Tuesday, April 2, 2019

मेंदूशी मैत्री : चवींची महती मोठा तोंडातही न जाणारा चेंडू चाखून-चाटून बघण्याची त्यांची धडपड आपण अनेकदा बघितली असेल.

मेंदूशी मैत्री : चवींची महती

मोठा तोंडातही न जाणारा चेंडू चाखून-चाटून बघण्याची त्यांची धडपड आपण अनेकदा बघितली असेल.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
आपल्याला विशिष्ट चवींचं ज्ञान होतं ते जिभेमार्फत. एखादं फळ, पान किंवा प्राणी खाण्यायोग्य आहे की नाही, याचा निर्णय जेव्हा आदिमानव घ्यायचा तेव्हापासून जिभेने मेंदूला संदेश पोहचवले आहेत. काय खाता येईल आणि काय नाही हा त्याकाळी केवढा तरी महत्त्वाचा विषय असेल. आज आपल्याला खाण्यायोग्य काय आहे हे माहीत असतं आणि आपण निर्धास्त जेवतो. आज आपल्या दृष्टीने चव म्हणजे आंबट, गोड, तुरट इत्यादी. पण त्या काळात जिभेने दिलेले संदेश अतिशय महत्त्वाचे होते- नाहीतर प्राणाशी गाठच! विषाची चव घेतल्याशिवाय ते विष आहे हे आदिमानवाला कळेपर्यंत कितीतरी जीव गेले असतील!
प्राणी भाजून खाल्ला तर चांगला लागतो, फळं, पानं, कंदमुळं तशीच मातीसकट न खाता पाण्यातून काढली तर चांगली लागतात, असे काही मानवजातीच्या दृष्टीने घ्यायचे निर्णय जिभेच्या संवेदनांमुळे आदिमानवाने घेतले.
घरी रांगतं बाळ असेल तर घरच्या लोकांच्या दृष्टीने एक नवी डोकेदुखी असते ती म्हणजे बाळ रांगता रांगता काहीही तोंडात घालतं. याचं कारण बाळाला ती वस्तू नक्की काय आहे हे पंचेंद्रियांपैकी शक्य तितक्या इंद्रियांनी समजून घ्यायचं असतं. डोळ्यांनी वस्तू दिसली, हाताने स्पर्श करून पाहिला, तिचा आवाज कसा आहे, हे ऐकायचा प्रयत्न केला. ती वस्तू हलते आहे का, याचा त्याला त्याच्या परीने शोध लावायचा असतो. या सर्वातून अनेकदा जिज्ञासा पूर्ण होत नाही म्हणून जिभेनेही स्पर्श करावासा वाटतो.
मोठा तोंडातही न जाणारा चेंडू चाखून-चाटून बघण्याची त्यांची धडपड आपण अनेकदा बघितली असेल. वस्तू तोंडात घालण्यामुळे त्या वस्तूविषयी, त्या वस्तूच्या स्पर्शाविषयी थोडी जास्त माहिती गस्टेटरी कॉर्टेक्सला मिळते, हा त्यांचा उद्देश असतो. शक्यतो सर्व वस्तू स्वच्छ ठेवणं आणि धोकादायक वस्तू तोंडात जात नाही ना हे बघणं, हेच एक काम इथे महत्त्वाचं आहे. काहींना वाटतं बाळाला भूक लागली आहे म्हणून बाळ दिसेल त्या गोष्टी तोंडात घालतं आहे. पण त्याचा उद्देश तर त्याच्याही नकळत ज्ञाननिर्मितीचा असतो. माहिती गोळा करण्याचा असतो. बाळ त्याच्या पद्धतीने डेटाच संकलित करत असतो, त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी!

First Published on January 17, 2019 12:16 am
Web Title: taste and the brain taste in mouth
1
Reactions

No comments:

Post a Comment