Tuesday, April 2, 2019

कुतूहल : शोधांचा मागोवा एखादे संशोधन विकसित कसे झाले, याचा परामर्श घेताना त्यामागचे विज्ञान समजणे, हेही गरजेचे असते.

कुतूहल : शोधांचा मागोवा

एखादे संशोधन विकसित कसे झाले, याचा परामर्श घेताना त्यामागचे विज्ञान समजणे, हेही गरजेचे असते.

विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचा पाया म्हणजे शोध. विविध शोधांद्वारेच विज्ञान-तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू असते. यातील काही शोध एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर लागतात; तर काही शोध हे इतर काही संशोधन चालू असताना अनपेक्षितपणे लागतात. शोध पाठपुरावा करून लागलेला असो वा अनपेक्षितपणे लागलेला असो- प्रत्येक शोधाला इतिहास असतोच. शोधांमागचा हा इतिहासही वाचनीय असतो. अनेक शोधांच्या बाबतीत हा इतिहास, शोधाचा ‘इतिहास’ म्हणूनच फक्त महत्त्वाचा असतो असे नव्हे, तर त्या शोधामागचे तर्कशास्त्र समजून घेण्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा ठरतो. सन २०१९ च्या कुतूहल सदराचा उद्देश हा, विज्ञान-तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या शोधांचा याच दृष्टीने मागोवा घेणे हा आहे. हा मागोवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित इत्यादी विषयांपासून ते अगदी तंत्रज्ञानापर्यंत अनेक विषयांचा असेल.
विज्ञान-तंत्रज्ञानातील ज्या शोधांनी विज्ञानाच्या इतिहासाला नवे वळण दिले, जे शोध क्रांतिकारी ठरले किंवा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीत ज्या शोधांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शोधांची संख्या अक्षरश: असंख्य आहे. या सर्वच शोधांचा मागोवा या वर्षभरातील सुमारे अडीचशे लेखांच्या मालिकेत घेता येणे शक्य नाही. त्यामुळे काही मोजक्या शोधांचाच या मालिकेत परामर्श घेतला जाईल. मुख्य म्हणजे, हा परामर्श ‘संशोधक केंद्रित’ नसून तो ‘संशोधन केंद्रित’ असणार आहे. त्यात संशोधकांच्या चरित्रापेक्षा वा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांपेक्षा, त्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले जाईल. एखादे संशोधन विकसित कसे झाले, याचा परामर्श घेताना त्यामागचे विज्ञान समजणे, हेही गरजेचे असते. त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल तिथे या शोधांच्या वैज्ञानिक पाश्र्वभूमीचाही आढावा घेतला जाईल.
या सदरातील लेख हे अर्थातच त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून लिहून घेतले जाणार आहेत. तरीही मोजक्या शब्दसंख्येत, सोप्या भाषेत शोधांचे वर्णन करणे, त्या मागचे विज्ञान स्पष्ट करणे हे या तज्ज्ञ-लेखकांच्या दृष्टीने एक आव्हानात्मक काम असणार आहे. सर्वच संशोधन काही अगदी सोप्या भाषेत मांडणे, शक्य असतेच असे नाही. परंतु या सदरात तसा प्रयत्न सतत असणार आहे. या प्रयत्नात ‘कुतूहल’चे लेखक पूर्ण यशस्वी ठरतील असा  मराठी विज्ञान परिषदेला विश्वास  आहे. त्यामुळे, शोधांचा मागोवा घेणारे या वर्षीचे हे ‘कुतूहल’सुद्धा, नेहमीप्रमाणेच लोकप्रिय ठरेल याची परिषदेला खात्री वाटते.
– डॉ. राजीव चिटणीस, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org
First Published on January 1, 2019 2:56 am
Web Title: science technology through various researches

No comments:

Post a Comment