Tuesday, April 2, 2019

का असा..मी? ‘मैं ऐसा क्यू हूं?’ असा प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो.

का असा..मी?

‘मैं ऐसा क्यू हूं?’ असा प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो.

‘मैं ऐसा क्यू हूं?’ असा प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो. आपण शांत आहोत, तापट आहोत, खूप भीड वाटते. अतिआत्मविश्वासामुळे कामं बिघडतात. न्यूनगंड आहे. मन कणखर नाही. मनात गोंधळ. विसराळू. मनात सततच्या विचारांमुळे एका ठिकाणी लक्ष देता येत नाही. अशा आपल्या स्वभावाच्या विविध तऱ्हा असतात.
खूपदा आपलं वागणं हळूहळू बदलत जातं. एखादं मूल लहानपणी खूप हट्टी होतं, आता खूप समजूतदार झालं आहे, असं आपण म्हणतो. अमुक एक माणूस पूर्वी शांत होता, आता तापटपणा वाढलाय असंही घडतं. या ‘जडणघडणी’चा न्यूरॉन्सशी जवळचा संबंध आहे.  आपला स्वभाव विशिष्ट प्रकारचा असण्याला अनेक कारणं आहेत. उदा. जीन्सने नैसर्गिकपणे घडवलेला आपला स्वभाव. अनेकदा माणसांना आपलं वागणं जरासं बदलावं लागतं, पण वागणं बदललं तरी स्वभाव बदलत नाही. योग्य वेळ येताच आपला मूळ स्वभावच आठवतो. अंतरीचे धावे। स्वभावे बाहेरी। धरिता ही परी । आवरेना। आपले संत तुकारामांनी म्हटलेलंच आहे.
असं म्हणावं लागेल की, जसे सिनॅप्स, तसेच आपण! एक घरात दोन वर्षांच्या आतलं एखादं मूल आहे. या वयात सुरक्षित वाटण्याची अतिशय गरज असते. पण त्या बाळाला काळजी घेणाऱ्या प्रेमाच्या व्यक्तीचा स्पर्श फारसा मिळत नाही. कोणी त्याच्याशी बोलत नाही. आसपास माणसं फक्त दिसतात. ते एकटं एकटं खेळत असतं.
दुसऱ्या घरात असंच एक मूल आहे. त्याच्या आसपास सतत भांडणं चालतात. घरातले लोक एकमेकांशी जोरजोरात बोलतात. एकमेकांच्या अंगावर धावून जातात. या घरात कधी कधी चुकून शांत स्वरातले संवाद होतातही, पण ते क्वचित. अशा वातावरणात हे मूल वाढतं आहे.  तिसऱ्या घरात बाळाशी बोलणारं, त्याच्यावर माया करणारं कोणी तरी आहे. सगळे एकमेकांशी नीट बोलतात. हे बाळाने लहानपणापासून पाहिलं आहे. अशा परिस्थितीत तिन्ही मुलांच्या आसपासचं वातावरण एकसारखं नाही. सख्ख्या भावंडांनादेखील एकाच प्रकारचं वातावरण मिळत नाही. त्यामुळे त्यांचेही स्वभाव वेगवेगळे असतात. स्वभावाची जडणघडण इथून सुरू होते. जन्मापासून मिळालेला प्रत्येक अनुभव म्हणजेच सिनॅप्स आपल्यात बदल घडवून आणतो. हे अनुभव म्हणजेच आपण. आपली असामी.
– डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com
First Published on January 21, 2019 1:24 am
Web Title: human brain

No comments:

Post a Comment