कुतूहल – पहिला धातू – सोने
सोन्याच्या या गुणधर्माचा वापर पूर्वीपासून माणसाने कलाकुसरीच्या कामासाठी केला.
नेमका कुठल्या धातूचा शोध कुणी आणि कुठे लावला, हे शोधून काढणे अशक्य असले तरी धातूंच्या वापराला सोन्यापासून सुरुवात झाली असावी. याला कारण आहे ते, सोन्याची रासायनिक निष्क्रियता. या निष्क्रियतेमुळेच सोने निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळते. हवा, पाणी किंवा निसर्गात आढळणाऱ्या कुठल्याही रसायनाचा सोन्यावर काहीही परिणाम होत नाही. सोन्यावर गंज चढत नाही किंवा त्याची चमक कमी होत नाही. पृथ्वीजन्माच्या वेळी, पृथ्वीच्या तप्त गोळ्यावर वितळलेल्या अवस्थेतील लोखंड, निकेल या धातूंव्यतिरिक्त सोनेही मोठय़ा प्रमाणात होते. सोन्याची घनता लोखंडाच्या घनतेच्या अडीचपट इतकी मोठी आहे. त्यामुळे वितळलेल्या लोखंड आणि निकेल या धातूंबरोबर सोनेही पृथ्वीच्या अंतर्भागात जाऊन एकवटले. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सापडणारे सगळे सोने हे मात्र नंतर पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणात आदळलेल्या अशनींद्वारे आले आहे.
पिवळ्या रंगाच्या, चमकणाऱ्या आणि भोवतालच्या पदार्थापेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या सोन्याकडे अश्मयुगीन माणसाची नजर गेली नसती तरच नवल! मात्र शुद्ध स्वरूपात सोने अत्यंत मृदू असते. साध्या हाताच्या दाबानेही त्याचा आकार बदलू शकतो. सोन्याच्या या गुणधर्माचा वापर पूर्वीपासून माणसाने कलाकुसरीच्या कामासाठी केला. त्यामुळे जगातील सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये सोन्याचा वापर आढळतो. आतापर्यंत सापडलेल्या सोन्याच्या सर्वात जुन्या वस्तू या इजिप्त आणि मेसोपोटेमिआमधील (आताचा इराक) आहेत. मात्र सोने मृदू असल्याने, स्वत:चा आकार टिकवून ठेवू शकत नाही. यामुळे अवजारे आणि हत्यारे बनविण्यासाठी सोन्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याकरिता योग्य धातू सापडण्यासाठी माणसाला आणखी काही हजार वर्षे वाट पाहावी लागली.
– योगेश सोमण
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
First Published on January 8, 2019 1:29 am
Web Title: first metal gold
No comments:
Post a Comment