Wednesday, April 3, 2019

कुतूहल : न्यूटनचे गतिशास्त्र फेकलेल्या वस्तूला मिळालेली गती हा दोन गतींचा परिणाम असतो.

कुतूहल : न्यूटनचे गतिशास्त्र

फेकलेल्या वस्तूला मिळालेली गती हा दोन गतींचा परिणाम असतो.

आयझॅक न्यूटन (१६४३-१७२७)

गॅलिलिओने गतीला गणितबद्ध केले. गॅलिलिओच्या योगदानाचे इंग्लंडच्या आयझ्ॉक न्यूटनने विश्लेषण केलेच, परंतु त्याचबरोबर त्याने आपल्या अत्युच्च प्रतिभेद्वारे सर्व गतिशास्त्राचीच मूलभूत आणि सर्वंकष स्वरूपात मांडणी केली. गॅलिलिओने आपल्या संशोधनात, फेकलेल्या वस्तूला मिळणाऱ्या गतीचा विचार केला होता. फेकलेल्या वस्तूला मिळालेली गती हा दोन गतींचा परिणाम असतो. यातली एक गती म्हणजे वस्तू ज्या दिशेला फेकली त्या दिशेने असणारी स्थिर आणि सरळ गती; दुसरी गती म्हणजे जमिनीच्या दिशेला असलेली वाढती गती. न्यूटनने या दोन्ही गतींचे अत्यंत मुद्देसूद आणि सविस्तर विश्लेषण केले.
न्यूटनच्या निष्कर्षांनुसार, एखाद्या वस्तूवर जोपर्यंत बलाचा वापर होत नाही, तोपर्यंत तिच्या गतीत कोणताही बदल होत नाही. गतीत बदल होऊ देण्यास विरोध करणाऱ्या या गुणधर्माला वस्तूचे जडत्व म्हटले जाते. वस्तूच्या गतीत जितका जास्त बदल करायचा आहे, तितके लागणारे बलही अधिक असते. तसेच जास्त वस्तुमान असणाऱ्या वस्तूच्या गतीत बदल करायला लागणारे बलही अधिक. न्यूटनच्या या निष्कर्षांनी अ‍ॅरिस्टोटलच्या तत्त्वज्ञानावर अखेरचा घाव घातला. अ‍ॅरिस्टोटलच्या मते वस्तू गतीत ठेवण्यासाठी बलाची आवश्यकता असते, तर न्यूटनच्या मते गतीत बदल करायचा असला तरच बलाची आवश्यकता असते. बल हे गतीतील बदलाला कारणीभूत ठरत असल्याने, जोपर्यंत बल कार्यरत असते तोपर्यंत वस्तूची गती वाढतच जाते.
वस्तू जेव्हा खाली पडत असते, तेव्हा तिची गती वाढत जाते. याचा अर्थ कोणते तरी बल त्या वस्तूवर कार्यरत असते. न्यूटनच्या संकल्पनेनुसार हे बल म्हणजेच गुरुत्वाकर्षण. कोणत्याही दोन वस्तू या गुरुत्वाकर्षणाच्या बलाद्वारे एकमेकांना खेचत असतात.
हे गुरुत्वाकर्षणच झाडावरील संफरचंद खाली पाडते, समुद्राला भरती आणते आणि चंद्रालाही पृथ्वीभोवती फिरत ठेवते! एकमेकांना खेचणाऱ्या वस्तूंचे वस्तुमान जितके अधिक, तितके त्यांच्यातील गुरुत्वाकर्षणाचे बल अधिक तीव्र असते. तसेच दोन वस्तूंमधील अंतर कमी असले, तरी त्यांच्यातील गुरुत्वाकर्षणाचे बल अधिक तीव्र असते. याच बलाच्या प्रभावामुळे वस्तू जमिनीकडे वाढत्या गतीने ओढल्या जातात. त्या वेळी पृथ्वीसुद्धा या वस्तूंकडे ओढली जात असते. मात्र पृथ्वीचे वस्तुमान हे या वस्तूंच्या वस्तुमानाच्या तुलनेत प्रचंड आहे. त्यामुळे तिचे ओढले जाणे हे नगण्य ठरते.
– डॉ. राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org
First Published on January 30, 2019 12:02 am
Web Title: article about newton laws of motion

No comments:

Post a Comment