश्न आणि त्यासाठी आवश्यक असलेला आकलनात्मक दृष्टिकोन * कोणत्या कारणामुळे ब्रिटिशांनी भारतातून करारबद्ध कामगार त्यांच्या इतर वसाहतीमध्ये आणलेले होते? ते त्यांची सांस्कृतिक ओळख तेथे जतन करू शकले का? (२०१८)
ब्रिटिशांच्या वसाहती या मुख्यत्वेकरून व्यापारवाढीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या होत्या. त्यातूनच पुढे ब्रिटिश साम्राज्यवादाची सुरुवात झाली होती. अशातच १८व्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. तसेच यापूर्वीच ब्रिटिशांनी आफ्रिका, आशिया आणि अमेरिका खंडांमध्ये वसाहती स्थापन केलेल्या होत्या. या वसाहतींमध्ये त्यांनी कामासाठी कामगार भारतातून आणलेले होते, कारण या वसाहती ब्रिटनमधील औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल निर्यात करत असत. अशा पद्धतीने या प्रश्नाची उकल करून घेऊन उदाहरणासह हे कामगार तेथील वसाहतीमध्ये स्वत:ची सांस्कृतिक ओळख जतन करू शकले का; याचे विश्लेषण उत्तरामध्ये द्यावे लागते.
* ‘स्पष्ट करा की अठराव्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती.’ (२०१७)
मुघल साम्राज्याचा १८व्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झालेला ऱ्हास व प्रादेशिक सत्तांचा झालेला उदय; ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय स्पर्धक म्हणून झालेला उदय या दोन्हीचा आधार घेऊन भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती हे सह उदाहरण स्पष्ट करावे लागते.
* ‘स्पष्ट करा की १८५७चा उठाव हा वसाहतिक भारतातील ब्रिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’ (२०१६)
या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील ब्रिटीश धोरणांची मुलभूत माहिती असणे गरजेचे आहे. कारण १८५७च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली ब्रिटीश धोरणे कारणीभूत होती. उत्तर लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते आणि १८५७च्या उठावाचे महत्व नमूद करावे लागते.
* ‘१७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या?’ (२०१४)
हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आहे. याचे आकलन करताना आपल्याला १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घेऊन हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते.
उपरोक्त प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. या घटकाचा मुलभूत अभ्यास करण्यासाठी बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी.एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.
First Published on July 9, 2019 7:44 am
Web Title: upsc exam preparation tips history of modern india zws 70

No comments:

Post a Comment