Tuesday, April 2, 2019

कुतूहल : कांस्ययुगाचा काळ मेसोपोटेमियाच्या जवळ, हल्लीच्या तुर्कस्तानच्या भागात कथिलाचे खनिज मोठय़ा प्रमाणावर आढळत असे.

कुतूहल : कांस्ययुगाचा काळ

मेसोपोटेमियाच्या जवळ, हल्लीच्या तुर्कस्तानच्या भागात कथिलाचे खनिज मोठय़ा प्रमाणावर आढळत असे.

इ.स.पूर्व ६००० ते इ.स.पूर्व ५०००च्या दरम्यान ताम्रयुगाची सुरुवात झाली असे मानले जाते. तांब्याच्या खनिजाबरोबर कथील (टिन) आणि अस्रेनिकचे खनिज मिसळलेले असल्याने, तांब्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर कधीतरी, त्यातून एखादा मिश्रधातू तयार झाला असावा. या मिश्रधातूच्या गुणधर्मावरून, त्या वेळच्या धातूतज्ज्ञांच्या हे लक्षात आले असावे की, तांब्यामध्ये इतर धातू मिसळले की तांब्याचे काठीण्य वाढते, शस्त्रांची आणि अवजारांची धार जास्त टिकून राहते. साहजिकच या दृष्टीने पुढील प्रयत्न सुरू झाले असणार. सुरुवातीला या मिश्रधातूंत अस्रेनिकचा वापर झाला असला तरी कालांतराने तो मागे पडला. तांबे आणि कथिलापासून तयार होणाऱ्या या मिश्रधातूला आता कांस्य (ब्राँझ) असे म्हटले जाते. या कांस्याच्या वापराची सुरुवात इ.स.पूर्व ३०००च्या सुमारास झाली असावी. मात्र कांस्याचा मोठय़ा प्रमाणातील वापर मात्र इ.स.पूर्व २००० सालाच्या आसपास सुरू झाला असावा. जगात विविध ठिकाणी कांस्ययुगाची सुरुवात होण्याचा काळ हा काही शतकांनी पुढे/मागे आहे.
तांब्यात कथिल मिसळले की तयार होणाऱ्या मिश्रधातूची ताकद आणि काठीण्य वाढतेच, पण तांब्याचा वितळणिबदूही कमी होतो. यामुळे वितळलेला मिश्रधातू साच्यामध्ये सहजपणे ओतता येतो आणि तो पसरतोही चटकन. त्यामुळे तांब्याच्या मानाने कांस्याचे ओतीवकाम अधिक सुलभतेने करता येई. मात्र कांस्य निर्माण करण्यासाठी कथिलाची वेगळी निर्मिती करून ते वितळलेल्या तांब्यामध्ये मिसळावे लागे. तांब्याची खनिजे जशी पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणात आढळतात, तितक्या प्रमाणात कथिलाची खनिजे आढळत नाहीत. त्यामुळे जिथे कथिल उपलब्ध नव्हते, त्या ठिकाणी ब्राँझचा वापर काहीसा नंतरच सुरू झाला असावा.
मेसोपोटेमियाच्या जवळ, हल्लीच्या तुर्कस्तानच्या भागात कथिलाचे खनिज मोठय़ा प्रमाणावर आढळत असे. आज त्या भागात जमिनीखाली जे बोगद्यांचे जाळे आढळते, ते म्हणजे त्या काळातल्या कथिलाच्या खाणी असाव्यात. कथिलाच्या या उपयुक्ततेमुळे जिथे कथिलाच्या खनिजाचे साठे होते, तिथून त्याचा व्यापारही सुरू झाला. इंग्लंडमधील आजच्या कार्नवॉल भागात आणि फ्रान्सच्या ब्रिटनी भागात कथिलाची खनिजे सापडतात. युरोपाचा कथिलाचा पुरवठा प्रामुख्याने या दोन खाणींमधून होत असे. चीनमधल्या कांस्याच्या निर्मितीसाठी आजच्या म्यानमारमधून कथिल जात असे. जागतिक व्यापारास अशा प्रकारे इ.स.पूर्व ३०००च्या सुमारास सुरुवात झाली ती या कांस्याच्या निर्मितीमुळे!
– योगेश सोमण
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org
First Published on January 10, 2019 2:02 am
Web Title: bronze age bronze era

No comments:

Post a Comment