मेंदूशी मैत्री : टीव्हीचं गारूड
लहान मुलांपासून मोठय़ा माणसांपर्यंत सगळ्यांना आज टीव्ही बघायचाच असतो.
प्रत्येक कार्टूनमध्ये एक छानशी गोष्ट असते. सुंदर रंग वापरलेले असतात. मुलांना आवडणारं, त्यांना खिळवून ठेवणारं संगीत असतं. दर सेकंदा-सेकंदाला, वेगात बदलणारी चित्रं असतात. या सगळ्यामुळे मुलं कार्टून्स बघत राहतात. मोठी माणसंदेखील कितीही वेळ टीव्ही बघू शकतात, याची अशीच कारणं आहेत.
पण खरं सांगायचं तर मेंदूला टीव्ही आवडत नाही. तो थकून जातो. कारण मिळालेली माहिती ग्रहण करणं हे मेंदूचं काम आहे. एरवी ही माहिती ग्रहण करण्याला एक मर्यादा असते. ती मेंदूला कळते. पण जेव्हा सेकंदा सेकंदाला माहितीचा मारा चालू असतो, तेव्हा त्याच्या कार्यक्षमतेला मर्यादा येते.
तो हे काम करायचं नाकारतो. फक्त माहिती घेत राहतो. त्यावर प्रक्रिया करत बसत नाही.
एकामागोमाग एक टीव्ही मालिका बघतात, तेव्हा प्रत्येक सीरिअलमध्ये गोड चेहरे येतील, ज्यामुळे नावीन्य वाटेल. प्रत्येक फ्रेम वेगळी वाटायला हवी, याचा आटोकाट प्रयत्न करतात. हे ज्या मालिकेमध्ये होत नाही, ती मालिका कंटाळवाणी होते. मालिकांमध्ये भावनांचं अतिरेकी प्रदर्शन असतं. यामागे मानसशास्त्राचा विचार आहे. माणसं भावनांमध्ये अतिशय रमतात. विशेषत: कोणाला त्रास होतोय, कोणी रडतंय, छळ सहन करतंय त्या पात्राला सहानुभूती असते. तिचं काय होईल, तो काय करेल अशा खोटय़ा खोटय़ा प्रश्नांमध्ये माणसं अडकतात.
एखाद्या मालिकेत सगळं आनंदात चाललंय असं कधीच होत नाही. तसं झालं तर ‘त्यात काय बघायचं?’ असं प्रेक्षक म्हणतात. टीआरपी घसरतो. म्हणून तर त्या पात्रांच्या आयुष्यात सतत नाटय़मय प्रसंग ओढवत असतात. एकाच व्यक्तीच्या आयुष्यात एवढे वाईट प्रसंग कसे काय घडतील, असला विचार मालिका बघताना मनात येतो, पण तो मागे सारला जातो. काही मालिकांमध्ये तर्किकतेशी पूर्ण फारकत घेतलेली असते. तरीही ती माणसं बघतात.
एकुणात हा सगळा आवडणारे चेहरे आणि गुंतलेल्या भावना यांचा खेळ आहे!
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com
First Published on January 31, 2019 12:48 am
Web Title: article about television brain
No comments:
Post a Comment