Monday, July 8, 2019

यूपीएससीची तयारी : निबंध लेखन (मांडणीतील बारकावे) प्रस्तावनेचा परिच्छेद - प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे.

यूपीएससीची तयारी : निबंध लेखन (मांडणीतील बारकावे)

प्रस्तावनेचा परिच्छेद - प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे.

(संग्रहित छायाचित्र)

अपर्णा दीक्षित
*   प्रस्तावनेचा परिच्छेद – प्रस्तावनेच्या परिच्छेदाने वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले गेले पाहिजे. दिलेल्या विषयाची प्रमुख भूमिका निश्चित करणे आणि प्रमुख मुद्दा ठामपणे मांडणे हे या परिच्छेदाचे महत्त्वाचे काम आहे. पुढे येणाऱ्या गुंतागुंतीच्या लेखनाला दिशा देणारा हा परिच्छेद आहे. वाचणाऱ्याचे लक्ष वेधून घेणारी वाक्ये येथे असली पाहिजेत. अशा प्रकारची सुरुवात खालीलपकी एखादी मांडणी करून केली जाऊ शकते.
*    माहितीचा वेधक नमुना-बालकांच्या लंगिक शोषणाला कारणीभूत असणाऱ्या सज्ञान व्यक्ती या बहुतेक केसेसमध्ये अनोळखी व्यक्ती नसून कुटुंबातल्याच असतात, असे अनेक पाहण्यांमध्ये आढळून येते.
*    आश्चर्यकारक माहिती – भारतात दररोज रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्या व्यक्तींची संख्या सुमारे ४०० आहे.
*    विषयास लागू असणारा सुविचार – एका ठिकाणी झालेला अन्याय हा सार्वत्रिक न्यायाला बाधा आणणारा असतो – मार्टनि ल्युथर किंग, ज्यु.
आपल्या आजूबाजूला असणारा पण सहज लक्षात न येणारा विरोधाभास -जवानांना मिळणारा तुटपुंजा पगार आणि क्रिकेटपटूंना दिली जाणारी भरमसाट रक्कम यातील तफावत समाज म्हणून आपल्या कुणालाच न बोचणे.
*    अवघड संकल्पनेचे स्पष्टीकरण – शाश्वत विकास म्हणजे आपल्या वर्तमानातील गरजा पूर्ण करताना आपल्या पुढील पिढय़ांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला बाधा न येऊ देता साध्य केलेला विकास होय.
*    एखाद्या घटनेचे थोडक्यात वर्णन – (विषयाला अनुरूप साधारण ५० ते १०० शब्दांतील वर्णन)
*    विचार करण्यास प्रवृत्त करणारा प्रश्न – सामाजिक परिस्थिती, वय, देश यापलीकडे केवळ माणूस म्हणून विचार करता दु:ख हा अटळ मानवी अनुभव आहे का?
*    थेट विषय प्रवेश – ८०० शब्दांपेक्षा कमी शब्दांत लिहिलेल्या निबंधासाठी खूप मोठी प्रस्तावना आवश्यक नाही. परंतु १२०० शब्दांचा निबंध लिहीत असताना सविस्तर प्रस्तावनेतून निबंधाची भूमिका स्पष्ट करणे शक्य होते. अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर इतर स्पष्टीकरणांवर वेळ अथवा शब्द वाया न घालवता प्रमुख मुद्दय़ांच्या मांडणीला सुरुवात करावी. आपण लिहीत असलेल्या विषयांच्या संदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा दाखला देऊन मूळ लिखाणाला सुरुवात करता येते. मात्र अशी सुरुवात करत असताना तोच तोचपणा टाळावा. तसेच सध्या ‘क्ष’ हा अतिशय कळीचा प्रश्न बनला आहे… किंवा मनुष्य कायमच ‘क्ष’ प्रश्न सोडवण्यात व्यग्र आहे…अशा ठोकळेबाज वाक्यांचा वापर टाळावा. इतकी व्यापक मांडणी जवळपास कोणताही महत्त्वाचा मुद्दा कवेत घेऊ शकते, म्हणूनच आपली सुरुवातही अचूक भूमिका असणाऱ्या वाक्यांनी व्हावी.
*    अतिशय व्यापक – गुन्हेगारी ही सर्वच काळातील एक मोठी समस्या आहे.
*    मुद्देसूद – बालगुन्हेगारांच्या शिक्षेची तीव्रता व त्यासंबंधीच्या समस्यांनी सध्याचे चर्चाविश्व व्यापले आहे. गेल्या काही वर्षांतील बालगुन्हेगारांच्या वाढत्या नोंदींमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
*    परिच्छेदांची मांडणी – प्रत्येक परिच्छेद ठरावीक प्रमुख मुद्दा मांडणारा असावा. तसेच मूळ मुद्दय़ाचा व प्रस्तुत परिच्छेदातील मुद्दय़ाचा नक्की कोणता संबंध आहे याचा स्पष्ट उल्लेख परिच्छेदात असावा. अनेक मुद्दय़ांचा भरणा करण्याऐवजी ठरावीक भूमिका निवडून, त्यास अनुसरून लिखाण करावे. परिच्छेदातील लेखनाचा ओघ कायम असावा. परिच्छेदाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठरावीक मुद्दय़ांचे स्पष्टीकरण असावे. आपल्या लेखनाची दिशा बदलते आहे असे वाटल्यास नवीन परिच्छेद सुरू करावा. परिच्छेदाची मांडणी करत असताना एकच परिच्छेद खूप मोठा अथवा खूप लहान होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
*    परिच्छेदामध्ये एकाच मुद्दय़ावर भर द्यावा – प्रत्येक परिच्छेद म्हणजे विचारांचे छोटे भांडार आहे, या दृष्टिकोनातून प्रत्येक परिच्छेद परिपूर्ण
करण्याकडे लक्ष द्यावे. लिहीत असताना विचारांची दिशा बदलते आहे असे वाटल्यास नवीन परिच्छेद सुरू करावा. अशा प्रकारे मुद्देसूद परिच्छेद लिहिण्यासाठी खालील बाबींचा वापर करणे शक्य आहे.
*  उदाहरणांच्या मदतीने संकल्पना स्पष्ट करावी.
*  विषयाशी निगडित जाणकारांचे सुविचार योग्य ठिकाणी वापरावेत.
*  आपण मांडत असलेल्या मुद्दय़ांच्या विरोधातील मुद्दय़ांना उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.
*  आपल्या कल्पनांना पुराव्याचे व दाखल्याचे बळ द्यावे.
*  सर्वसाधारणपणे माहीत असलेल्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा दृष्टिकोन सादर करावा.
*  व्याख्या, कार्यकारणभाव, तुलना यांच्या आधारे विस्तृत चर्चा घडवून आणावी.
ज्याप्रमाणे प्रस्तावनेचे परिच्छेद आणि मांडणीचा मुख्य भाग हे निबंधासाठी महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे प्रभावी आणि नेमका निष्कर्ष हादेखील चांगल्या निबंधाचा मानक मानला जातो. पुढील लेखामध्ये आपण निष्कर्षांच्या लिखाणाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
First Published on June 13, 2019 12:23 am
Web Title: essay writing 4

No comments:

Post a Comment