Tuesday, April 2, 2019

मेंदूशी मैत्री – आहार शाळेत जाणाऱ्या मुलांना पोषणयुक्त आहार मिळणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे.

मेंदूशी मैत्री – आहार

शाळेत जाणाऱ्या मुलांना पोषणयुक्त आहार मिळणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com
सध्या कुपोषणाचे दोन प्रकार दिसून येतात. दोन्ही प्रकार अतिशय गंभीर आहेत. पहिला प्रकार म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असलेली भूकबळींची संख्या. आहार न मिळाल्यामुळे मुलांचे बळी जातात, कुपोषित आईच्या पोटी कुपोषित बाळं जन्माला येतात. खायला मिळालं नाही म्हणून एकही मूल मरू नये, जोपर्यंत आपण किमान हे साध्य करू शकत नाही तोपर्यंत आपल्या समाजाच्या विकासाच्या गप्पा आपण कशा करणार? या मुलांना जगवणं हे आधी महत्त्वाचं आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांना पोषणयुक्त आहार मिळणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. अंगणवाडी आणि शाळांमधून मुलांना मिळणारा पोषक आहार या योजना चांगल्या प्रकारे चालूच राहायला हव्यात. दुसऱ्या प्रकारचं कुपोषण हे श्रीमंत घरात दिसून येतं. घरात पौष्टिक पदार्थ आहेत, पण मुलं ते खात नाहीत. बाहेरून मागवलेला पिझ्झा, भाज्या न घालता केलेले पास्ता, नूडल्स, बर्गर असे पदार्थ खात असतील आणि शिवाय पाण्याऐवजी कोल्ड ड्रिंक्स वगैरे पेयं पीत असतील तर पोट भरूनही हे एक प्रकारे कुपोषितच राहतात.   आहारात लोहाचं प्रमाण व्यवस्थित नसेल तर स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे मुलं कुपोषित राहतात. मुलांना शाळेत पाठवण्याइतकंच महत्त्वाचं आहे, त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं. समाजात कोणतंही मूल पोषक आहाराविना राहायला नको. वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या आहाराची देखील योग्य काळजी घ्यायला हवी. गहू, तांदूळ यातून मिळणारी कबरेदकं, डाळी, कडधान्यातून मिळणारी प्रथिनं, भाज्या-फळं यातून मिळणाऱ्या जीवनसत्त्वांना जर नकारच दिला तर ग्लुकोज तयार होत नाही. त्यामुळे मेंदूला त्याचा पुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत मेंदू आपलं काम करणार कसं?

First Published on January 25, 2019 1:22 am
Web Title: diet for brain health


No comments:

Post a Comment