Tuesday, April 2, 2019

लोहयुग पृथ्वीचे सुमारे एकतृतीयांश वस्तुमान हे लोहापासून बनलेले आहे आणि भूपृष्ठावर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू हा लोखंडच आहे.

लोहयुग

पृथ्वीचे सुमारे एकतृतीयांश वस्तुमान हे लोहापासून बनलेले आहे आणि भूपृष्ठावर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू हा लोखंडच आहे.

पृथ्वीचे सुमारे एकतृतीयांश वस्तुमान हे लोहापासून बनलेले आहे आणि भूपृष्ठावर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू हा लोखंडच आहे. तरीही माणसाचा या धातूचा वापर सुरू झाला तो, पृथ्वीबाहेरून येणाऱ्या अशनींतील लोखंडाद्वारे. यांपकी काही अशनींमध्ये ८५ टक्के ते ९० टक्के लोह आणि उरलेले निकेल असते. शुद्ध धातूरूपात किंवा मिश्रधातूच्या स्वरूपात पृथ्वीवर लोह फक्त अशनींमध्येच आढळते. इ.स.पूर्व ५०००च्या सुमारास तयार केलेले, अशा लोखंडाचे अलंकार इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये सापडले आहेत. त्या काळात लोखंड फक्त पृथ्वीवर सापडलेल्या अशनींद्वारेच उपलब्ध होत असल्याने, लोखंड फारच दुर्मीळ होते आणि सोन्याच्या तुलनेत ते कित्येक पट किमतीचे होते! त्यामुळे लोखंडाचा उपयोग त्याकाळी मुख्यत: अलंकारांसाठीच केला जात असावा.
हिमाटाइटसारख्या (लोहाचे ऑक्साइड) खनिजांपासून कार्बनच्या साहाय्याने लोखंड धातूरूपात वेगळे करता येते. परंतु ही प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे ताम्रयुग आणि त्यानंतरच्या कांस्ययुगात, धातुशास्त्रावर चांगली पकड बसल्यानंतरच खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला. शुद्ध लोखंडाचा वाढता वापर सुरू झाला त्या काळापासून, म्हणजेच इ.स.पूर्व १५००च्या नंतरच लोहयुग सुरू झाले. लोखंड हे हवा आणि बाष्पाच्या सान्निध्यात गंजते व त्याचे रूपांतर लाल रंगाच्या ऑक्साइडमध्ये होते. शुद्ध लोखंड हे खूपच मृदू असा धातू आहे. परंतु लोखंडात थोडा कार्बन मिसळला की त्याची ताकद आणि कठीणपणा कित्येक पटींनी वाढतो, तसेच त्याचे गंजणेही मंदावते. हे कार्बनमिश्रित लोखंड म्हणजेच पोलाद. पोलादाचा शोध लागल्यानंतर कांस्याचा वापर कमी होऊन सर्वत्र पोलाद वापरात आले. पोलाद मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकत असल्याने अवजारे आणि इतर अनेक वस्तूंसाठी त्याचा वापर सुरू झाला व माणसाच्या सांस्कृतिक आणि आíथक विकासाचा वेग वाढला.
प्राचीन भारतातही पोलादाची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होत होती. इ.स. ४००च्या सुमारास उभारलेला दिल्लीतील अशोक स्तंभ याचीच साक्ष देत उभा आहे. त्यातील सिलिकॉन आणि फॉस्फरस या मूलद्रव्यांमुळे त्याची गंजरोधकताही अधिक आहे. याच काळात भारताकडून दमास्कसला पोलादाची निर्यातही होत असे. दमास्कसमध्ये या पोलादापासून खंजीर आणि तलवारी तयार केल्या जात. उत्तम ताकदीच्या आणि तीक्ष्ण धार असणाऱ्या या तलवारींना युरोपपासून चीनपर्यंत दुसरा पर्याय नव्हता.
– योगेश सोमण
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org
First Published on January 11, 2019 12:02 am
Web Title: iron age

No comments:

Post a Comment