इ.स.पूर्व वाटचाल
जगातील विविध संस्कृतींतील विद्वानांनी निसर्गात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करायला फार पूर्वीपासून सुरुवात केली.
प्लेटो या विख्यात ग्रीक तत्त्ववेत्त्याचा विद्यार्थी असणाऱ्या अॅरिस्टॉटलने, प्लेटोच्या मतांचा विस्तार करताना स्वतचे स्वतंत्र तत्त्वज्ञानही विकसित केले. अॅरिस्टॉटलची मते आज जरी अव्हेरली गेली असली, तरी विज्ञानाच्या वाटचालीचा आढावा घेताना अॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचाही आढावा घ्यावा लागतो.
अॅरिस्टॉटलच्या मते पृथ्वी स्थिरच असायला हवी. स्वतभोवती किंवा इतर कोणाभोवतीही ती फिरत असती, तर तिच्यावर वसती करताच आली नसती. तसेच त्याच्या मते निसर्गातील प्रत्येक वस्तूला स्वतचे नैसर्गिकस्थान आहे. वस्तूचे हे स्थान, ती कशापासून बनली आहे यावर अवलंबून असते. प्रत्येक वस्तू ही पृथ्वी, पाणी, हवा आणि अग्नी या चार घटकांपासून बनली आहे. यातील पृथ्वी आणि पाणी हे जड घटक असून, हवा आणि अग्नी हे हलके घटक आहेत. ज्या वस्तूत जड घटकांचे प्रमाण अधिक आहे, ती वस्तू खाली पडते. याउलट ज्या वस्तूत हलक्या घटकांचे प्रमाण अधिक आहे, ती वस्तू वर जाते. खाली येणारी वस्तू जितकी अधिक जड, तितकी ती अधिक वेगाने खाली येते. वरच्या व खालच्या दिशेची ही गती, वस्तूची नैसर्गिकगती आहे. वस्तूला अनैसर्गिकगतीही असू शकते. उदाहरणार्थ, वस्तू फेकल्यानंतर तिला मिळणारी आडव्या रेषेतील स्थिर गती. मात्र वस्तू अशा स्थिर गतीत राहण्यासाठी तिला सतत बलाची आवश्यकता असते. बल काढून घेताच तिची गती संपुष्टात येते. अॅरिस्टॉटलच्या मते आणखी एका प्रकारची नैसर्गिकगती शक्य होती. ती म्हणजे अवकाशस्थ वस्तूंना लाभलेली वर्तुळाकार गती. या गतीमुळेच अवघे विश्व पृथ्वीभोवती फिरत होते!
– डॉ. राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
First Published on January 21, 2019 1:25 am
Web Title: greek philosophers
No comments:
Post a Comment