मेंदूशी मैत्री : नजरेच्या कक्षेत
लहान बाळं गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे, रंगीत चिमणाळ्याकडे, खेळण्याकडे बराच वेळ बघतात.
डोळे हे एक महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय. दिसणाऱ्या एकूणएक वस्तूची, व्यक्तींची माहिती आपले डोळे मेंदूतल्या व्हिजुअल कॉर्टेक्सकडे पाठवत असतात. या माहितीवर याच कॉर्टेक्समध्ये प्रक्रिया केली जाते. ह्युबेल आणि विझेल या दोन शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं आहे. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे.
लहान बाळं गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे, रंगीत चिमणाळ्याकडे, खेळण्याकडे बराच वेळ बघतात. तेव्हा त्यांचे चिमुकले डोळे हे समजून घेण्याच्या प्रयत्नात असतात की, ही ‘जी काही’ रंगीत वस्तू समोर दिसते आहे, ती नक्की काय आहे, वस्तूचा आकार, रंग, तिची हालचाल यासारखी सर्व माहिती मेंदूकडे पाठवली जाते. मेंदू ती साठवून ठेवतो. जी माणसं दिसतात, भेटतात त्यांच्याबद्दलची बारीकसारीक निरीक्षणंही पाठवली जातात. ही सर्व माहिती विशिष्ट क्षेत्रांमध्ये साठवून ठेवतो. यानंतर जेव्हा ती किंवा तशासारखी वस्तू दिसते तेव्हा या माहितीचा पुन्हा पुन्हा उपयोग होणार असतो.
– लहान मुलांनी एक मांजर पाहिली, तिची इमेज मेंदूत जाते.
– कधीतरी गाय पाहिली, तर बाळाच्या स्मरणक्षेत्रातलं गायीशी साम्य दर्शवणारं मांजराचं चित्र आधी उद्दीपित होतं. म्हणजेच ते त्याला आठवतं.
– आता गायीचीही इमेज साठवली जाते.
– पुन्हा पुन्हा मांजर आणि गाय दिसत राहिली तर आकार, रंग, आवाज, स्पर्श असे त्यातले फरक स्पष्ट होत जातात.
– नवे प्राणी दिसतील तशी ही माहिती वाढत जाते.
– यानंतरचा टप्पा म्हणजे – मांजर असं म्हटल्यावर नि:संदिग्धपणे मांजर हाच एकमेव प्राणी आठवणं. कारण अनेकदा मांजरी बघून या स्मृतींची साठवण हिप्पोकॅम्पस या भागात झालेली असते.
आपल्याला एखादा माणूस नव्याने भेटतो तेव्हा हिचे डोळे अमुकसारखे आहेत, त्याचा चेहरा तमुकसारखा आहे, असं मेंदू सांगत असतो. सहसंबंध जोडत असतो. टेनिस किंवा क्रिकेटमध्ये बॉल कुठून येतो आहे हे नजर बघते. ती माहिती मेंदूला पाठवते. हा बॉल नक्की कुठल्या दिशेला जायला हवा याचा निर्णय झटपट घेऊन तशा सूचना संपूर्ण शरीराला दिल्या जातात. त्यानुसार खेळाडू हाताने फटका मारतो आणि संपूर्ण शरीर त्याला साथ देतं. ही साथ योग्य वेळेला मिळाली नाही तर मग बसतो चुकीचा फटका!!
First Published on January 15, 2019 12:14 am
Web Title: brain studies by scientists david hubel and torsten wiesel
No comments:
Post a Comment