Saturday, December 9, 2017

अर्थ नियोजन : गुंतवणुकीच्या कार्यक्षमतेवर सतत लक्ष हवे! योग्य वित्तीय नियोजक कसा असावा या महत्त्वाच्या विषयावर विचार करावयास लावणारा पुढील लेख होता.

अर्थ नियोजन : गुंतवणुकीच्या कार्यक्षमतेवर सतत लक्ष हवे!

योग्य वित्तीय नियोजक कसा असावा या महत्त्वाच्या विषयावर विचार करावयास लावणारा पुढील लेख होता.

दीपाली चांडक | Updated: December 4, 2017 1:45 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

अर्थसाक्षरतेसाठी सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत विविध व्याख्यानांतून नेहमीच हे निदर्शनास येते की, लौकिक अर्थाने एखादी व्यक्ती कितीही शिक्षित असली तरी अर्थसाक्षरतेकडे त्या व्यक्तीचा कल असेलच असे नाही. म्हणून प्रत्येकाला अर्थ नियोजनाची आवश्यकता भासते. गेल्या वर्षभरात या मासिक सदराच्या ११ लेखांमधून आपण अर्थ नियोजनाच्या विविध मुद्दय़ांचा अभ्यास केला. हे लेख आपल्या गुंतवणुकीशी उद्दिष्टाची योग्य सांगड का महत्त्वाची आहे, बरोबरच ती उद्दिष्टे कशी ठरवावी हे सांगण्यास मदत करणारे  होते.
योग्य वित्तीय नियोजक कसा असावा या महत्त्वाच्या विषयावर विचार करावयास लावणारा पुढील लेख होता. आपली उद्दिष्टे आणि गरजा लक्षात घेऊन, अर्थ नियोजनाचे पर्याय सुचविणारा, योग्य नियोजक निवडणे अत्यंत निकडीचे आहे. योग्य नियोजनाच्या मदतीने आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गरजा व उत्पन्न यांचा ताळमेळ घालता येतो. यासाठी अगदी तरुण वयापासून, अभ्यासपूर्ण केलेले अर्थ नियोजन किती महत्त्वाचे ठरते हे मांडणारा लेख म्हणजे तरुणाईतच अर्थ नियोजनाबद्दल किती जागरूकतेने अभ्यास करणे आवश्यक आहे आणि ते त्यांना कसे आयुष्यभर समाधान आणि आनंद मिळवून देणारे असेल हे मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न होता.

पुढील लेखातून आजच्या काळाची गरज असलेले, निवृत्तीनंतरच्या सुखी व स्वावलंबी दिवसांसाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व विशद केले गेले. सर्वसामान्यपणे असे लक्षात आले आहे की, सरासरी आपण जी बचत करतो त्यातून फक्त १२ टक्के रकमेची तरतूद ही निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी केली जाते. म्हणून या विषयावरील लेख निवृत्तीनंतरच्या विविध पर्यायांवर विचार मांडणारा होता, जसे की पीपीएफ, शेअर बाजारातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, आरोग्य विमा.
प्रत्येक कुटुंबाची आवक ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कमी-अधिक असल्याकारणाने, वेळोवेळी बदलत असणाऱ्या बचतीतून – ठरविलेली दीर्घ मुदतीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, तसेच निवृत्तीनंतरच्या समाधानकारक आयुष्यासाठी, योग्य काळात कराव्या लागणाऱ्या अर्थ नियोजनवर विचार मांडणारा लेखही आला.
नुस्ोतीच बचत करणे उपयोगाचे नसून त्यातून योग्य असे गुंतवणुकीचे पर्याय निवडताना स्वत:शी आणि कुटुंबाशी निगडित अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक असते. जसे – आवक, खर्च, वय, जबाबदारी, गरजा, इ. घटक व्यक्तिपरत्वे बदलतात म्हणूनच एका गुंतवणूकदाराने निवडलेले गुंतवणुकीचे पर्याय दुसऱ्या गुंतवणूकदारासाठी योग्य असतीलच असे नाही. त्यातून पुढे एकरकमी गुंतवणूक की नियमित गुंतवणूक करणे योग्य? या प्रश्नाचाही आपण वेध घेतला.
निवड केलेल्या गुंतवणूक पर्यायांची रोकडसुलभता/ तरलतादेखील महत्त्वाची असते. दीर्घ पल्ल्याची आणि अल्पकालीन उद्दिष्टे आणि अचानक उद्भवणाऱ्या गरजांचा विचार समोर ठेवून गुंतवणुकीचे पर्याय निवडले तर तरलतेची अडचण आयुष्यात सहसा भासत नाही. याच विचाराला समोर ठेवत सध्या प्रत्येक सर्वसामान्य गुंतवणूकदाराची गरज पूर्ण करणारे विविध प्रकारचे मुच्युअल फंडही या दरम्यान आपण अभ्यासले.
कॉर्पोरेट अ‍ॅक्शन म्हणजे कंपनीने स्वत:हून केलेली कृती ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर आणि कर्जरोख्यांवर होतो आणि एकूणच गुंतवणूकदाराच्या मूळ गुंतवणुकीवरसुद्धा. वाचकांच्या आग्रहाखातर एक लेख कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्सवर आधारित होता. अनेक कंपन्यांच्या विविध कॉर्पोरेट अ‍ॅक्शन्स हा त्या समभागात गुंतवणुकीचा निर्णय ठरत असतो, त्या दृष्टीने आवश्यक काळजी आणि दक्षतेचा आपण त्यायोगे विचार केला.
उद्दिष्टाला समोर ठेवून केलेली बचत ते गुंतवणुकीच्या पर्यायांपर्यंतच्या प्रवासात उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी दोन घटक अत्यंत महत्त्वाचे – गुंतवणूक भांडवलाची वाढ आणि नियमित मिळणारा परतावा. पर्याय निवडताना नेहमी लक्षात घेणे आवश्यक आहे की, आपण गुंतवणुकीसाठी विचारात घेत असलेले पर्याय एकाच घटकाचा नियम पाळणारे आहेत की दोन्ही. सर्वसाधारणपणे नेहमी गुंतवणुकीचे पर्याय हे वरील दोन्ही घटकांचा आणि गुंतवणुकीच्या मुदतीचा एकत्रित विचार करणारे असावेत.
‘साकारू अर्थ नियोजन’ या वर्षभर गुंफलेल्या माळेचे हे आजचे शेवटचे पुष्प आणि ते आर्थिक उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थ नियोजन साकारण्यास अत्यंत महत्त्वाचे. बचत का करावयाची आहे? कारण हे जोपर्यंत बचत करणारा ठरविणार नाही तोपर्यंत त्याला कळूच शकणार नाही. आपण करतोय, करतोय ती बचत पुरेशी आहे की नाही, याचे त्याला भान असायला हवे. यालाच जीवनातील आर्थिक उद्दिष्टांची स्पष्टता म्हणतात. मी कुठे आहे? आणि मला कुठे पोहोचायचे आहे? हे प्रश्न उद्दिष्ट ठरविल्याशिवाय सुटत नाहीत. प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पैशांच्या रूपात त्यांचे मूल्य ठरविणे महत्त्वाचे असते. आर्थिक उद्दिष्ट एकदा निश्चित केल्यानंतर त्यानुसार बचत, गुंतवणुकीचे नियोजन आणि त्यानुसार कृती आवश्यक ठरते.
गुंतवणुक म्हटली की, अभ्यासावे असे घटक म्हणजे – परतावा आणि जोखीम. अपेक्षेप्रमाणे गुंतवणुकीचे योग्य मूल्य मिळणे म्हणजे योग्य परतावा. आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडणे म्हणजे जोखीम. योग्य गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे जोखीम आणि परताव्याचा योग्य समतोल. गुंतवणूक करणाऱ्यांना भीती वाटणे स्वाभाविकच आहे आणि भीतीचे तिमीर दूर करतो तो ज्ञानाचा प्रकाश. भीती कमी करावयाची असेल तर जोखीम समजायला हवी, अभ्यासायला हवी.
गुंतवणूक करायची म्हटली की, जोखीम स्वीकारण्याची तयारी हवीच. आणि त्यासाठीच हवे जोखमीचे नियोजन आणि त्यासाठी हवी समतोल गुंतवणूक. जोखमीचा अंदाज घेऊन तिचे नियंत्रण गुंतवणुकीचा महत्त्वाचा घटक आहे. आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, वय, आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्न यांचा पूर्णपणे विचार करूनच काही जोखमी घेता येतात आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने स्वत:चा पूर्ण अभ्यास करूनच गुंतवणुकीचे पर्याय निवडावेत.
खरे तर, गुंतवणुकीस सुरुवात करणे सोपे असते; परंतु बाजाराच्या चढ-उतारानुसार कमी -अधिक होणाऱ्या गुंतवणूक मूल्याकडे, अधिक परताव्याचा मोह आणि बाजार वर-खाली झाल्याची अनावश्यक भीती टाळणे गरजेचे आहे. म्हणूनच अव्वल परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा, सातत्य राखणाऱ्या आणि आपल्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाला साजेसा नियमित शिस्तबद्ध गुंतवणुकीचा पर्याय निवडणे अत्यंत महत्त्वाचे आणि योग्य ठरते.
जसा नियमितपणा गुंतवणुकीत आवश्यक आहे तसेच आपण निवडलेले पर्याय योग्य पद्धतीने, ठरविलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने, कार्य करतात की नाही, याकडे नियमित लक्ष ठेवणे गरजेचे असते. सतत बदलत्या सामजिक, राजकीय आणि आर्थिक घडामोडीच्या या काळात, आपण निवडलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांतून जोखीमरहित निश्चित परतावा साध्य करता येईलच असे नाही. म्हणून बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार, अभ्यासपूर्वक निर्णय आवश्यक आहे. प्रसंगी निर्णयात योग्य तो बदल करण्याची मानसिकता ठेवणे हिताचे ठरते.
गुंतवणुकीच्या पर्यायात योग्य ते बदल करताना, प्रमाणपत्रधारक वित्तीय नियोजनकाराची मदत घेणे केव्हाही उपयुक्तच असते. जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीतील जोखीम घटक याचा सारासार विचार करून एक तज्ज्ञ नियोजनकार ठरलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतील असे योग्य पर्याय नक्कीच सुचवू शकतो.
इथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे की, होणारा फायदा आणि नुकसान हे केवळ गुंतवणुकीचे पर्याय योग्य असल्यामुळे किंवा चुकल्यामुळे नसून, आपण त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवून, गरज पडल्यास वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे होत असतो आणि म्हणून अभ्यासपूर्वक घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरतात.
arthasanvad@gmail.com
लेखिका नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक असून त्या ‘सेबी’तर्फे अर्थसाक्षरतेसाठी उपक्रमशील आहेत.
First Published on December 4, 2017 1:45 am
Web Title: deepali chandak tips for financial planning

करिअरमंत्र ग्रंथालयातील चांगली नोकरी म्हणजे ग्रंथपाल वा ग्रंथालय साहाय्यकाची.

करिअरमंत्र

ग्रंथालयातील चांगली नोकरी म्हणजे ग्रंथपाल वा ग्रंथालय साहाय्यकाची.

सुरेश वांदिले | Updated: November 21, 2017 2:14 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए पूर्ण केले आहे. मला पुढे ग्रंथालयामध्ये काम करण्याची इच्छा आहे. मला चांगली सरकारी नोकरी मिळेल यासाठी मी कोणता अभ्यासक्रम पूर्ण करायला हवा? कैलाश एच
ग्रंथालयातील चांगली नोकरी म्हणजे ग्रंथपाल वा ग्रंथालय साहाय्यकाची. यासाठी बॅचलर इन लायब्ररी अँड इन्फर्मेशन सायन्स हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना संधी मिळू शकते. कोणत्याही पदवीधराला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. विविध ग्रंथालयांमधील जागा या मर्यादित स्वरूपाच्या असल्याने, अशा जागा रिक्त झाल्यावरच त्या भरल्या जातात. त्यामुळे हा अभ्यासक्रम केल्यावर लगेच नोकरी मिळणार नाही. सध्या अनेक मोठय़ा बुक स्टोअर्सना/बुक मॉल्सनासुद्धा ग्रंथालय शास्त्रातील पदवीधरांची आवश्यकता भासते. मात्र संबंधितांकडे प्रत्यक्ष जाऊनच तुला याचा शोध घ्यावा लागेल.
मी दहावी-बारावी केले नाही. थेट आठवीनंतर पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए केले आहे. आता मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यात यशस्वी झालो नाही तर दुसरा पर्याय म्हणून कमी कालावधीचा एखादा अभ्यासक्रम करता येईल का? मला तंत्रज्ञान, संगणक, संगीत, इलेक्ट्रॉनिक्स ही क्षेत्रे खूप आवडतात. मी पुढे कोणता अभ्यासक्रम करू?

शैलेश केंगार
सध्याच्या काळात कोणताही अभ्यासक्रम केल्याबरोबर लगेच नोकरी मिळेल असे काही संभवत नाही. त्यातही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम करून त्यात तज्ज्ञता मिळवल्यासच रोजगाराच्या वा स्वयंरोजगाराच्या संधी मिळणे सुलभ जाऊ  शकते. सध्या चांगली व तत्पर सेवा देणारे इलेक्ट्रिशियन मिळत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिशियनचा अभ्यासक्रम केल्यास चांगल्या संधी मिळू शकतील. संगीताच्या क्षेत्रात तुला आवड आहे असे तू नमूद केले आहेस. ही आवड गायनाची आहे की संगीत निर्मितीची आहे. हे आधी स्पष्ट व्हायला हवे. गायनाची आवड असल्यास तुला एखाद्या संगीत शाळेतून गायनाचे रीतसर प्रशिक्षण घ्यावे लागेल. तसेच भरपूर सराव करावा लागेल. या क्षेत्रात संधी खूप असल्या तरी स्पर्धासुद्धा तगडी आहे. त्यामुळे तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी विशेष गुणवत्ता असेल तरच स्पर्धेत टिकता येऊ  शकते. शिवाय संधी लगेच मिळेल असेही नाही. त्यामुळे संयमाची गरज भासते.
संगीत निर्मितीच्या क्षेत्रात जायचे असल्यास तुला म्युझिक फाऊंडेशन (लेव्हल वन) हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. अल्प मुदतीचा हा अभ्यासक्रम व्हिसलिंग वूड इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिल्म कम्युनिकेशन अँड क्रिएटिव्ह आर्ट्स या संस्थेने सुरू केला आहे.
संपर्क – /www.whistlingwoods.net/short-course-unit/ याच संस्थेने सर्टिफिकेट इन म्युझिक कंपोझिंग हा ३ महिने कालावधीचा अभ्यासक्रमसुद्धा सुरू केला आहे.
संपर्क – www.whistlingwoods.net/tiss-sve-3-months-programme.
संगणकाचे विविध अल्प मुदतीचे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी सुरू असतात. त्यामध्ये डेस्क टॉप पब्लिशिंग, वेब डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग अशासारख्या विषयांचा समावेश आहे. आता एकाच वेळी तुला हे अभ्यासक्रम करणे शक्य होईल का, याचा विचार करायला हवा. ज्या विषयामध्ये तुला सर्वाधिक गती व आवड आहे, त्या विषयातच तू पुढील अभ्यासक्रम करावास असे वाटते. दरम्यान तू स्पर्धा परीक्षेच्या तयारीवरच अधिक लक्ष केंद्रित करावे.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)
First Published on November 21, 2017 2:14 am
Web Title: career guidance career advice career counseling 2

पुढची पायरी : कंपनीच्या मालमत्तेचे रक्षण कंपनीने जबाबदारीने दिलेल्या अनेक वस्तूंचे व गोष्टींची जपणूक व निगराणी करणे हे तुमचे कर्तव्य

पुढची पायरी : कंपनीच्या मालमत्तेचे रक्षण

कंपनीने जबाबदारीने दिलेल्या अनेक वस्तूंचे व गोष्टींची जपणूक व निगराणी करणे हे तुमचे कर्तव्य

डॉ. जयंत पानसे | Updated: November 18, 2017 2:07 AM

कंपनीने जबाबदारीने दिलेल्या अनेक वस्तूंचे व गोष्टींची जपणूक व निगराणी करणे हे तुमचे कर्तव्य ठरते.

कंपनी आपल्याला नोकरीला ठेवते तेव्हा नुसता पगार देत नाही तर बऱ्याच काही गोष्टी त्याबरोबर देते. त्यातील मुख्य म्हणजे तुमची नवीन ओळख. कंपनीतील अमुक जबाबदारी पेलणारा कर्मचारी म्हणून ही ओळख असते. कंपनीची जनमानसातील प्रतिमा, त्यांची तत्त्वे, कंपनीला मिळणारा आदर यांची साथ व आधार तुम्हाला आपोआप मिळतो. यामुळेच कंपनीने जबाबदारीने दिलेल्या अनेक वस्तूंचे व गोष्टींची जपणूक व निगराणी करणे हे तुमचे कर्तव्य ठरते.
तुम्हाला दिलेली मालमत्ता व्यवसायवृद्धीसाठी आहे, वैयक्तिक वापरासाठी नाही ही जाणीव मनात पक्की राहायला हवी. ज्या क्षणी नोकरीचा स्वीकार केलात त्या क्षणापासून एक नवी जबाबदारी तुमच्यावर येते. ती म्हणजे तुमच्या जबाबदारीनुसार तुम्हाला मिळालेली कंपनीची मालमत्ता सांभाळणे, त्याची हानी, चोरी, गैरवापर होऊ न देणे.
यातील काही वस्तूंची यादी अशी
*    कंपनीचे नाव व चिन्ह (लोगो), संगणक, लॅपटॉप, मोबाइल फोन आणि साहाय्यक उपकरणे.
सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर परवाने.
*   कार्यालयीन सामान, दरवाजाच्या / कपाटांच्या किल्ल्या.
*   फॅक्स, कॉपी मशीन आणि इतर कार्यालयीन उपकरणे.
*   पुस्तके, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सीडीज, डीव्हीडी, यूएसबी आणि इतर माध्यमे,

*   व्यवसाय योजना, संशोधन व विकास, सहयोगी संस्थांबरोबरच्या कराराचा तपशील यांची माहिती.
*   उत्पादनाचे व गुणवत्ता नियंत्रणाचे तंत्रज्ञान
*   ग्राहक, पुरवठादार आणि वितरक यांची सूची आणि माहिती
जर चोरी झाली असेल, मालमत्तेचा किंवा निधीचा दुरुपयोग किंवा अपव्यय झाला असेल किंवा त्यांच्या योग्य वापराबद्दल काही प्रश्न असतील तर आपल्या व्यवस्थापक किंवा प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलावे. कंपनीच्या संपत्तीचा गैरवापर करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचा भंग आहे आणि तो एक गुन्हा ठरू शकतो. अशा सुविधा / मालमत्ता व्यक्तिगत उपयोगासाठी वापरल्या तर कारवाई होऊन तुमची नोकरी पण जाऊ  शकते.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा सेवा – ई-मेल, इंटरनेट, इंट्रानेट्स, टेलिफोन, कॉम्प्युटर उपकरणे, व्हिडीओ/ व्हॉइस आणि अन्य प्रकारच्या संवादसेवा याबद्दल घ्यायची विशेष काळजी : वरील सर्व उपकरणे / सेवा उपलब्ध करून देताना, त्यांचा सुयोग्य व सुरक्षित उपयोग व्हावा, गोपनीयता रहावी यासाठी कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र ओळख क्रमांक (Login id-  लॉगइन आयडी) व संकेतशब्द (पासवर्ड) देते. अशा वेळी तुम्ही या दोन्ही गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्या कामाशी संबधित कारणासाठीच वापरल्या पाहिजेत. त्या कोणालाही सांगितल्या जाणार / कळणार नाहीत याची काळजी घेऊन सुरक्षित ठेवणे आवश्यक असते.
या सर्व सिस्टिम्स व्यावसायिक कामासाठी दिल्या आहेत. विशिष्ट परिस्थितीत वैयक्तिक उद्देशासाठी ई-मेल, इंटरनेट, इंट्रानेट आणि फोनचा मर्यादित आणि प्रासंगिक वापर करण्याची परवानगी कंपनी देईलही, तथापि, तुम्ही वैयक्तिक कारणासाठी त्याचा अति वापर केल्यास ही कृती बहुतेक वेळेस निषिद्ध समजली जाईल. अनुषंगिक कारवाई व शिक्षा भोगावी लागेल.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे / माध्यमे वापरायला सोपी असतात असा बहुतेकांचा समज आहे. पण बरेच वेळा या गोष्टी कशा वापराव्या याचे सखोल ज्ञान आवश्यक ठरते. अन्यथा चुकीच्या वापरामुळे, अजाणतेपणीसुद्धा अवांछित व्यक्तींकडे कंपनीची गोपनीय माहिती जाऊ शकते, जो मोठाच गुन्हा ठरतो. यामुळेच तुम्हाला कंपनीने दिलेली कुठलीही उपकरणे किंवा सुविधेचा वापर प्रथम नीट अभ्यासून घ्या.
ई-मेलसारखी लेखी संवाद साधने वापरताना उत्तम भाषेचा वापर करा. सम्यक विचारच त्यात मांडा. निष्काळजी, अतिशयोक्तीपूर्ण किंवा चुकीची ई-मेल विधाने टाळा. अशी विधाने तुमच्या  किंवा कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करताना वापरली जाऊ  शकतात.
अपमानकारक किंवा इतर व्यक्तीस छळवणारी कोणतीही माहिती पाठवू किंवा डाउनलोड करू नका.
अश्लील, जुगार किंवा गेमिंग किंवा तत्सम सामग्रीशी संबंधित असलेल्या इंटरनेट साइट्स कंपनीमध्ये पाहणे निषिद्ध असते.
संगीत, चित्रफिती, छायाचित्रे डाउनलोड करण्याची सुविधा वापरून कॉपीराइटचा भंग करू नका. तसेच वैयक्तिक वापरासाठी कुठलेही अ‍ॅप्लिकेशन / प्रोग्रॅम / गेम डाउनलोड करू नका.
नोकरीच्या पहिल्या वर्षांत अज्ञानामुळे किंवा नाठाळ सहकाऱ्यांच्या अवास्तव दडपणामुळे बऱ्याच चुका होऊ  शकतात. तेव्हा काळजी घ्या, खंबीर राहा व सदैव सतर्क राहा.
डॉ. जयंत पानसे  dr.jayant.panse@gmail.com
First Published on November 18, 2017 2:07 am
Web Title: protection of company property

एमपीएससी मंत्र : शेतकरी उत्पन्नवाढीचे प्रयत्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांची कर्जमाफी हा सध्याच्या चालू घडामोडींमधील अतिशय महत्त्वाचा विषय आहे.

एमपीएससी मंत्र : शेतकरी उत्पन्नवाढीचे प्रयत्न

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांची कर्जमाफी हा सध्याच्या चालू घडामोडींमधील अतिशय महत्त्वाचा विषय आहे.

रोहिणी शहा | Updated: November 17, 2017 2:49 AM

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांची कर्जमाफी हा सध्याच्या चालू घडामोडींमधील अतिशय महत्त्वाचा विषय आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांची कर्जमाफी हा सध्याच्या चालू घडामोडींमधील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कृषी उत्पन्नाबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नही करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने होणाऱ्या विविध प्रयत्नांचा आढावा या लेखामध्ये घेण्यात येत आहे.
सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गट
सध्या राज्यातील १६ जिल्ह्य़ांत शासकीय सघन कुक्कुट विकास प्रकल्प, चार ठिकाणी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र आणि एका ठिकाणी बदक पदास केंद्र कार्यरत आहे. तसेच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर १४ जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे २८ सघन कुक्कुट विकास गटांची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील इतर ३०२ तालुक्यांमध्ये सघन कुक्कुट विकास गटांची स्थापना करण्यात येणार आहे. प्राथमिक समूहाचे संगोपन करण्यासाठी या योजनेअंतर्गत पुढील बाबीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
*  एक हजार चौ. फुटांच्या दोन पक्षीगृहांचे बांधकाम.
*  स्टोअर रूम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण.
*  खाद्य व पाण्याची भांडी, ब्रुडर, इतर उपकरणे व लसीकरण.
*  लघु अंडी उबवणूक यंत्र तसेच ४०० उबवणुकीची अंडी.
*  २० आठवडे वयाचे अंडय़ांवरील ५०० पक्षी.
* एक हजार एकदिवसीय पिलांसाठी २० आठवडे कालावधीपर्यंत पक्षी खाद्यपुरवठा आणि पक्षी खाद्य ग्राइंडर आणि एग नेस्ट्स.

* पायाभूत सुविधांच्या खरेदीसाठी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना राज्य शासनाचे ५० टक्के म्हणजे
५ लाख १३ हजार ७५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
* सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करणारे सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील लाभार्थी तसेच लघु अंडी उबवणूक यंत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य तसेच ३० टक्के महिला लाभार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
* लाभार्थ्यांना कुक्कुटपालनविषयक ५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
* रोगप्रतिकारक क्षमता असलेले गिरीराज, वनराज, सातपुडा, सुवर्णधारा, ग्रामप्रिया यासारख्या सुधारित पक्ष्यांचे लो इनपुट टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने संगोपन केले जाईल.
* उत्पादित अंडी व पक्ष्यांच्या विक्रीतून व्यावसायिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
*  दैनंदिन आहारात प्रथिनयुक्त आहाराचा समावेश होऊन कुपोषणावर मात होण्यास मदत होईल.
स्वयंम प्रकल्प
* आदिवासी कुटुंबांसाठी स्वयंरोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुढील दोन वर्षांसाठी स्वयंम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात परसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन दिले जाईल, तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाडय़ांतील मुलांच्या आहारात अंडय़ांचा पुरवठा केला जाईल. या प्रकल्पांतर्गत एकूण ४३ हजार ३६८ कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे.
* स्वयंम प्रकल्प हा राज्यातील ठाणे, पालघर व रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, धुळे अमरावती व यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड या १६ जिल्ह्य़ांत राबविण्यात येणार आहे.
*  या जिल्ह्य़ांतील एकूण १०४ एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी एक युनिट याप्रमाणे १०४ खासगी पक्षी संगोपन केंद्रे (मदर युनिट)स्थापन करण्यात येणार आहेत.
*  प्रत्येक युनिटला ४१७ लाभधारकांना संलग्न करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत एकूण ४३ हजार ३६८ कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे.
*  आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाडय़ांतील मुलांच्या आहारात अंडय़ांचा पुरवठा करून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
राजे यशवंतराव होळकर  महामेष योजना
* भटक्या जमाती – क या प्रवर्गातील, म्हणजेच धनगर व तत्सम जमातीमधील सुमारे एक लाख कुटुंबीयांकडून भटकंतीच्या स्वरूपात मेंढी पालन व्यवसाय केला जातो. मेंढी पालनाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष ही नवीन योजना पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाकडून राबविण्यात येत आहे.
* यामध्ये २० मेंढय़ा व एक नरमेंढा अशा २००० गतांचे वाटप करण्यात येणार आहे.
* भटक्या जमाती – क या प्रवर्गात समाविष्ट नसलेल्या मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मेंढीपालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
* मूर्घास बनविण्याच्या यंत्र खरेदीसाठी चार लाखांपर्यंत २५ अनुदाने तर पशुखाद्य तयार करणारे कारखाने उभारण्यासाठी पाच लाखांपर्यंतचे अनुदान ५ कारखान्यांना देण्यात येणार आहे.
* जागतिक पातळीवर मेंढय़ांच्या मांसाचे सेवन मोठय़ा प्रमाणावर करण्यात येते. देशातील दक्षिण भागातील राज्यांमध्ये मेंढीच्या मांसाला मोठय़ा प्रमाणावर वाव आहे.
* मेंढीपालन व्यवसाय ठाणबंद पद्धतीने केल्यास त्यातून प्राप्त होणाऱ्या घटकांची (मांस, दूध लोकर इत्यादी) व्यापारी दृष्टिकोनातून
उत्पादने घेता येऊ शकतील. परिणामी, या व्यवसायातील नफा क्षमता वाढण्यास आणि  मेंढीपालन व्यवसाय किफायतशीर होण्यात मदत होईल.
First Published on November 17, 2017 2:49 am
Web Title: mpsc exam preparation guidance

नोकरीची संधी सध्या तुझ्याकडे असणाऱ्या दोन्ही पदव्या या उत्तम करिअर करण्यासाठी उपयुक्त आहेत.

नोकरीची संधी

सध्या तुझ्याकडे असणाऱ्या दोन्ही पदव्या या उत्तम करिअर करण्यासाठी उपयुक्त आहेत.

सुहास पाटील | Updated: November 17, 2017 2:45 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

*   मी सध्या एलएल.बी.च्या तृतीय वर्षांला आहे. माझे एम.कॉम. झाले आहे. पुढे नोकरी करायची इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल? कोणते डिप्लोमा कोर्स उपयोगी पडतील? – श्रेयस जोशी
सध्या तुझ्याकडे असणाऱ्या दोन्ही पदव्या या उत्तम करिअर करण्यासाठी उपयुक्त आहेत. अशा स्थितीत तू पुन्हा एखादा नवा डिप्लोमा करून वेळ व्यतीत करणे योग्य ठरणारे नाही. तू सनद प्राप्त करून वकिली सुरू करू शकतोस. अनुभव आणि तुझे कौशल्य यावर या क्षेत्रात मोठी उंची गाठणे शक्य आहे. मात्र त्यासाठी तुला तुझ्या विषयाचे संपूर्ण आकलन होणे आवश्यक ठरते. शिवाय इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये लेखनकौशल्य आणि संवादकौशल्य प्राप्त केल्यास तुला वकिली करताना त्याचा खूप फायदा होईल.
या दोन कौशल्यांच्या बळावर अनेक वकील यशाचे धनी झाले आहेत. ज्यांच्याकडे असे कौशल्य कमी असते त्यांच्या प्रगतीत अडथळे येऊ  शकतात. एम.कॉम. केल्यामुळे तू कॉर्पोरेट टॅक्स, आयकर, संपत्ती कर अशासारख्या विषयांना कायद्याची जोड देऊन संबंधित ग्राहकांना सेवा देऊ  शकतोस. एमपीएससी आणि यूपीएससी हे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. लष्कराच्या विधी शाखेतही लघू सेवा कमिशन तुला मिळू शकते. तुझ्या विधीविषयक ज्ञानाला अधिक सक्षम करणारे पुढील काही पदविका अभ्यासक्रम करिअरची वेगळी उंची गाठण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

डिप्लोमा इन
१) लेबर लॉज अँड लेबर वेल्फेअर
२) आर्ब्रिटेशन, काउन्सिलिएशन अँड
अल्टरनेटिव्ह डिस्प्युट रिझोल्युशन सिस्टिम,
३) टॅक्सेशन लॉज,
४) इंटरनॅशनल बिझिनेस लॉज अँड
कोऑपेरिटव्ह लॉज इन इंडिया,
५) सायबर लॉज,
६) इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉज,
७) ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड
लेबर लॉज,
७) टॅक्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन.
याचसोबत काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम
पुढीलप्रमाणे आहेत –
सर्टिफिकेट इन
१) ट्रान्झिशनल लीगल प्रॅक्टिस,
२) सिक्युरिटीज लॉज,
३) स्पोर्ट्स एन्टरटेनमेंट लॉ,
३) परॉलीगल सव्‍‌र्हिसेस,
४) न्युक्लिअर लॉज,
५) मीडिया अँड टेलिकम्युनिकेशन लॉ,
६) इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ
७) मेरिटाइम अँड शिपिंग लॉ,
७) इन्शुरन्स लॉ,
७) जेन्डर अँड लॉ,
८) जेन्डर, ह्य़ुमन राइट्स अँड लीगल लिटरसी,
९ ) एनर्जी लॉ,
१०) सायबर लॉ,
११) कॉर्पोरेट अँड बिझिनेस लॉ,
१२) बँकिंग लॉ,
१३) एअर अँड स्पेस लॉ
संपर्क – सिम्बॉयसिस लॉ स्कूल, पुणे – www.symlaw.ac.in/diploma-programme
(ब) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉ या संस्थेने डिप्लोमा इन पॅरालीगल प्रॅक्टिस हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
संपर्क –  http://www.ignou.ac.in/ignou/aboutignou/school/sol/
(क) एशियन स्कूल ऑफ सायबर लॉज – डिप्लोमा इन सायबर लॉ, संपर्क – http://www.asianlaws.org/glc.php
(ड) शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सिक्युरिटीज लॉ,
पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन ह्य़ुमन राइट्स , पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल
प्रॉपर्टी लॉज, संपर्क –  http://www.glcmumbai.com
* मी नुकतेच शिक्षणशास्त्र या विषयात एम.एड. केले आहे. मला वरिष्ठ अधिव्याख्याता गट अ, गट ब, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र शिक्षण सेवा, ही परीक्षा द्यायची आहे, तरी यासाठी काय करावे लागेल?
– राजेश गावीत,  महाराष्ट्र शिक्षण सेवेसाठी तुला
राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा द्यावी लागेल. वरिष्ठ अधिव्याख्याता होण्यासाठी तुला नेट / सेट ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लगेच नोकरी मिळत नाही. ही पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच अधिव्याख्यात्याच्या निवडप्रक्रियेत प्राधान्य दिले जाते.
First Published on November 17, 2017 2:45 am
Web Title: job opportunity in india job vacancies in india government jobs in india 2

यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास : सर्वसमावेशक वाढ आणि संबंधित मुद्दे

अकराव्या पंचवार्षकि योजनेनुसार सर्वसमावेशक वाढीची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.

श्रीकांत जाधव | Updated: November 7, 2017 1:02 AM
आजच्या लेखामध्ये आपण सर्वसमावेशक वाढ आणि संबंधित मुद्दे यावर चर्चा करणार आहोत. यावर मागील वर्षांमधील मुख्य परीक्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते याबरोबरच या घटकाच्या परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन कसे करावे आणि यासाठी नेमके कोणते संदर्भग्रंथ वापरावेत याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
सर्वसमावेशक वाढीची संकल्पना
अकराव्या पंचवार्षकि योजनेनुसार सर्वसमावेशक वाढीची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. समाजातील सर्व घटकांसाठी व्यापक तत्त्वावर आधारित लाभाची आणि समान संधीची सुनिश्चितता करणारी वृद्धीची प्रक्रिया म्हणजे सर्वसमावेशक वाढ होय. थोडक्यात ही वाढीची प्रक्रिया विस्तृत प्रकारची, सर्वामध्ये विभागली जाणारी आणि गरिबीसन्मुख असणारी असेल असे करण्यात आलेली आहे. सरकारने वाढीची प्रक्रिया सर्वसमावेशक व समन्यायी करण्यासाठी विविध प्रकारच्या विकासात्मक योजना सुरू केलेल्या आहेत. या योजना दारिद्रय़निर्मूलन, गटामधील समानता, प्रादेशिक समानता, पर्यावरण शाश्वतता, शिक्षण व आरोग्य, शाश्वत पद्धतीने शेतीची वाढ, आर्थिक समावेशकता, पायाभूत सुविधा या क्षेत्राशी संबंधित आहेत ज्यामुळे होणारी वृद्धीची प्रक्रिया सर्वसमावेशकतेच्या दिशेने होणारी असेल.
भारताने १९९१नंतर आर्थिक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केल्यानंतर आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळालेली आहे. आर्थिक उदारीकरण सुरू झाल्यापासून भारतात मध्यम वर्गाची वाढ वेगाने झाल्याचे दिसत आहे. तरीही जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था अजून कनिष्ठ मध्यमवर्ग या गटातच मोडते. देशाच्या विकासाचा विचार करत असताना आजवर दरडोई उत्पन्नाचा वाढणारा दर, अर्थव्यवस्था वाढीचा दर, उत्पादनवाढीचा दर, आयात-निर्यात व्यापारातील तूट, वित्तीय तूट अशा मुद्दय़ांचाच प्रामुख्याने विचार केला जात होता. अशा आर्थिक प्रगतीचे लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहचतात की नाही याकडे विशेष लक्ष दिले गेलेले नव्हते. पण सद्य:स्थितीमध्ये आर्थिक विकास समाजाच्या सर्व स्तरापर्यंत एकसमान पद्धतीने करता यावा आणि जे लोक या आर्थिक विकासात्मक प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना या विकासात्मक प्रक्रियेत सामावून घेतले गेले आहे. एकूणच देशाच्या आर्थिक विकासात्मक प्रक्रियेला सर्वसमावेशक बनविण्यासाठी सरकारमार्फत विविध धोरणे व योजनांची आखणी करण्यात आलेली आहे. हे सर्व काही सर्वसमावेशक वाढ साध्य करण्याच्या धोरणाचा भाग आहे. अलीकडील काळामध्ये सर्वसमावेशक वाढ हा घटक आर्थिक विकास प्रक्रियेतील धोरणाचा महत्त्वाचा भाग बनविण्यात आलेला आहे. आर्थिक वृद्धी जर सर्वसमावेशक असेल तरच अधिक प्रमाणात आर्थिक संधी प्राप्त करता येतील. तसेच याच्या जोडीला सर्वाना समान स्वरूपात संधी सुनिश्चित करता येतील, ज्याद्वारे शाश्वत वाढ साध्य करता येईल हा मुख्य उद्देश सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या धोरणात्मक नीतीचा भाग आहे; सरकारमार्फत ११व्या आणि १२ व्या पंचवार्षकि योजनांमध्ये सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी विशेष भर देण्यात आलेला आहे. ज्यामुळे आर्थिक आणि सामजिक सक्षमीकरणाचे ध्येय साध्य करता येऊन आर्थिक विकासाची प्रक्रिया अधिक प्रमाणात उत्पादनक्षम बनवता येईल. हा अंतिम उद्देश ठेऊन सर्वसमावेशक वाढीच्या धोरणाची रणनीती सरकारमार्फत आखण्यात आलेली आहे.

२०१३-२०१७ मधील मुख्य परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न
  • ‘सर्वसमावेशक वाढीच्या रणनीतीला ध्यानात घेऊन, नवीन कंपनी बिल-२०१३ मध्ये ‘सामूहिक सामाजिक उत्तरदायित्व’ अप्रत्यक्षपणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. याला गंभीरपणे राबविण्यासाठी येणाऱ्या समस्या याची चर्चा करा. तसेच या बिलामधील इतर तरतुदींचा व त्यांच्या परिणामाची चर्चा करा.’ (२०१३)
  • ‘भांडवलशाहीने जागतिक अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व भरभराटी दिलेली आहे. जरी असे असले तरी भांडवलशाही पुष्कळदा लघुदृष्टीतेला प्रोत्साहित करणारी आहे. तसेच श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील विषमतावाढीला साह्यभूत राहिलेली आहे. याच्या प्रकाशझोतात भारतात सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी भांडवलशाहीचा स्वीकार करणे योग्य असेल का? चर्चा करा.’ (२०१४)
  • ‘भारतात सर्वसमावेशक वाढीच्या संदर्भातील आव्हाने ज्यामध्ये निष्काळजी आणि निरुपयोगी मनुष्यबळाचा समावेश आहे, यावर भाष्य करा. या आव्हानांचा सामना करण्याच्या उपाययोजना सुचवा.’ (२०१६)
  • ‘सर्वसमावेशक वाढीची ठळक वैशिष्टय़े काय आहेत? अशा प्रकारच्या वाढीच्या प्रक्रियेचा भारत अनुभव घेत आहे का? विश्लेषण करा आणि उपाययोजना सुचवा.’ (२०१७)
अशा स्वरूपाचे थेट प्रश्न विचारण्यात आलेले होते. अर्थात हे प्रश्न वस्तुनिष्ठ माहिती आणि त्याचे विवेचनात्मक पलू या बाबींचा एकत्रितपणे विचार करून विचारण्यात आलेले होते आणि अशा प्रश्नांचे नेमकेपणाने उत्तर लिहिण्यासाठी या घटकाच्या मूलभूत माहितीबरोबरच चालू घडामोडींचाही अभ्यास करणे अपरिहार्य ठरते. याव्यतिरिक्त या घटकावर विचारण्यात आलेले बहुतांशी प्रश्न हे अप्रक्ष स्वरूपात विचारण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये गरिबी निर्मूलन, पोषण आणि आरोग्य, जनसांख्यिकीय लाभांश, ग्रामीण भागाचा विकास, कृषी क्षेत्र, रोजगार, पायाभूत सुविधा, यामध्ये असणाऱ्या समस्या आणि यामध्ये अधिक प्रमाणात विकास घडवून आणण्यासाठी सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कायदे यांसारख्या बाबींचा एकत्रितपणे विचार केला गेलेला आहे आणि हे सर्व घटक सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.
या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने मूलभूत अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीचे ११ वी आणि १२ व्या  इयत्तेची भारतीय आर्थिक विकास Indian Economic Development) आणि Macro Economics या पुस्तकांचा वापर करावा, ज्यामुळे या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासता येते. याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरील मिश्रा आणि पुरी, दत्त आणि सुंदरम यापकी कोणत्याही एका संदर्भ ग्रंथाचा या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापर करावा. तसेच याच्या जोडीला उमा कपिला लिखित कल्ल्िरंल्ल
Economy Performance and Policies या संदर्भग्रंथामधील सर्वसमावेशक वाढीशी संबंधित प्रकरणे अभ्यासावीत. कारण या संदर्भ ग्रंथामध्ये संबंधित विषयाची चिकित्सक पद्धतीने चर्चा केलेली आहे. या घटकावर चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न विचारण्यावर अधिक भर दिला जातो. ज्यासाठी द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे, योजना व कुरुक्षेत्र ही मासिके, केंद्र सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या योजना, केंद्र सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल, केंद्रीय अर्थसंकल्प, तसेच इंडिया इयर बुक आणि द युनिक अकादमीमार्फत प्रकशित होणारी भारत वार्षकिी यामधील आर्थिक घडामोडीशी संबंधित प्रकरणे, इत्यादी संदर्भ या विषयाच्या परीक्षाभिमुख र्सवकष तयारीसाठी उपयुक्त ठरतात. पुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकासामधील कृषी क्षेत्र व कृषी सलंग्न क्षेत्रे या घटकाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
First Published on November 7, 2017 1:02 am
Web Title: financial development upsc exam

थेट कर्ज (इतर मागासवर्गीयांसाठी) लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.

थेट कर्ज (इतर मागासवर्गीयांसाठी)

लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.

लोकसत्ता टीम | Updated: November 7, 2017 1:00 AM

लाभार्थी होण्यासाठी अटी
  • लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
  • त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
  • तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ९८हजार रुपयांपेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख २० हजारापेक्षा कमी असावे.
  • कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
  • कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशील
  • उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती.
  • जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे.
  • व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतार
  • शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
  • २ जामीनदारांची प्रमाणपत्रे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतिज्ञापत्र.
  • तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.
  • व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.
अधिक माहितीसाठी : http://www.msobcfdc.org/loan
First Published on November 7, 2017 1:00 am
Web Title: direct loan for other backward classes

करिअरमंत्र पीएच.डी. करण्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागेल.

करिअरमंत्र

 पीएच.डी. करण्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागेल.

सुरेश वांदिले | Updated: November 7, 2017 12:56 AM

मी राज्यशास्त्र या विषयात एम.ए. करत आहे. मी बहि:शाल पद्धतीने शिक्षण घेत आहे. प्रथमवर्ष तर मी पूर्ण केले, पण काही आर्थिक अडचणींमुळे द्वितीय वर्षांला प्रवेश घेऊ  शकले नाही. आता नोंदणी करण्याची वेळ निघून गेली आहे. मला पदव्युत्तर पदवी घ्यायची आहे. तसेच पीएच.डी.सुद्धा करायचे आहे. मी काय करावे?
चैताली पोळ
पीएच.डी. करण्यासाठी तुम्हाला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावाच लागेल. कारण पीएच.डी.साठी ती आवश्यक अर्हता आहे. त्यामुळे तू राज्यशास्त्र या विषयातच दुसऱ्या वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. तो बहि:शाल पद्धतीने केला तरी चालेल. तुला अद्यापही दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळू शकतो.
मी रसायनशास्त्रातून बीएस्सी करत आहे. सध्या पदवीच्या तृतीय वर्षांला आहे. मला ५५-६० टक्के गुण मिळाले आहेत. रसायनशास्त्रात उत्कृष्ट करिअर करण्यासाठी मी काय करायला हवे
उमेश कोळेकर
रसायनशास्त्रात उत्तम करिअर करण्यासाठी सर्वप्रथम दर्जेदार संस्थेमधून एम.एमस्सी करणे आवश्यक आहे. अशी संधी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (दिल्ली/ मुंबई/ मद्रास/ रुरकी/कानपूर/गांधीनगर/ इंदौर/गौहाटी/ धनबाद/ रोपर/पाटणा) आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथील अभ्यासक्रमांद्वारे मिळू शकेल. आयआयटी भुवनेश्वर आणि खरगपूर येथे जॉइंट एमएस्सी- पीएच.डी. इन केमिस्ट्री या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

आयआयटी मुंबई येथे डय़ुअल डिग्री एम.एस्सी-पीएच.डी. इन एन्व्हॉयरॉन्मेंटल सायन्स इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.(अर्हता- पदवी अभ्यासक्रमात किमान दोन वर्षांसाठी जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/रसायनशास्त्र/गणित /भौतिकशास्त्र यांचा अभ्यास केलेला असावा.
आयआयटी भुवनेश्वर येथे जॉइंट एम.एस्सी- पीएच.डी. इन अ‍ॅटमॉस्फिअर अँड ओशन सायन्स या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. (अर्हता- पदवी अभ्यासक्रमात रसायनशास्त्र या विषयासह गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश असावा.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तुला जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एम.एस्सी ही परीक्षा द्यावी लागेल.
मुंबईस्थित इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेतील एम.एस्सी इन केमिस्ट्री या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यास उत्तम प्रकारचे करिअर घडू शकते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते.
संपर्क – http://www.ictmumbai.edu.in
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
First Published on November 7, 2017 12:56 am
Web Title: career guidance career advice

पुढची पायरी : स्वत:चा ब्रँड बनवताना.. अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी की असे स्व-ब्रँडिंग कुठेही शिकायला मिळत नाही.

पुढची पायरी : स्वत:चा ब्रँड बनवताना..

अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी की असे स्व-ब्रँडिंग कुठेही शिकायला मिळत नाही.

डॉ. जयंत पानसे | Updated: November 4, 2017 5:54 AM

ब्रँडचा उपयोग लोकप्रियता वाढविण्यासाठी होतो.

आज कुठेही बघा, प्रत्येकाचा एक ब्रँड असतो; ती मग वस्तू असो, किंवा कंपनी किंवा एखादा माणूस. त्याचा एखादा गुणधर्म जरी आपल्याला कळला तरी त्या गोष्टीची पूर्ण प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. जसे की, दररोजच्या वापरातील टूथपेस्ट, फ्रीजसारख्या घरगुती वस्तू बनविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी किंवा समाजकारणामुळे ख्यातकीर्त झालेली व्यक्ती. थोडक्यात काय ‘ब्रँडेड’ गोष्टींची त्यांच्या अशा एकमेवद्वितीय गुणधर्मामुळे ‘ओळख’ (identity) निर्माण होते. या ब्रँडचा उपयोग लोकप्रियता वाढविण्यासाठी होतो.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्वत:चे असे ब्रँडिंग जाणीवपूर्वक करावे का? काही जणांचा असा दृष्टिकोन असतो की स्वत:चा उदोउदो करण्याचे माझ्या स्वभावातच नाही; त्यामुळे असे स्व-ब्रँडिंग करणे मला जमत नाही. असे कुणी करत असल्यास विविध भल्याबुऱ्या विशेषणांनी आपण त्याची संभावना करतो. तथापी सध्याच्या अतिस्पर्धात्मक व अतिवेगवान जगात तुम्ही दाखवत असलेल्या वैयक्तिक गुणधर्माची दखल घ्यायला व प्रशंसा करायला खरे म्हणजे कुणाला वेळ नाही. दररोजच्या व्यावसायिक कामाचा रेटाच एवढा प्रचंड आहे की, तुम्हीच तुमचे ब्रँडिंग केले नाही तर लवकरच तुम्ही मागे पडाल व कदाचित विस्मृतीतही जाल.
अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी की असे स्व-ब्रँडिंग कुठेही शिकायला मिळत नाही. ब्रँडिंग न केलेल्या व्यक्तींना ब्रँडिंगचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्याकडून काही शिकण्याची अपेक्षाच नको. जे ब्रँडिंगमध्ये यशस्वी झाले आहेत त्यांना स्वत:बद्दल विचार करताना तुमच्यासाठी वेळच नसतो. नोकरीच्या या पहिल्या वर्षांत अशी स्व-ब्रँडिंगची सुरुवात करणे केव्हाही चांगलं. कारण या प्रयत्नांमुळे संस्थेमध्ये तुमची एक सकारात्मक ओळख निर्माण होते. शिवाय लोकप्रियताही वाढते.

अर्थात स्व-ब्रँडिंग म्हणजे केवळ आत्मप्रौढी मिरवणे नव्हे. एखाद्या वस्तूचे ब्रँडिंग करण्याएवढीच ती दीर्घकालीन चालणारी एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. ती आपण नीट समजून घेऊन याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. तुम्ही एक ब्रँड म्हणून तयार होताना, सर्वजण तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून न्याहाळत असतात व त्यांच्या मापदंडानुसार त्यांची मते बनवतात. अशा अनेकांची तुमच्याबद्दलची मते जेव्हा जवळ जवळ समान असतात तेव्हाच तुमचा एक ‘ब्रँड’ तयार होतो.
तुमचा ब्रँड तयार होताना तो इतर कुठल्याही ब्रँडप्रमाणे शक्तिमान (Powerful), अस्सल (Authentic), सातत्यपूर्ण (Consistent), दृश्य (Visible), बहुमोल (Valuable) झाला पाहिजे. स्व-ब्रँडिंग करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढे दिलेल्या पाच घटकांचा प्रामुख्याने विचार होतो.
स्वयंप्रतिमा (Self Image) – आपण मनात जो विचार करतो तोच आपल्या वागण्यात दिसतो. जसे घाबरट, धाडसी, विश्वासू, प्रामाणिक, जबाबदार, नम्र, उद्धट इ. ज्या विचारांनी आपली सकारात्मक प्रतिमा लोकांसमोर येईल तेच विचार आपल्या मनात पाहिजेत.
प्रतिमा विकास (Image Building) – लोकांना तुम्ही कसे दिसायला हवे आहात? तुमच्या दिसण्याप्रमाणेच लोक तुमच्या प्रतिमेचे आकलन करतील. जसे – दु:खी, आनंदी, निराश, स्थितप्रज्ञ इ. पण सर्वाना आंनदी दिसणारी, सुहास्य माणसेच जास्त आवडतात.
संवाद कौशल्ये (Communication Skills) -यामध्ये अनेक प्रकारांच्या कौशल्यांचा समावेश आहे. सादरीकरणाची कला, यशस्वी वाटाघाटी करण्याची कला, व्यावसायिक लिखाणाची कला, लोकांवर प्रभाव पाडण्याची कला, आपले विचार पटवून द्यायची कला, समूहात संवाद साधावयाची कला, विभिन्न संस्कृतीची पाश्र्वभूमी असलेल्या सहकाऱ्यांबरोबर काम करायची कला इ. ही सर्व कलाकौशल्ये आत्मसात करणे हे स्व-ब्रँडिंगसाठी आवश्यकच आहे.
परस्पर संबंध (Interpersonal Skills) – स्व-ब्रँडिंग करण्यातील हा तर महत्त्वाचा घटक. कारण शेवटी ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करता तेच तुमचे एक व्यक्ती म्हणून मूल्यमापन करतात. नेतृत्वगुण, समूहाबरोबर काम करावयाची कला, मैत्री करण्याची कला यांचा समावेश होतो.
भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence)- स्वत:च्या भावना समजावून घेऊन त्यावर नियंत्रण मिळवणे, सहकाऱ्यांच्या भावना समजावून घेऊन त्यांचा योग्य तो आदर करणे आणि कधीही निराश न होता स्वयंप्रेरित करणे या बाबींचा यात समावेश होतो.
या सर्वाचा जाणीवपूर्वक अभ्यास व अंमलबजावणी करून तुम्ही स्व-ब्रँडिंग विकसित करू शकता.
 डॉ. जयंत पानसे dr.jayant.panse@gmail.com
First Published on November 4, 2017 5:54 am
Web Title: how to build your own brand

करिअरमंत्र तुला यंदा एमएस्सीला प्रवेश मिळू शकला नाही, ही दु:खद बाब आहे.

करिअरमंत्र

तुला यंदा एमएस्सीला प्रवेश मिळू शकला नाही, ही दु:खद बाब आहे.

सुरेश वांदिले | Updated: November 4, 2017 6:00 AM

मी नुकतीच सूक्ष्मजीवशास्त्र या विषयामधून बीएस्सीची पदवी मिळवली आहे. मला ७० टक्के गुण मिळाले होते. परंतु यंदा मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्याने प्रवेश प्रक्रियांना उशीर झाला आहे. त्यामुळे मला इतरत्र कुठे प्रवेश मिळत नाही. एमएस्सीशिवाय मी सध्या काय करू शकते?  मधुरा जोगळेकर
* तुला यंदा एमएस्सीला प्रवेश मिळू शकला नाही, ही दु:खद बाब आहे. तथापी आता या नैराश्यातून बाहेर पडून तू जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी या परीक्षेची तयारी करावीस असे सुचवावेसे वाटते. या परीक्षेद्वारे आयआयटी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बेंगळुरू येथे पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रम करण्यासाठी प्रवेश मिळू शकतो. ही परीक्षा तू उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यास तुला मुंबई, इंदौर किंवा रुरकी आयआयटीमधील एमएस्सी इन बायोटेक्नॉलाजी या विषयात प्रवेश मिळू शकतो.
जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी ही संगणक आधारित वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा आहे. २०१८ च्या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशासाठीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०१८ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येईल. यामध्ये एक केंद्र मुंबईसुद्धा आहे.
* परदेशात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी तू या कालावधील जीआरई/टॉफेल या परीक्षा देऊ  शकतेस. या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळाल्यास अमेरिका किंवा इंग्लंडमधील उत्कृष्ट संस्थेत तुला सहज प्रवेश मिळू शकेल.

* एमबीए करणे हासुद्धा एक पर्याय आहे. त्यासाठी तू एमएच-सीईटी-एमएएमएस/एमबीए किंवा कॉमन मॅनजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट-सीमॅट या परीक्षा देऊ  शकतेस.
* स्वत:चे इंग्रजी लेखन कौशल्य, संवाद कौशल्य, संगणकीय ज्ञान कौशल्य वृिद्धगत करण्यासाठी सध्याच्या कालावधीचा उपयोग करणे शक्य आहे.
* पुढील काही दिवसांमध्ये बँकांच्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या जागांसाठी भरती प्रकिया जाहीर केली जाईल. बँकेत करिअर करावे अशी इच्छा असल्यास या परीक्षेची तयारी या कालावधीमध्ये तू करू शकतेस.
* केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी किमान अर्हता ही कोणत्याही विषयातील पदवी आहे. ती तू प्राप्त केल्याने या परीक्षांची तयारी सुद्धा तू आता करू शकतेस.
मी सध्या केमिकल अभियांत्रिकीचा अभ्यास करत आहे. मला पुढे नौदल किंवा वायुदलात जायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
प्रणाली जोशी
महिलांना सैन्य दलात जाण्याची संधी मिळवण्यासाठी तुला संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेसची परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे तुला ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथे शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन-अतांत्रिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रेटेजिक स्टडीज ही पदविका प्रदान केली जाते. त्यानंतर लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते.
माझा भाऊ  दहावीमध्ये आहे. त्याला कृषी क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यासाठी काही पदविका अभ्यासक्रम आहेत का?
संकेत भोगे
राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉ.बाळासाहेब सावंत कृषी कोकण विद्यापीठ, दापोली येथे कृषी तंत्र पदविका (मराठी माध्यम, अभ्यासक्रम कालावधी दोन वर्षे), कृषी तंत्रज्ञान पदविका (इंग्रजी अभ्यासक्रम,कालावधी तीन वर्षे ) हे दोन अभ्यासक्रम करता येतात. १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
संपर्क – www.maha-agriadmission.in  किंवा  http://www.mcaer.org
First Published on November 4, 2017 1:01 am
Web Title: expert advice to make a successful career

एमपीएससी मंत्र : कृषी विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकीचा आढावा मागील अंकात आपण महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेतील कृषी-विज्ञान या अनिवार्य पेपरविषयी माहिती घेतली

एमपीएससी मंत्र : कृषी विज्ञान आणि कृषी  अभियांत्रिकीचा आढावा

मागील अंकात आपण महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेतील कृषी-विज्ञान या अनिवार्य पेपरविषयी माहिती घेतली

महेश कोगे | Updated: November 3, 2017 4:16 AM

संग्रहित छायाचित्र

मागील अंकात आपण महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेतील कृषी-विज्ञान या अनिवार्य पेपरविषयी माहिती घेतली. आज या परीक्षेतील वैकल्पिक विषय-कृषी व कृषी अभियांत्रिकी यांच्याविषयी आपण जाणून घेऊ या.
प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन
(एक अनिवार्य व एक वैकल्पिक)

परीक्षार्थीना कृषी विज्ञान अनिवार्य विषयाबरोबर कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी या दोन विषयांमधून एकाची वैकल्पिक विषय म्हणून निवड करावी लागते.
*   मुख्य परीक्षा वैकल्पिक विषयांचा अभ्यासक्रम
अभ्यासक्रमातील प्रमुख घटक येथे देत आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पेपर २ (वैकल्पिक)
*   कृषी
१) कृषी वनस्पतीशास्त्र
मॉफॉलॉजी, अ‍ॅनॉटॉमी, स्फायटोजेनेटिक्स, जेनेटिक्स
*   पीक पदास
भारतातील बियाणेविषयक कायदे, बियाणे उत्पादन तंत्रज्ञान, पीक पदासीची नवीन साधने उदा. टिश्यू कल्चर, फोटोप्लास्ट फ्यूजन
*   प्लॅन्ट फिजिऑलॉजी
पेशींचे ऑसमॅटिक गुण आणि परस्पर संबंध, दुष्काळ प्रतिकारक्षमता.
*   सामाजिक वनीकरण :
औषधी आणि सुगंधी वनस्पती
पर्यावरणीय विज्ञान आणि कृषी पर्यावरणशात्र
*   वनस्पती जैव तंत्रज्ञान
२) पीक संरक्षण
*   कीटकशास्त्र (इन्टॉमॉलॉजी)
कीड व्यवस्थापन, कीड नियंत्रण पद्धती, कीटकनाशकांचा परिणाम
*   प्लॅन्ट पॅथॉलॉजी विकास, रोग प्रतिकार, सिम्टॉमॉलॉजी, वनस्पती रोग व नियंत्रण
३) फलोत्पादन
फळे, भाज्या, फुले लागवड, काढणीपश्चात, व्यवस्थापन आणि प्रक्रिया
४) शेतीविषयक प्रसार – ग्रामीण समाजशास्त्र, समुदाय विकास, शैक्षणिक प्रसार, प्रशासकीय प्रसार आणि कार्यक्रम मूल्यांकन
५) कृषी अर्थशास्त्र
भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीचे स्थान, समस्या, पंचवार्षिक योजना, नवीन कृषी धोरण, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना.
६) पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
७) अन्न विज्ञान
*   कृषी अभियांत्रिकी
१) शेतीतील कार्यशक्ती आणि शेतकी यंत्रे
*   शेतीतील कार्यशक्ती
मानवी, प्राणी आणि विद्युत शक्ती
*   कृषी ट्रॅक्टर्स
मशागत, लावणी आणि काढणी (हार्वेसिंग) यंत्रणा.
२) कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी
कृषी सामुग्री हाताळणे, दुग्ध आणि अन्न अभियांत्रिकी
३) विद्युत आणि इतर उर्जा स्रोत
वीज, सौरऊर्जा, पवनउर्जा, बायोगॅस एनर्जी
४) शेत संरचना
५) माती आणि जलसंवर्धन अभियांत्रिकी
६) सिंचन आणि निचरा (ड्रेनेज) अभियांत्रिकी
सिंचन पद्धती, कालवा सिंचन, जमिनीचा विकास
२०१६ च्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
विषय  : कृषी

विषय : कृषी अभियांत्रिकी

वरील विश्लेषणावरून कृषी व कृषी अभियांत्रिकी या पेपर २ मधील प्रश्नांची घटकनिहाय गुण विभागणी आपल्याला दिसून येते. खाली दोन्ही विषयांतील अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्दय़ांचे विश्लेषण केलेले आहे.
१) कृषी – क्लोिनग,  C3 C4 आणि CAM पिकांची वैशिष्टय़े व उदाहरणे, पिकांच्या जाती, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सूक्ष्म पोषकद्रव्ये व अन्नधान्यातून मिळणारी जीवनसत्त्वे, जनुकीय नियमन, कृत्रिम वाण आणि संमिश्र वाण, वनस्पती पोषण, कबरेदकांमध्ये चयापचय क्रिया, कृषी वनीकरण, प्रदूषण-प्रकार, वर्गीकरण,
कारणे आणि उपाय, नैसर्गिक संसाधने
आणि त्यांचे संवर्धन, वनस्पती आणि रोग, कीटकनाशके, कीड प्रतिकारात जैवतंत्रज्ञानाची भूमिका भाज्या, फुले व फळ भाजीपाला
यांची लागवड व संरक्षण, त्यांच्या साठवणूक
पद्धती, ग्रामीण समाज-संस्कृती व शिक्षण,
कृषीतील आंतरराष्ट्रीय कल, गॅट परिणाम/ WTO. शासकीय योजना व कार्यक्रम यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.
२)  कृषी अभियांत्रिकी – या विषयात मानवी, प्राणी व यंत्राद्वारे केले जाणारे शेतीतील कार्य, कृषी टॅक्टर, पॉवर टिलर, हायड्रॉलिक प्रणाली, मशागतीची यंत्रणा, बियाणे आणि वनस्पतीच्या लावणी पद्धती, धान्य पेरण्याची यंत्रे, पीक काढणीच्या पद्धती, स्पेअर पंप, नॉझल आणि त्यांचे प्रकार, पिकांची वाळवणी, कृषी सामुग्री- पारंपरिक, यांत्रिक, फलोत्पादन प्रक्रिया, स्टोरेज संरचना, दुग्धजन्य पदार्थ व साठवणूक पद्धती, कोल्ड स्टोरेज, सौरऊर्जा वापर, विद्युत मोटर्स काळजी व देखभाल, बायोगॅस प्लॅन्टच्या विविध पद्धती, माती आणि जलसंवर्धन, जमिनीची धूप नियंत्रण, पूर नियंत्रण, पाणलोट व्यवस्थापन, शेत तलाव, पाझर तलाव, पावसाच्या पाण्याची साठवण, ठिबक व उपसा सिंचन या घटकांवर परीक्षार्थीनी विशेष लक्ष द्यावे.
संदर्भ सूची –
१) कृषी
*  प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी – रेड्डी
*  राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रीकल्चर आणि टेक्नॉलॉजीची ११ वी व १२ वीची पुस्तके
*  पर्यावरण  – शंकर आयएएस अ‍ॅकॅडमी
*  टॉपर्स नोटस्- सुभाष यादव, सचिन सूर्यवंशी
*  जनरल अ‍ॅग्रीकल्चर – मुनीरजी सिंग
*  अ कॉम्पेटिटिव्ह बुक ऑफ अ‍ॅग्रीकल्चर – नेमराज सुंदा
*  भारतीय अर्थव्यवस्था  – दत्त आणि सुंदरम
२) कृषी अभियांत्रिकी
*  अ‍ॅग्रीकल्चर इंजिनीअिरग –   भाग १ व २ – मिचेल अ‍ॅण्ड ओझा
*  ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ‍ॅग्रीकल्चर  इंजिनीअिरग – प्रीतम चंदा
*  लोकराज्य, योजना मासिके
*  करंट ग्राफ वार्षिक
First Published on November 3, 2017 4:16 am
Web Title: importance guidance for mpsc exam

Thursday, November 23, 2017

यूपीएससीची तयारी : भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास भारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते.

यूपीएससीची तयारी : भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास

भारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते.

श्रीकांत जाधव | Updated: November 2, 2017 3:54 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

आजच्या लेखामध्ये आर्थिक विकास या घटकातील भारतीय अर्थव्यवस्था आणि संबंधित मुद्दे व आर्थिक नियोजनाचे प्रकार आपण पाहू. तसेच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने याची नेमकी काय उपयुक्तता आहे, या मुद्दय़ावरही चर्चा करू. याच्या जोडीला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या अर्थव्यवस्थेसंबंधी मूलभूत संकल्पनाची माहिती थोडक्यात घेणार आहोत. या घटकावर गतवर्षीय मुख्य परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते व परीक्षाभिमुख अभ्यासाच्या दृष्टीने याची तयारी कशी करावी याची महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत.
भारत स्वातंत्र झाल्याबरोबर भारत सरकारने विविध आर्थिक समस्या सोडविण्यासाठी आणि आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजन पद्धतीचा अवलंब केला होता. ज्यामध्ये समाजवादी आणि भांडवलशाही या दोन्ही तत्त्वाचा समावेश केलेला होता; अर्थात भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. भारतातील आर्थिक नियोजन हे मुख्यत्वे पंचवार्षिक योजनेवर आधारलेल होते. ज्याद्वारे दीर्घकालीन उद्देश साध्य करण्यावर भर देण्यात आलेला आहे. आर्थिक वृद्धी ज्यात स्थूल देशांतर्गत उत्पादन व दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यात वाढ करणे, रोजगार उपलब्धता, समन्याय वितरण, आधुनिकीकरण आणि स्वयंपूर्णता इत्यादी महत्त्वाच्या उद्देशांचा समावेश आहे. याच्या जोडीला सरकारमार्फत काही अल्पकालीन उद्देशाची वेळोवेळी आखणी करण्यात येते जे पंचवार्षिक योजनानिहाय उद्देश साध्य करण्यासाठी असतात; अर्थात दीर्घकालीन उद्देश आणि अल्पकालीन उद्देश हे परस्परपूरक असतात. थोडक्यात, अल्पकालीन उद्देश हे योजनानिहाय आखलेल्या धोरणाचा भाग असतात जे दीर्घकालीन उद्देश किंवा आर्थिक नियोजनांचे आखलेले उद्देश साध्य करण्यासाठी महत्त्वाचे असतात.
भारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. १९९१ पूर्वीचे आर्थिक नियोजन व १९९१ नंतरचे आर्थिक नियोजन. भारतातील आर्थिक नियोजन पद्धतीमध्ये १९९१ नंतर काही मूलभूत बदल करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये आर्थिक उदारीकरणाच्या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. तो मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण कमी करून आर्थिक विकास अधिक गतीने साध्य करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे हा मुख्य उद्देश १९९१ नंतरच्या आर्थिक नियोजन नीतीचा राहिलेला आहे व यात भारत सरकारने नियंत्रित करण्यासाठीच्या नियामकाच्या ऐवजी साहाय्यकाची जबाबदारी घेतलेली आहे.
२०१५च्या मुख्य परीक्षेमध्ये, ‘अलीकडील काळामधील भारतातील आर्थिक वृद्धीच्या स्वरूपाचे वर्णन पुष्कळदा नोकारीविना (Jobless Growth)  होणारी वृद्धी असे केले जाते. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? तुमच्या उत्तराच्या समर्थनासाठी युक्तिवाद करा?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाच्या आकलनासाठी आर्थिक वृद्धी या संकल्पनेची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपणाला या प्रश्नाचे आकलन योग्यरीत्या करता येऊ शकते. याचबरोबर याच्याशी संबंधित सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीचा आधार घेऊन युक्तिवाद करावा लागतो. ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून योग्य उत्तर लिहिता येऊ शकते.
आता आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पनाचा  थोडक्यात आढावा घेऊ या. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन महत्त्वाचा मूलभूत संकल्पना अर्थव्यवस्थेचे आकलन करून घेण्यासाठी महत्त्वाच्या असतात. याचे योग्य आकलन असल्याखेरीज या घटकाचा अभ्यास योग्य पद्धतीने करता येत नाही. दररोज वर्तमानपत्रांमधून याविषयी काहीना काही माहिती मिळत असते, पण या माहितीचा परीक्षेच्या दृष्टीने योग्य उपयोग करून घेण्यासाठी या संकल्पनांचे आकलन असणे गरजेचे आहे. आर्थिक वृद्धी ही संकल्पना  देशांतर्गत स्थूल उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, देशांतर्गत दरडोई स्थूल उत्पादन, देशांतर्गत दरडोई निव्वळ उत्पादन आणि दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या सारख्या संख्यात्मक पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या वाढीची स्थिती दर्शवितात.
थोडक्यात याचा अर्थ शाश्वत पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये होणारी वाढ हा आर्थिक वृद्धी या प्रक्रियेचा महत्त्वाचा पलू मानला जातो. आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची निर्देशक मानली जाते.
आर्थिक विकास ही प्रक्रिया अर्थव्यवस्थेमधील भौतिक व कल्याणकारी विकासामध्ये होणारी सुधारणा स्पष्ट करते. ज्यामध्ये गरिबीचे निर्मूलन, साक्षरतेमध्ये होणारी वाढ, बेरोजगारीचे उच्चाटन आणि आर्थिक विषमता कमी करून आर्थिक समानता यासारख्या गोष्टीमध्ये उत्तरोतर होणाऱ्या प्रगतीचा आलेख दर्शविते. आर्थिक विकास या प्रक्रियेची व्याप्ती आर्थिक वृद्धीपेक्षा मोठी आहे. आर्थिक विकास हा उत्पादनामध्ये होणारी वाढ याच्यासह उत्पादन रचनेमध्ये होणारे बदल व उत्पादनक्षमतेच्या आणि उपलब्ध साधनसंपत्तीच्या योग्य विभाजनाची माहिती देतो व सामाजिक न्यायतत्त्वाची सुनिश्चितता  दर्शवितो.
आर्थिक वृद्धी ही संकल्पना अर्थव्यवस्थेविषयी सामान्यत: संख्यात्मक चित्र दर्शविते. आर्थिक विकास ही संकल्पना अर्थव्यवस्थेविषयी संख्यात्मक व गुणात्मक या दोन्ही बाबींचे चित्र दर्शविते; अर्थात आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास या संकल्पनेचा परीघ मोठा आहे. यामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगतीचे चित्र दिसून येते. याउलट आर्थिक वृद्धी ही संकल्पना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग दर्शविते.
या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने मूलभूत अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीचे ११ वी आणि १२ व्या इयत्तेचे Indian Economic Development आणि Macro Economics या पुस्तकाचा वापर करावा. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरील मिश्रा आणि पुरी किंवा दत्त आणि सुंदरम यापैकी कोणत्याही एका संदर्भग्रंथाचा या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापर करावा. चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी योजना हे मासिक, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि
द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे इत्यादीचा वापर करावा. यापुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकासामधील सर्वसमावेशक वाढ व संबंधित मुद्दे, या घटकाचा आढावा घेणार आहोत. या घटकाची तयारी कशी करावी, तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रितपणे चर्चा करणार आहोत.
First Published on November 2, 2017 3:54 am
Web Title: upsc exam preparation tips for students