मेंदूशी मैत्री : मुलांच्या वर्तनसमस्या आणि त्याचं मूळ
रोजच्या नियमित, मदानी खेळांमुळे मुलांमध्ये असलेली भरपूर ऊर्जा चांगल्या पद्धतीने वापरली जायची.
मुलं एकेकाळी खोडकर, खेळकर, उपद्व्यापी वगैरे असायची. ती खेळायची, हुंदडायची. शाळेतून चालत किंवा सायकलवर घरी यायची. आली की लगेच बाहेर खेळायला पळायची. दमेपर्यंत खेळायची. मारामारी वगैरे झाली तरी ते सगळं संपवून, शांतपणे घरी यायची. अभ्यास झाला की संपला दिवस! त्यांच्याकडून मन आणि मान मोडून अभ्यास करण्याची अपेक्षा कोणीच ठेवायचं नाही. कदाचित त्यामुळेच वर्तनसमस्या कमी असायच्या. ज्या असायच्या त्या घरच्या मोठय़ांपर्यंत फारशा यायच्याही नाहीत. काही ताण-तणाव असलेच तर तात्पुरते असायचे, काही काळात आपोआप निघून जायचे. नकारात्मक भावनांचा निचरा व्हायचा, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खेळ. शरीराने केलेल्या भरपूर हालचाली.
रोजच्या नियमित, मदानी खेळांमुळे मुलांमध्ये असलेली भरपूर ऊर्जा चांगल्या पद्धतीने वापरली जायची. पण आताची मुलं बालवाडीपासूनच शहाण्यासारखं वागण्याच्या दबावाखाली असतात. सतत मोठी माणसं आसपास असतात, त्यामुळे हवं तसं ओरडायला, दंगा करायला, एकमेकांच्या खोडय़ा काढायला परवानगी नसते. मग मानसिक-शारीरिक ऊर्जा कशी बाहेर घालवली जाणार?
आज या वर्तनसमस्या जाणवताहेत, याचं अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे मुलं दमेपर्यंत खेळत नाहीत. लहान मुलांच्या अंगात प्रचंड ऊर्जा असते. खेळल्यामुळे त्या ऊर्जेचा सकारात्मक वापर होतो. ही ऊर्जा साठून राहात नाही. ती बाहेर पडते. हे मानसिक आरोग्यासाठी चांगलं असतं.
हल्ली मुलं घरात एकेकटी असतात. विशेषत: शहरी भागात हे जास्त जाणवतं की खेळायला मित्र नसतात. खेळगडी असतील तर पुरेशी जागा नसते. त्यामुळे ही मुलं कमी जागेत, लुटुपुटुचं काहीतरी खेळून मन रमवण्याचा प्रयत्न करतात. हेही शक्य नसलं तर टीव्हीसमोर बसतात. हातात मोबाइल घेऊन खेळण्याचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्याचा मनावर विचित्र परिणाम होतो. मुलांनी वयाच्या कमीतकमी आठ वर्षांपर्यत भरपूर खेळणं- हालचाली करणं आवश्यक असतं. याचं कारण डाव्या आणि उजव्या गोलार्धाना जोडणारा कॉर्पस कलोझम हा अवयव. हा अवयव योग्य पद्धतीने विकसित व्हावा असं वाटत असेल तर या वयातल्या मुलांनी आणि एकूणच शालेय वयात भरपूर खेळलं पाहिजे. असं घडलं नाही तर वर्तनसमस्या वाढणार हे नक्की!
contact@shrutipanse.com
First Published on January 23, 2019 1:28 am
Web Title: article about brain information 2
No comments:
Post a Comment