मेंदूशी मैत्री.. : दोन वर्षांतले संदेश
एका यशस्वी टप्प्यावर ते कधीच खूश नसतं. पहिले तीन महिने झोपून काढल्यावर एक दिवस कुशीवर वळण्याचा प्रयत्न चालू होतो
(संग्रहित छायाचित्र)
पहिल्या दोन वर्षांत बाळ स्वत:हून किती तरी गोष्टी शिकतं. ती सर्वच्या सर्व त्याला पहिल्या दोन वर्षांत आपसूकपणे यायला लागतात. त्यातलं एक म्हणजे भाषा आणि दुसरं चालता येणं.
ही दोन कौशल्यं आत्मसात करण्यासाठी जन्मल्यानंतर लगेच मेंदूची यंत्रणा – त्यातलं मोटर कॉर्टेक्स (आकृतीत गडद- उभ्या आकाराचा दिसतो आहे.) म्हणजेच हालचालींवर नियंत्रण ठेवणारं केंद्र कामाला लागतं.
एका यशस्वी टप्प्यावर ते कधीच खूश नसतं. पहिले तीन महिने झोपून काढल्यावर एक दिवस कुशीवर वळण्याचा प्रयत्न चालू होतो. मग पालथं पडणं. कुशीवर वळून पालथं पडणं हे सोपं नसतं. त्यासाठी अथक प्रयत्न आणि भरपूर शक्ती लागते. पालथं पडल्यावर लगेच डोकं वर उचलता येत नाही. एक हात अंगाखाली अडकून बसतो. मग तो बाहेर काढण्यासाठी बाळ रडतं. तो हात बाहेर काढल्यावर क्षणार्धात बाळ परत पालथं पडतं. हे पालथं पडणं म्हणजे प्रगतीचा एकेक टप्पा गाठणं आहे.
या धडपडीतच रांगायला सुरुवात करतं. रांगत असतानाच एक हात वर उचलून समोरची वस्तू पकड, मागे वळून बघ, घराचे उंबरठे किंवा मध्ये येणारे इतर अडथळे ओलांडायचा प्रयत्न कर, हे सोपं नसतं. रांगता रांगता एक दिवस बाळ बसायला लागतं. हाताला आता चांगली पकड आलेली असते. त्यामुळे पलंगाला धरून त्या आधाराने स्वत:चं शरीर वर खेचण्याचे नवे प्रयत्न सुरू होतात.
कोणत्याही काठांना धरून आता उभं राहता येतं. आधी एक पाऊल सुटं टाकून बघतं. आपल्या कुवतीचा अंदाज घेऊन मगच दुसरं पाऊल टाकतं. एक दिवस हात सोडून एखादं पाऊल सुटं टाकून बघतं. पडलं तरी उठायचं, पुन्हा प्रयत्न करायचे, पुन्हा धडपड हे सतत चालूच असतं. मात्र त्यासाठीचे त्याचे प्रयत्न अफाट असतात. अशी किती तरी आव्हानं स्वीकारून त्या अडचणींवर मात करायचा ते प्रयत्न करत असतं. हे प्रयत्न त्यांचे त्यांना करू द्यावेत. कारण एका प्रयत्नातून ते पुढचं कौशल्य शिकणार असतं.
मेंदूची यंत्रणा जबरदस्त असते, ती बाळाला आतून संदेश देत असते. कधी आणि कसे प्रयत्न करायचे हेही यंत्रणाच सांगत असते. मुलं स्वत:हून हे सर्व करत असतात.
ontact@shrutipanse.com
First Published on February 21, 2019 1:31 am
Web Title: messages in two years
No comments:
Post a Comment