Friday, April 5, 2019

वाफेवर चालणारे इंजिन औद्योगिक क्रांतीचे प्रतीक म्हणजे वाफेवर चालणारे इंजिन.

वाफेवर चालणारे इंजिन

औद्योगिक क्रांतीचे प्रतीक म्हणजे वाफेवर चालणारे इंजिन.

औद्योगिक क्रांतीचे प्रतीक म्हणजे वाफेवर चालणारे इंजिन. वाफेमध्ये शक्ती असते हे पहिल्या शतकात इजिप्तमधील अलेक्झांड्रियाच्या हेरो याने दाखवून दिले. त्याच्या उपकरणात धातूच्या एका पोकळ गोळ्यात सोडलेली वाफ, त्याला जोडलेल्या दोन नळ्यांमधून बाहेर पडत असे आणि त्यामुळे तो गोळा स्वत:भोवती गोलगोल फिरत असे. मात्र वाफेच्या या शक्तीचा औद्योगिक वापर होण्यासाठी सुमारे १६ शतके जावी लागली. १६९८ साली इंग्लंडच्या थॉमस सेव्हरी याने खाणींमधील पाणी उपसून काढण्यासाठी वाफेवर चालणारे एक यंत्र तयार केले. या यंत्रातील एका टाकीत पाण्याची वाफ सोडली जाई. ही वाफ थंड झाल्यावर तिचे पाण्यात रूपांतर झाल्यामुळे टाकीतील दाब कमी होत असे. यामुळे खाणीतील पाणी या टाकीत खेचणे शक्य होई. मात्र हे इंजिन अखंड चालवता येत नसे व थोडेसे पाणी उपसण्यासाठीही या इंजिनाला बराच कोळसा जाळावा लागे.
या इंजिनात १७१२ साली सुधारणा केली ती इंग्लंडच्याच थॉमस न्यूकोमेन याने. न्यूकोमेनने त्याच्या इंजिनात एक दट्टय़ा बसवलेला सिलिंडर वापरला. सिलिंडरखालीच बसवलेल्या टाकीतले पाणी उकळून त्याची सतत वाफ होत असे. ही वाफ एका स्वयंचलित झडपेमार्गे सिलिंडरमध्ये शिरून त्यातील दट्टय़ा वर ढकलला जात असे. त्यानंतर ही वाफ थंड केल्यावर तिचे पाण्यात रूपांतर होई आणि सिलिंडरमधील दाब कमी होऊन दट्टय़ा खाली येत असे. दट्टय़ाच्या या हालचालींद्वारे, तरफेमार्फत पंप चालवला जाऊन खाणीतील पाणी उपसता येत असे. परंतु या इंजिनात वाफेचे द्रवीभवन होताना, दट्टय़ाचा सिलिंडर बराच गरम राहात असे. त्यामुळे या इंजिनाचीही कार्यक्षमता खूप कमी होती.
जेम्स वॉटने १७६५ मध्ये या इंजिनात वाफेचे द्रवीभवन करण्यासाठी, वेगळी टाकी वापरली. ही टाकी बाष्पीभवन करणाऱ्या टाकीपासून दूर असल्याने, तिचे तापमान कमी होते. यामुळे वाफेचे पाण्यात रूपांतर जास्त सहज होऊ लागले व उष्णता फुकट न गेल्यामुळे कोळशाचा वापर निम्म्यावर आला. त्यांनर जेम्स वॉट यानेच केलेल्या बदलामुळे, या इंजिनाच्या दट्टय़ाच्या हालचालीद्वारे चाक फिरविणेही शक्य झाले. यानंतर विविध सुधारणा होऊन, या इंजिनाने खाणींमधून वस्त्रोद्योगासारख्या विविध उद्योगांत प्रवेश केला. तसेच रेल्वे उद्योगाचाही पाया घातला तो याच इंजिनाने!
– शशिकांत धारणे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org
First Published on February 25, 2019 12:03 am
Web Title: steam engine

No comments:

Post a Comment