मेंदूशी मैत्री..: ‘न्युरो प्लॅस्टिसिटी’मुळे जुळणं आणि रुळणं
न्युरो प्लॅस्टिसिटी या गुणामुळे माणसं जगभर फिरतात.
नोकरी करत असताना दुसऱ्या गावी बदली झाली की माणसाचं मन अस्थिर होतं. बदली स्वीकारून नव्या जागी जायचं, रुळायचं याचा ताण मनावर येतो. काही माणसं उत्साहाने बदली स्वीकारतात; तर काही माणसं कटकट करतात. यामागे घरच्या जबाबदाऱ्या हे एक महत्त्वाचं कारण असतं. ज्या ठिकाणी बदली होते, तिथे रुजू झाल्यावर चांगले अनुभव आले की या नव्या जागेबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. तिथून पुन्हा बदली झाली की पुन्हा काही दिवस अस्थिरता वाटत राहते. याचं कारण आधीच्या जागेसंदर्भात आपले न्युरॉन्स जुळलेले असतात. एक ‘कम्फर्ट झोन’ तयार झालेला असतो. हा कम्फर्ट झोन सोडायला माणसं तयार नसतात. अशांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की काही दिवसांनी नव्या जागेतदेखील नव्या अनुभवांमुळे पुन्हा न्युरॉन्स जुळणार आहेत. नव्या जागेबद्दलही आपोआप कम्फर्ट झोन तयार होणार आहे.
घरात किंवा ऑफिसात एखादी नवी व्यक्ती येते, तेव्हा त्या व्यक्तीसाठी तिथलं वातावरण पूर्णपणे नवीन असतं. तिला सुरुवातीच्या काळात चांगले अनुभव मिळाले तर ती लवकर रुळते. तिथलीच एक व्यक्ती बनते. चांगले अनुभव मिळाले नाहीत तर तिला या जागेशी जवळीक वाटत नाही. हळूहळू याचीही सवय होते. नव्याची नवलाई फार दिवस टिकत नाही. याचाही संबंध न्युरॉन्सच्या जुळणीशी आहे.
कोणत्याही नव्या गोष्टीची सवय होणं, आधीपेक्षा वेगळ्या वातावरणाशी सहज किंवा थोडय़ा प्रयत्नांनी जुळवून घेता येणं, अशा गोष्टी आयुष्यात कितीदा तरी घडतात. याचं कारण आपल्या मेंदूतला ‘प्लॅस्टिसिटी’ हा गुण. याला न्युरो प्लॅस्टिसिटी असं म्हणतात. यामुळेच आपल्याला नव्या अनुभवांशी जुळवून घेता येतं. मात्र वाढत्या वयानुसार जुळवून घेण्याची क्षमता कमी होते. हे व्यक्तिसापेक्ष असतं. वयाच्या तिशीतल्या मुलामुलींनी नवं घर घेतलं तर ते तिथे जाण्यासाठी उत्सुक असतात. पण सत्तरीच्या वयातले आईबाबा नव्या जागेत कितीही सोयीसुविधा असल्या तरी नाखूश असतात. याचं कारण वयानुसार प्लॅस्टिसिटी काहीशी कमी झालेली असते. पण काही लोक मात्र या बदलाकडे अतिशय सकारात्मक आणि उत्साही नजरेने बघतात. न्युरो प्लॅस्टिसिटी या गुणामुळे माणसं जगभर फिरतात. नवी भाषा, नवं भौगोलिक वातावरण, चालीरीती, विविध स्वभावांची माणसं यांच्याशी जुळवून घेऊ शकतात.
First Published on February 19, 2019 2:33 am
Web Title: brain and neuroplasticity
No comments:
Post a Comment