Tuesday, July 16, 2019

यूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो

यूपीएससीची तयारी : स्वातंत्र्योत्तर भारत

सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो

– श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना भारताची फाळणी, तिचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूंचे परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व याच्याशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड-बांग्लादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी-वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी; पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिक वादाचे राजकारण तसेच या सर्व घटकाशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने तयारी करावी लागते. या घटकातील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत म्हणजे येथून पुढे होणाऱ्या मुख्य परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या घटकाची सर्वप्रथम मूलभूत माहिती अभ्यासणे गरजेचे आहे.
या घटकावर २०१३ ते २०१८ मध्ये एकूण सात प्रश्न विचारण्यात आले आहेत.
ते पुढीलप्रमाणे –
* विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उदेशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा.
* ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा.
* कोणत्या परिस्थितीमुळे १९६६चा ताश्कंद करार करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ांची चर्चा करा.
* कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उदयामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली, याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा.
* लेनिन याच्या १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणाने, भारताने स्वातंत्र प्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना प्रभावित केलेले होते. मूल्यांकन करा.
* भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का ?
* स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनुसूचित जमाती
(STs)विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी, कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले?
या प्रश्नांचे योग्य आकलन करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन उपरोक्त प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र प्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकातील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. उपरोक्त प्रश्नांमधील ‘भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला दृढता मिळालेली आहे का?’ हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी भाषावार प्रांत रचना का करण्यात आलेली होती, त्याची कोणती कारणे होती आणि नेमका इतिहास काय आहे? यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व याची उद्दिष्टे यांसारख्या पलूंचा एकत्रित विचार करून उदाहरणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. भाषावार राज्य निर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.
उपरोक्त प्रश्नांमधील दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धाच्या पाश्र्वभूमीला ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत. या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपल्याला भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी, तत्कालिक कारणे, ताश्कंद कराराची वैशिष्टे काय होती याबाबत सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे लिहिता येत नाहीत. थोडक्यात हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.
वरील प्रश्नांमध्ये भूदान व ग्रामदान चळवळीवरील प्रश्न तसेच ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याशी संबंधित प्रश्न हे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करून नेमकी यांची तत्कालीन सामजिक आणि आर्थिक विकासामध्ये उपयुक्तता काय होती आणि यामुळे काय साध्य झाले, या पलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित आहे. याचबरोबर भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जे धोरण आखलेले होते त्यावर लेनिनच्या १९२१च्या नवीन आर्थिक धोरणाचा प्रभाव कसा होता हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित होते. या सर्व प्रश्नांच्या चच्रेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आणि याची उत्तरे नेमकी कशी लिहावीत याची दिशा मिळते.
संदर्भ साहित्य
सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता १२वीचे राज्यशास्त्राचे ‘पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडस’ हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करण्यासाठी बिपन चंद्र लिखित ‘इंडिया आफ्टर इंडिपेंडस’ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात.
First Published on July 16, 2019 3:42 am
Web Title: upsc exam preparation tips upsc exam 2019 zws 70 2

No comments:

Post a Comment