Tuesday, April 2, 2019

कुतूहल : ताम्रयुगात.. सोन्याचा वापर सुरू झाल्यावर, काही हजार वर्षांच्या कालखंडानंतर मानवाला धातूच्या रूपातील तांब्याच्या गुणधर्माची ओळख झाली.

कुतूहल : ताम्रयुगात..

सोन्याचा वापर सुरू झाल्यावर, काही हजार वर्षांच्या कालखंडानंतर मानवाला धातूच्या रूपातील तांब्याच्या गुणधर्माची ओळख झाली.

योगेश सोमण
सोन्याचा वापर सुरू झाल्यावर, काही हजार वर्षांच्या कालखंडानंतर मानवाला धातूच्या रूपातील तांब्याच्या गुणधर्माची ओळख झाली. धातुरूपातील तांबे निसर्गात काही प्रमाणात आढळते. त्यामुळेच, इ.स.पूर्व ९००० सालाच्या सुमारासच्या, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू मध्य आशिया आणि आसपासच्या प्रदेशात सापडल्या आहेत. परंतु तांब्याचा ‘शोध’ हा तांब्याच्या खनिजापासून तांबे वेगळे करण्याची पद्धत मानवाला अवगत झाली तेव्हाच लागला, असे म्हणता येईल. खनिजापासून तांबे वेगळे करण्याची सुरुवात अपघातानेच झाली असावी. भटक्या मानवी समूहाने किंवा शिकारीला गेलेल्या एखाद्या गटाने, तांब्याचे खनिज मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात असलेल्या भागात रात्री वसती केली असावी. अन्न शिजवण्याकरिता, उबेकरिता अथवा प्राण्यांपासून बचावाकरिता त्याने शेकोटी पेटवली असता, शेकोटीचे तापमान आणि लाकडातील कार्बन यामुळे जमिनीतल्या खनिजाचे विघटन होऊन त्यापासून धातुरूपातील तांबे वेगळे झाले असावे.
शेकोटी विझल्यानंतर त्या गटातल्या कुणाचे तरी या नवीनच तयार झालेल्या पदार्थाकडे- धातूकडे – लक्ष गेले असावे.. आणि तिथूनच तांब्याच्या कहाणीला सुरुवात झाली असावी.
सोन्यापेक्षा जास्त कठीण पण गंजरोधक असलेल्या तांब्याचे उत्पादन करण्याचा खात्रीशीर मार्ग सापडल्यावर, तांब्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला. सोन्याप्रमाणेच, तांबे ठोकून त्याचे पातळ पत्रे बनवणे शक्य असते. त्यामुळे तांब्यापासून अवजारे आणि भांडी तयार होऊ  लागली. त्यानंतर दगड आणि लाकडाचा वापर थांबवून माणसाने या धातूचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू केला. असा वापर सुरू झाला तेव्हापासून, म्हणजे इ.स.पूर्व ६००० ते इ.स.पूर्व ५००० या काळात ‘ताम्रयुग’ सुरू झाले, असे मानले जाते.
सुरुवातीच्या या धातुशास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके थोडेच! कुठलाही कार्यकारणभाव माहीत नसताना, जवळजवळ चमत्कारच वाटेल अशा रीतीने तयार झालेल्या या अज्ञात धातूच्या मुळाशी जाऊन निरीक्षणाद्वारे ‘दोन अधिक दोन बरोबर चार’चे गणित करून आणि परत परत प्रयोग करून त्यांनी खनिजापासून तांबे मिळवण्याची कला आत्मसात केली. तांब्याचा वितळणबिंदू हा जवळपास अकराशे अंश सेल्सियस इतका आहे. इतके जास्त तापमान निर्माण करणे आणि ते टिकवणे याची माहिती असल्याशिवाय ताम्रयुगातल्या माणसाला तांब्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणे शक्यच झाले नसते. त्यामुळे यापूर्वीच मिळवलेल्या ‘आगीवरील नियंत्रणा’चा, तांब्याचे उत्पादन करण्यासाठी नक्कीच उपयोग झाला असणार.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org
First Published on January 9, 2019 1:54 am
Web Title: article about chalcolithic

No comments:

Post a Comment