घसरण
घरोघरी दिसणारं एक दृश्य : मुलं अभ्यास करत असतात
असं समजू या की, त्या मुलाला किंवा मुलीला, ते गणित किंवा ती व्याख्या समजली नाही. त्यामुळे काही तरी चुकलं. पालक समजून सांगताहेत; पण पुन्हा चुकलं. पालकांच्या रागाचा पारा वर चढतो. ते रागवायला, ओरडायला लागतात. लहान मूल भिऊन गप्प! ते आता त्या गणिताचा विचार करू शकत नाही.
घाबरून का होईना, कसं तरी गणित सोडवायचा प्रयत्न मूल करतंय. जमत नाहीच! इकडे पालकांच्या रागाचा पारा अजून चढतो. अपशब्द निघतात. मुलावर हात उठतो. मूल घाबरून मार खातंय. इथे अभ्यासाच्या वातावरणाचा संपूर्ण सर्वनाश! घाबरलेल्या आणि मार खाणाऱ्या त्या लहान मुलाला अशा भावनिक अवस्थेत कधीही अभ्यास करायला जमणार नाही. मेंदूशास्त्रीयदृष्टय़ा जमूच शकत नाही. याचं कारण अभ्यास करण्याची, आकलनाची क्षेत्रं निओ कॉर्टेक्समध्ये आहेत आणि भीतीची भावना लिंबिक सिस्टीममध्ये आहे.
भीती दाटून आली तर मेंदूचा रक्तप्रवाह नैसर्गिकरीत्या भावनांच्या क्षेत्रांकडे- लिंबिक सिस्टीमकडे- प्राधान्याने वळतो. अशा स्थितीत तो निओ कॉर्टेक्सकडे राहणं शक्य नाही. पालकांनी मारायला सुरुवात केली की घाबरून मुलं स्वत:चा बचाव करायला लागतात. आता तर सरपट मेंदूकडे रक्तप्रवाह जातो. यालाच डॉ. पॉल मॅक्लीन यांनी ‘थिअरी ऑफ डाऊनशिफ्टिंग’ असं म्हटलं आहे. अभ्यास करताना जो रक्तप्रवाह आकलनाच्या- अभ्यासाच्या क्षेत्रांकडे म्हणजे निओ कॉर्टेक्सकडे असतो आणि असायला हवा, तो खाली घसरतो; तेही पालकांच्या आततायीपणामुळे!
जोपर्यंत रक्तप्रवाह पुन्हा आकलनाच्या क्षेत्राकडे वळणार नाही, तोपर्यंत अभ्यास जमणार नाही. अभ्यासाला बसवल्यावरही आधी ‘तो’ भीतीदायक अनुभव आठवणार; आठवतच राहणार! ज्या मुलांना अभ्यास करताना कायम ओरडा बसतो त्यांना अभ्यासाबद्दल टोकाची अनास्था निर्माण होते, गोडी लागणं तर दूरच! शिक्षण आनंददायी हवं, असं जगभरातले सगळे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. पण किती मुलं शाळेत किंवा घरी आनंदाने शिकतात, हा नव्या संशोधनाचा विषय आहे.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com
First Published on February 18, 2019 12:18 am
Web Title: human brain 4
No comments:
Post a Comment