Friday, April 5, 2019

कुतूहल- मिलर-युरीचा प्रयोग आठवडाभराच्या प्रयोगानंतर, उपकरणाच्या तळाशी जमलेल्या पाण्याचे विश्लेषण केले गेले.

कुतूहल- मिलर-युरीचा प्रयोग

आठवडाभराच्या प्रयोगानंतर, उपकरणाच्या तळाशी जमलेल्या पाण्याचे विश्लेषण केले गेले.

पृथ्वीवर सजीवांचा उगम कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. या संदर्भात रशियन संशोधक अलेक्झांडर ओपॅरिन यांनी, असेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय पदार्थ बनले असण्याची शक्यता व्यक्त केली होती. जीवोत्पत्तीसाठी आवश्यक असणाऱ्या अमिनो आम्लांसारख्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती पृथ्वीवरील तेव्हाच्या ऑक्सिजनविरहित वातावरणातील, मिथेन, अमोनिया, पाण्याची वाफ व हायड्रोजन, या घटकांपासून झाली असावी. या निर्मितीला सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांप्रमाणे, वातावरणातील ढगांत चमकणाऱ्या विजाही कारणीभूत ठरल्या असाव्यात. या बाबतीत, इ.स. १९५२ साली शिकॅगो विद्यापीठात स्टॅनली मिलर यांनी हॅरॉल्ड युरी यांच्या सहकार्याने एक अभिनव प्रयोग केला. या प्रयोगात त्यांनी, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन आणि पाण्याची वाफ, यांच्या काचेच्या उपकरणांत केलेल्या मिश्रणाद्वारे पृथ्वीवरील जीवोत्पत्तीच्या वेळचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर त्यांनी या उपकरणात बसवलेल्या दोन इलेक्ट्रोड्सद्वारे ६०,००० व्होल्ट दाबाखालचा विद्युतप्रवाह पाठवून कृत्रिम विजांची निर्मिती केली.
आठवडाभराच्या प्रयोगानंतर, उपकरणाच्या तळाशी जमलेल्या पाण्याचे विश्लेषण केले गेले. या पाण्यात ग्लायसिन, अ‍ॅलॅनिन, अ‍ॅस्पार्टकि आम्ल यासारखी अमिनो आम्ले अस्तित्वात असल्याचे दिसून आले. अलेक्झांडर ओपॅरिन यांच्या सिद्धांताला पूरक असे हे निष्कर्ष होते. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीच्या उत्पत्तीच्या काळात, ताक घुसळल्यावर जसे लोण्याचे कण एकत्र येतात, तसेच या सेंद्रिय कणांचे गोळे सागरात निर्माण झाले असावेत. याच निर्जीव गोळ्यांपासून नंतर पहिलीवहिली पेशी बनली व पृथ्वीवर जीवोत्पत्ती झाली. मिलर-युरी यांच्या प्रयोगातल्या द्रावणांचे २००८ साली पुन्हा, आजच्या आधुनिक उपकरणांद्वारे विश्लेषण केले तेव्हा, या द्रावणात २२ वेगवेगळी अमिनो आम्ले असल्याचे दिसून आले.
जीवोत्पत्तीला आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सेंद्रिय पदार्थाची निर्मिती कशी झाली हे या प्रयोगाने स्पष्ट केले असले, तरी या प्राथमिक सेंद्रिय रेणूंचे डीएनए आणि प्रथिनासारख्या रेणूंत रूपांतर कसे झाले असावे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच काही संशोधकांच्या मते, पृथ्वीवरील जीवोत्पत्ती ही पृथ्वीच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळातच पृथ्वीवर बाहेरून आयात केली गेली असावी. या प्रक्रियेत पृथ्वीवर आदळणाऱ्या धूमकेतूंचा आणि लघुग्रहांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. त्याबद्दलही अधिक संशोधनाची गरज आहे.
–  डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org
First Published on March 1, 2019 1:42 am
Web Title: miller urey experiment

No comments:

Post a Comment