Tuesday, April 2, 2019

कुतूहल – पशुपालन इ.स.पू. २००० सालाच्या सुमारास दक्षिण आशियात (भारतात व इतरत्र) हत्ती पाळले जाऊ लागले.

कुतूहल – पशुपालन

इ.स.पू. २००० सालाच्या सुमारास दक्षिण आशियात (भारतात व इतरत्र) हत्ती पाळले जाऊ लागले.

ज्या काळात शेतीला सुरुवात झाली, जवळपास त्याच काळात पशुपालन सुरू झाले असावे. परंतु मानवाची, काही प्राण्यांना आपल्यासमवेत ठेवण्याची पद्धत त्याही अगोदर सुरू झाली असावी. जंगली श्वापदांपासून जीव वाचविण्यासाठी कुत्रे, मांजरे असे प्राणी माणसाच्या सोबतीला येऊ लागले. असे मत व्यक्त केले गेले आहे की, कुत्रा हा उत्क्रांतीच्या एका टप्प्यात लांडग्यासारखा प्राणी असताना, माणसाने मारलेल्या शिकारीच्या उरल्यासुरल्या वाटय़ावर तो जगत होता. मानवामुळे आपले पोट भरते हे लक्षात आल्यावर तोदेखील माणसाच्या आगेमागे राहू लागला. त्याचे रूपांतर उत्क्रांतीद्वारे कुत्र्यात झाल्यानंतर तर, इ.स.पू. १२००० वर्षांपासून कुत्रा हा मानवाचा पहिला आवडता पाळीव प्राणी ठरला आहे.
आदिमानवाचे अवशेष शोधत असताना त्याच्यासोबत मिळालेल्या प्राण्यांच्या हाडांवरून, गुहेतील चित्रांवरून, अन्नाच्या अवशेषांवरून पशुपालनाबद्दलचे अंदाज बांधता येतात. इ.स.पू. ८००० वर्षांपासून संपूर्ण आशियाई प्रदेशात व विशेषत: मेसोपोटेमिया (आताचा इराक) संस्कृतीत शेळ्या आणि मेंढय़ा पाळल्या जाऊ लागल्या होत्या. आताच्या तुर्कस्तानात आणि पाकिस्तानातील सिंधू संस्कृतीत, गायीगुरे पाळली जात असल्याचा इ.स.पू. ५००० सालचा पुरावा उपलब्ध आहे. गायीपासून दूध मिळते आणि ते आपण वापरू शकतो, तसेच बल शेतीची कामे करण्यास उपयुक्त असतो, या दोन गोष्टी लक्षात आल्यावर मानवाने अशा जनावरांवर लक्ष केंद्रित केले ते आजपावेतो! इ.स.पू. ६५००च्या आसपास डुकरे पाळायला सुरुवात झाली. इ.स.पू. ५५०० सालाच्या सुमारास कझाकस्तानात घोडय़ांचा वापर सुरू झाला असावा. सुरुवातीला घोडे हे अन्न म्हणून आणि दुधासाठी वापरले जात असावेत, असे पुरातन भांडय़ात सापडलेले त्यांचे अवशेष दर्शवतात. घोडय़ांचा वाहतुकीसाठीचा वापर इ.स.पू. २००० सालाच्या सुमारास मेसोपोटेमियात सुरू झाला असावा.
इ.स.पू. २००० सालाच्या सुमारास दक्षिण आशियात (भारतात व इतरत्र) हत्ती पाळले जाऊ लागले. कारण त्यांच्यात असलेल्या अफाट शक्तीमुळे अवजड कामात त्यांची मदत होऊ लागली. चीनमध्ये, उत्तर भारतात आणि आग्नेय आशियामध्ये इ.स.पू. ५००० ते इ.स.पू. ४००० या काळात कोंबडय़ा पाळल्या जात असल्याचे पुरावे सापडले आहेत. मधमाश्यांपासून मध मिळत असल्याचे आणि रेशीमकिडय़ांपासून रेशीम मिळत असल्याचे समजल्यावर, इ.स.पू. ६०००च्या सुमारास चीनमध्ये रेशमाच्या किडय़ांचे आणि इ.स.पू. ३००० सालाच्या आसपास स्पेनमध्ये मधमाश्यांचे पालन सुरू झाले. तेव्हापासून हे कीटकदेखील पशुपालनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
– डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org
First Published on January 17, 2019 12:22 am
Web Title: article about livestock breeding

No comments:

Post a Comment