Wednesday, July 3, 2019

शब्दबोध : लसूण कांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे.

शब्दबोध : लसूण

कांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
लसूण
कांदा आणि लसूण हे मराठी माणसाच्या जेवणातील दोन अविभाज्य घटक आहेत. लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवर इलाज आहे. पुलंनी ‘माझे खाद्यजीवन’ या लेखात या लसणाच्या ठेच्याचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘लसणाचा ठेचा ठेवलेल्या भांडय़ावरचे झाकण निघाले की ओसरीवर वासाची वर्दी गेली पाहिजे, की धुवा हात पाय’ अर्थात लसूण ही चवीलाच छान लागते असे नव्हे तर एक औषधी वनस्पतीही आहे. हृदयरोगासाठी तिचा प्रभावी उपयोग होऊ शकतो, असे वैद्य सांगतात. आता शब्दाच्या उत्पत्तीकडे जाऊ.
लसणामधे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या सहा रसांपकी फक्त लवण रस नसतो. खरं म्हणजे लवण रस कुठल्याच वनस्पतीत नसतो. आपण आहारात मिठाचा वापर करून लवण रस मिळवतो. मीठ म्हणजेच लवण. सर्वच प्राण्यांना मीठ आवश्यक असते. अगदी जंगलातील प्राण्यांनाही. मग शाकाहारी प्राणी रानातील ज्या जमिनीत क्षाराचे प्रमाण जास्त असते, अशा ठिकाणची माती चाटतात आणि लवण रस मिळवतात. अशा क्षारपड भागाला चाटण किंवा सॉल्ट लिक असे म्हणतात. हत्ती, गवा, हरीण, सांबर अशा शाकाहारी प्राण्यांच्या चाटणाच्या जागा ठरलेल्या असतात. काही अभयारण्यात वन विभागातर्फे रानात ठिकठिकाणी मिठाचे ढीग रचलेले असतात ते याचसाठी. मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना मारून खातात तेव्हा त्यांना त्या प्राण्यांच्या शरीरातील क्षारही मिळतात. तर सहा रसांपकी एक रस कमी म्हणजे उणा म्हणून लसणाला संस्कृतमधे रसोन असे म्हणतात. (जसे एक उणा वीस म्हणजे एकोणावीस तसेच.). मराठीत येताना या ‘र’चा ‘ल’ झाला. ते स्वाभाविकही असते. पाहा, लहान मुलं राम रामच्या ऐवजी लाम लाम असे बोबडे बोलतात. अर्थात याचा अर्थ आपण मराठी माणसे बोबडे बोलतो असा नाही. तर ‘र’ आणि ‘ल’ हे सवर्ण आहेत.  पाणिनीच्या लघुसिद्धांत कौमुदीच्या टीकेमधे ऋ ल्रृयोर्मिथा सावर्ण्य वाच्यम्। सूत्र आहे. म्हणजेच ऋ आणि ल्रृ हे सवर्ण आहेत. व्यवहारात ऋ आणि ल्रृचे शब्द फारसे आढळत नाहीत म्हणून र आणि ल हे सवर्ण मानले आहेत. संस्कृतमध्येदेखील रोम आणि लोम, रोहित आणि लोहित असे समानार्थी शब्द आहेत. अशा तऱ्हेने रसोनचा लसूण झाला. रसोन म्हणा किंवा लसूण म्हणा, पण आहारातून लसूण उणा करून चालणार नाही.
First Published on April 18, 2019 12:26 am
Web Title: article on garlic

No comments:

Post a Comment