मेंदूशी मैत्री : ज्ञानाची रचना ‘काय’पासून
नवी माणसं, नव्या वस्तू यांची प्राथमिक ओळख करून घ्यावी याची प्रचंड उत्सुकता असते.
दोन वर्षांनंतर मूल थोडं आसपास बघायला सुरुवात करतं. आपल्या घरापलीकडे जग आहे याची जाणीव व्हायला लागते. त्याचबरोबर ‘स्व’ची जाणीव होत असते. ‘अहं’ला महत्त्व येत असतं. स्वत:ला केंद्रस्थानी मानून मूल जगाकडे बघत असतं. माझ्या मनासारखं झालं पाहिजे, हे फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी हट्ट करण्याचं अस्त्र प्रत्येक मूल आत्मसात करतं. आसपासच्या प्रत्येक वस्तूकडे कुतूहलाने बघत असतं. आपलं घर, घरातली माणसं, सतत भेटणारी इतर माणसं यांची ओळख झालेली असते. आपले खेळ, आपल्या घरातल्या वस्तू हेही कळायला लागलेलं असतं. नवी माणसं, नव्या वस्तू यांची प्राथमिक ओळख करून घ्यावी याची प्रचंड उत्सुकता असते.
शब्दसंपत्ती वाढलेली असते. कोणालाही प्रश्न विचारणं आणि माहिती वाढवणं, हे वयात फार आवडतं. ‘तुझं नाव काय?’, ‘तुझी आई कुठे आहे?’, ‘तुझं बाळ कुठे आहे?’ अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू होण्याचा हा सुरुवातीचा काळ. बोलायला लागल्यावर काही काळात मुलं असा प्रश्न अनेकांना विचारतात. अनेकदा त्याच वस्तूकडे बोट दाखवून ‘हे काय आहे?’ असं पुन:पुन्हा विचारतात, कारण खात्री करून घ्यायची असते आणि स्मरणातही ठेवायचं असतं. एखाद्या खेळण्याचे दोन भाग वेगवेगळ्या खोल्यांत असतील तर ती एकच वस्तू आहे किंवा यांचा काही संबंध असू शकतो का, हे लक्षात यायला लागतं. मूलभूत गोष्टी/ वस्तू/ माणसं समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. मुलांचा कोणताही खेळ हा फक्त टाइमपास खेळ नसतो. त्यातून काही ना काही शिक्षण चालू असतं. एका वाटीत दुसरी वाटी घालून बघणं हा नुसता खेळ नाही. एका वाटीत दुसरी वाटी बसते. दुसऱ्या वाटीत पहिली वाटी बसते का, बसत नसेल तर कशी बसवायची, हा महान प्रश्न त्याला पडलेला असतो. हे जमलं नाही तर मूल हा प्रयत्न सोडून देतं. काही दिवसांनी पुन्हा या वाटय़ा हातात आल्या तर पुन्हा प्रयत्न चालू होतात, पण थोडाच काळ. कारण पहिल्या वेळचा अनुभव गाठीशी असतो. अशाच प्रकारे या चिमुकल्या मेंदूला जी माहिती (डेटा) मिळेल, त्याची पहिलीवहिली ज्ञानरचना मेंदू करत असतो.
First Published on February 22, 2019 2:53 am
Web Title: human brain and learning process
No comments:
Post a Comment