पारा : द्रवरूपातील चांदी!
सामान्य तापमानाला द्रवरूपात असणारा पारा हा एकमेव धातू आहे.
सिनाबार (पाऱ्याचे सल्फाइड) हे पाऱ्याचे मुख्य खनिज. याच सिनाबारचा उपयोग करून पारा निर्माण केला जात असल्याचे उल्लेख इजिप्तमधील इ.स.पूर्व चौथ्या शतकातल्या पुराव्यांत आढळतात. सिनाबारची भुकटी करून ती तापवली, तर त्यापासून शुद्ध पारा वाफेच्या रूपात गोळा होतो. ही वाफ थंड करून द्रवरूपातला धातूरूपी पारा मिळवता येतो. पाऱ्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे सोने, चांदी यांसारखे धातू पाऱ्यात लगेच विरघळतात आणि त्याचे मिश्रधातू तयार होतात. याचा उपयोग सोने आणि चांदी यांच्या शुद्धीकरणासाठी केला जातो. खाणींमध्ये शुद्ध सोने किंवा चांदी, दगडांमध्ये बारीक कणांच्या रूपात विखुरलेली असते. हे सोने आणि चांदी मिळवण्यासाठी दगडांच्या बारीक भुकटीवर पारा ओततात. सोने किंवा चांदी पाऱ्यात विरघळवून त्याचा मिश्रधातू तयार होतो. उरलेल्या भुकटीपासून हा मिश्रधातू सहज वेगळा करता येतो. हा मिश्रधातू तापवला की ३५० अंश सेल्सियसच्या वरच्या तापमानाला पाऱ्याची वाफ होते आणि शुद्ध सोने मागे राहते.
पाऱ्याच्या द्रवरूपामुळे किंवा सोने, चांदी यांसारखे धातू विरघळवण्याच्या त्याच्या गुणधर्मामुळे प्राचीन काळातील रसायनतज्ज्ञांना पाऱ्याबद्दल पुष्कळ कुतूहल होते आणि तितक्याच गैरसमजुतीही होत्या. इसवी सनानंतर दुसऱ्या शतकात एका अरब रसायनतज्ज्ञाचा असा समज होता की पारा हा मूळ धातू असून त्यात इतर पदार्थ कमीअधिक प्रमाणात मिसळल्याने इतर धातू तयार करता येतात. या गैरसमजुतीतूनच पुढची १०००-१२०० वर्षे, लोखंडापासून सोने बनवणाऱ्या पदार्थाचा- परिसाचा- शोध सुरू झाला. परीस काही सापडला नाही; मात्र आधुनिक रसायनशास्त्राचा पाया मात्र या प्रयत्नांनी नक्कीच घातला गेला.
– योगेश सोमण
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
No comments:
Post a Comment