Thursday, April 4, 2019

मेंदूशी मैत्री.. : ‘मी’ हे केंद्रस्थान प्रजोत्पादनाची साखळी चालू ठेवणं हे कार्यदेखील सरपट मेंदू करतो.

मेंदूशी मैत्री.. : ‘मी’ हे केंद्रस्थान  

प्रजोत्पादनाची साखळी चालू ठेवणं हे कार्यदेखील सरपट मेंदू करतो.

कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगात प्रत्येक जण स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. एक दिवसाचं बाळही स्वत:चा जीव वाचवण्याच्या उद्देशाने भूक लागली की रडत असतं. असं कशामुळे घडतं? प्रत्येक जीव स्वत:ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, यावरच आजवर सजीव सृष्टी तग धरून आहे. लहानशा मुंगीपासून बलाढय़ हत्तीपर्यंत आणि बुद्धिमान माणसापर्यंत हाच गुणधर्म दिसतो. अस्तित्व टिकवणं हे मेंदूचं मूलभूत कार्य आहे.
जलचर आणि सरपटणारे प्राणी हे पृथ्वीवरचे पहिलेवहिले सजीव. या प्राण्यांच्या मेंदूला रेप्टिलिअन ब्रेन असं नाव दिलेलं आहे. या आकृतीत हा भाग गडद दाखवला आहे.
हाच सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू. डॉ. पॉल मॅक्लीन यांनी मांडलेल्या त्रिस्तरीय मेंदूसिद्धांतातला (ट्रय़ून ब्रेन थिअरी) हा आहे पहिला आणि सर्वात खालचा स्तर. याद्वारा मेंदू अनेक कामं करत असतो. यातलं एक महत्त्वाचं काम म्हणजे स्व-संरक्षण. आपल्यापेक्षा लहान प्राणी दिसला तर अन्नग्रहणासाठी त्याच्यावर हल्ला करायचा आणि जर आपल्यापेक्षा आकाराने मोठा प्राणी दिसला तर त्याच्यापासून स्वत:ला वाचवायचं. या कार्यामुळे अस्तित्व जपण्याचं महत्त्वाचं काम ‘सरपट मेंदू’ करतो.
प्रजोत्पादनाची साखळी चालू ठेवणं हे कार्यदेखील सरपट मेंदू करतो. यासाठी हे आदिम जीव सुरक्षित ठिकाणी अंडी घालतात. उदाहरणार्थ मासे, कासव. मात्र एकदा अंडी देऊन झाली की, अंडय़ातून पिल्लं बाहेर पडतात. जन्मदाते त्यांना पुन्हा भेटत नाहीत, त्यांची काळजी घेत नाहीत. त्यांना खाणं आणून भरवत नाहीत. लाड करत नाहीत. ही पिल्लं आपापलं जीवन जगायला लागतात. स्वत:च्या अस्तित्वाची लढाई स्वत: लढतात. त्यांच्या मेंदूच्या यंत्रणेत हेच आहे.
अंडी फुटून पिल्लं बाहेर आल्यावर जलचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या काही अपवादात्मक प्रजाती मात्र पिल्लांचं संरक्षण करताना दिसतात. मात्र ती प्रेम, माया यासाठी नाही तर प्रजोत्पादन, वंशसातत्य राखणं हे काम करण्यासाठी! प्रेम, माया, राग अशा कोणत्याही भावनांची केंद्रं सरपट मेंदूमध्ये नसतात. नाग रागाने फूत्कार मारत नाही, साप डूख धरत नाही किंवा मुंगी त्वेषाने चावत नाही. जीव संकटात आहे याची जाणीव झाल्यामुळे ते स्वत:चं संरक्षण करतात.
मात्र, माणसाच्या मेंदूतली गुंतागुंत काही वेगळीच!
–  श्रुती पानसे contact@shrutipanse.com
First Published on February 13, 2019 1:02 am
Web Title: the basic function of brain

No comments:

Post a Comment