गॅलिलिओची ‘दूरदृष्टी’
गॅलिलिओने निरीक्षणांना सुरुवात केली ती चंद्रापासून.
गॅलिलिओने निरीक्षणांना सुरुवात केली ती चंद्रापासून. चंद्र हा प्रत्यक्षात, अॅरिस्टोटलने वर्तवल्यानुसार गुळगुळीत नव्हताच, तर तो डोंगर-दऱ्या व विवरांनी भरलेला दिसत होता. सुमारे वीस दिवसांच्या चंद्राच्या निरीक्षणांनंतर, गॅलिलिओने आपली दुर्बीण गुरू ग्रहाकडे वळवली. सुमारे दोन महिन्यांच्या या निरीक्षणांत त्याला गुरूभोवती चार ‘तारे’ (चंद्र) प्रदक्षिणा घालताना दिसले. या गुरुकेंद्रित ताऱ्यांनी, विश्वातील सर्वच गोष्टी या फक्त पृथ्वीकेंद्रित असल्याचे, अॅरिस्टोटलचे मत चुकीचे ठरवले. यानंतर गॅलिलिओने आकाशातील तारकासमूहांचे, आकाशगंगेतील ताऱ्यांचे, आकाशात दिसणाऱ्या पांढुरक्या ठिपक्यांचे निरीक्षण केले. या निरीक्षणांतून, तारकासमूहात नुसत्या डोळ्यांना दिसतात त्यापेक्षा अधिक तारे असल्याचे आणि आकाशगंगेचा दुधाळ पट्टा म्हणजे असंख्य ताऱ्यांची दाटी असल्याचे स्पष्ट झाले. आकाशातील पांढरे ठिपके म्हणजे अनेक ताऱ्यांनी बनलेले तारकागुच्छ होते.
गॅलिलिओने या निरीक्षणांची नोंद १६१० साली प्रसिद्ध केलेल्या आपल्या ‘सायडेरियस नून्शिअस’ (ताऱ्यांकडचा निरोप) या छोटेखानी पुस्तकात केली आहे. गॅलिलिओने आपल्या दुर्बणिीतून शनीची कडी आणि सौरडागांचेही निरीक्षण केले. ही सर्व निरीक्षणे मुख्यत त्याच्या अडीच सेंटीमीटर व्यासाचे भिंग असणाऱ्या, एक मीटर लांबीच्या दुर्बणिीद्वारे केली आहेत. या दुर्बणिीद्वारे दूरच्या वस्तू तीसपट जवळ दिसत होत्या. गॅलिलिओच्या या ‘दूरदृष्टी’ने कोपíनकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताला बळकटी मिळाली, तसेच अॅरिस्टोटलचे तत्त्वज्ञान आणि पर्यायाने धर्मग्रंथांतील ‘शिकवण’ फोल ठरवली. त्यामुळे त्याने धर्ममरतडांचा रोष मात्र ओढवून घेतला व कालांतराने त्याला याची किंमत चुकवावी लागली.
– डॉ. राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
First Published on January 28, 2019 1:46 am
Web Title: astronomer galileo galilei
No comments:
Post a Comment