Wednesday, July 3, 2019

नक्राश्रू ढाळणे खोटा कळवळा येऊन दु:ख झाल्याचे जे प्रदर्शन केले जाते, जो अश्रुपात केला जातो त्याला नक्राश्रू ढाळणे असे म्हणतात.

नक्राश्रू ढाळणे

खोटा कळवळा येऊन दु:ख झाल्याचे जे प्रदर्शन केले जाते, जो अश्रुपात केला जातो त्याला नक्राश्रू ढाळणे असे म्हणतात.

|| डॉ. उमेश करंबेळकर
खोटा कळवळा येऊन दु:ख झाल्याचे जे प्रदर्शन केले जाते, जो अश्रुपात केला जातो त्याला नक्राश्रू ढाळणे असे म्हणतात.
नक्र म्हणजे मगर. नक्राश्रू म्हणजे मगरीची आसवे. इंग्रजीतही Shading crocodile tears असा वाक्प्रचार वापरात आहे. खोटी सहानुभूती दाखवणे किंवा दु:ख झाल्याचे नाटक करणे अशा अर्थानेच तो वापरला जातो. ‘नक्राश्रू ढाळणे’ हा शब्दप्रयोग अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. आपलं भक्ष्य खाताना मगरीच्या डोळ्यांत पाणी येतं अशी एक समजूत त्यामागे आहे. खरे तर डोळ्यांत पाणी येणे हे दु:खाचे प्रतीक मानले जाते. पण भक्ष्य खाताना तर मगरीला आनंद व्हायला हवा. पण तिच्या तर डोळ्यांत अश्रू दिसतात. यावरून ती दु:खाचे नाटक करते, असा समज रूढ झाला असावा. त्यावरूनही नक्राश्रू ढाळणे हा शब्दप्रयोग तयार झाला असावा.
आता याबाबतची वस्तुस्थिती पाहू. मगरींच्या डोळ्यांत अश्रू येतात आणि ते त्या निर्माणही करतात पण त्याचा भावनांशी काही संबंध नसतो. डोळे स्वच्छ करणे आणि कोरडे पडू न देणे हे अश्रूंचे काम. त्या जेव्हा पाण्याच्या बाहेर जमिनीवर ऊन खात पडलेल्या असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी येते. खाऱ्या पाण्यातील सुसरींमध्ये शरीरातील अतिरिक्त क्षार बाहेर टाकण्याचे कामही अश्रू करतात.
पण खाताना त्या खरेच रडतात का, याचा शोध २००६ साली फ्लोरिडा विद्यापीठातील माल्कम श्ॉनर या न्यूरॉलॉजिस्टने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घेतला. त्याने फ्लोरिडातील सेंट ऑगस्टीन प्राणिसंग्रहालयातील मगरींच्याच जातीतील केमन (caiman) या प्राण्यांचा अभ्यास करून घेतला. त्यासाठी त्याने सात केमनांचे निरीक्षण केले. त्यातून त्याला सातपकी पाच केमनच्या डोळ्यांत खाताना पाणी येत असल्याचे आढळले. त्यावरून नक्राश्रू हा वाक्प्रचार वस्तुस्थितीला धरून असल्याचे सिद्ध झाले. खातेवेळी गरम हवा कवटीच्या पोकळ्यांत (sinuses) वेगाने शिरते आणि त्याचा दाब अश्रूग्रंथींवर पडतो व त्यामुळे डोळ्यांत अश्रू जमा होतात हे नक्राश्रूंचे शास्त्रीय कारण आहे.
दुसरी विशेष गोष्ट ही की, कधी कधी तोंडाचा लकवा (Bell’s palsy) बरा झालेल्या रोग्यांमध्ये एक विलक्षण लक्षण दिसून येते. खाताना त्या रुग्णांच्या डोळ्यांत पाणी येते. बोगोराड या न्यूरो-पॅथॉलॉजिस्टने ही गोष्ट प्रथम निदर्शनास आणली. म्हणून त्यास बोगोराडचा लक्षण समुच्चय (Bogorad’s syndrome) असं म्हणतात. याच गोष्टीला बोलीभाषेत नक्राश्रू लक्षण असेही म्हणतात. अर्थात हे रुग्ण मुद्दाम ही गोष्ट करत नसतात, त्यामुळे नक्राश्रू ढाळणे हा शब्दप्रयोग त्यांना लागू होत नाही.
First Published on May 2, 2019 1:33 am
Web Title: fake crying

No comments:

Post a Comment