Monday, December 17, 2018

कलेचा करिअररंग : डिझाइनमधील शिक्षण आणि कला व्यवसायाभिमुखता हे नीफ्टच्या मास्टर ऑफ डिझाइन (MDES) या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सचे प्रमुख सूत्र आहे.

कलेचा करिअररंग : डिझाइनमधील  शिक्षण आणि कला

व्यवसायाभिमुखता हे नीफ्टच्या मास्टर ऑफ डिझाइन (MDES) या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सचे प्रमुख सूत्र आहे.


नितीन कुलकर्णी
भारतात आपण दृश्यकलेचा अभ्यास बीएफए (BFA) या पदवी अभ्यासक्रमात केला तेव्हा त्यात व्यवसायाभिमुखतेचा भाग किती होता? असा प्रश्न विचारला तर उत्तर देणे अडचणीचे ठरेल. म्हणजे ललित कला शाखेत चित्र व शिल्प विभागात अजिबातच नव्हता, उपयोजित कला ( जाहिरात कला) व क्राफ्ट यामध्ये नावाला का होईना होता पण प्रत्यक्ष इंडस्ट्रीत काम करायला गेल्यावर आपल्याला नव्याने सर्व शिकावे लागले. (कारण ललित कलेच्या अनेक स्नातकांनी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये उपजीविकेचे साधन शोधलेले दिसते.)
मग कलाशिक्षणाने महत्त्वाचे असे काय दिले? एक म्हणजे दृश्यनिर्मितीचे तंत्र अवगत करवले. दुसरे म्हणजे संकल्पना कशी विकसित करायची व कलावस्तूपर्यंत तडीस कशी न्यायची याचे ज्ञान अवगत करवले. या ज्ञानात सृजनशीलतेचा अंतर्भाव होता. म्हणजे बघण्यापासून-जाणवण्याची बोधनाची शक्यता, कल्पनेपासून-संकल्पनेचा विकास आणि संकल्पनेबरहुकूम कलावस्तूची सिद्धता हे टप्पे त्यात होते. या सगळ्यांतून तयार झालेली कलावस्तू वेगवेगळ्या बाजारांमध्ये विकायची कशी हे मात्र अभावानेच शिकवले गेले.
व्यवसायाभिमुखता हे नीफ्टच्या मास्टर ऑफ डिझाइन (MDES) या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सचे प्रमुख सूत्र आहे. अर्थात तुमचे दृश्य संकल्पना विकसित करण्याचे ज्ञान व सृजनशीलता अर्थात Creativity यांना इथे नवीन परिमाण प्राप्त होणारे आहे. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम आंतरशाखाप्रधान आहे आणि कला व डिझाइनबाह्य़ इतर कुठल्याही शाखेचे स्नातक विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकतात, त्यामुळे एकाच गोष्टीचा अनेक दृष्टिकोनातून विचार करणे सोपे होते. बरेचसे प्रोजेक्ट्स ग्रुपमध्ये करायचे असतात, याचा उपयोग समग्र ज्ञानासाठी होतो. डिझाइन आणि क्रिएटीव्हिटीचा चौकटीबद्ध विचार करता येत नाही. साधारणत: डिझाइनचा उल्लेख आपण आकर्षक आकार किंवा वस्तूचे रूप याअर्थी करतो. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये डिझायनर हे पदही सुरुवातीला तयार झाले ते त्या उत्पादनाला वेगळी आणि आकर्षक ओळख देण्यासाठीच. आज २१व्या शतकाच्या पूर्वार्धात डिझाइनची पाश्र्वभूमी बदलली आहे. वस्तूच्या डिझाइनमधील वेगळेपण केवळ बाह्य़ पातळीवरचे नसून गुणात्मक पातळीवर असण्याची गरज सध्या आहे.
नीफ्टमध्ये विद्यार्थी स्वत:चा अभ्यासक्रम कस्टमाइज करू शकतात. त्यासाठी प्रत्येकाला मेंटॉरसुद्धा नेमला जातो. कला आणि डिझाइनचे मूर्त रूप जाणणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. ती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवर कार्यान्वित होत असते. – १)मनातील प्रतिमेचे अप्रकट रूप, २) मनातील चित्राचे प्रकट रूप, ३) संकल्पनेचे अंतिम रूप आणि ४)प्रत्यक्ष प्रतिकृती किंवा त्रिमितीय आकृती. या चारपैकी एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये विद्यार्थी पारंगत असू शकतात. त्याचा उपयोग अभ्यासक्रमात होऊ शकतो. बाऊहाऊसच्या (जर्मनीमध्ये २०व्या शतकात उदयाला आलेली पहिली डिझाइनची शिक्षण प्रणाली) शिक्षण प्रणालीमध्ये कला आणि उद्योगाचा, संवेदनांचा आणि सृजनाचा मेळ साधलेला होता. नीफ्टच्या अभ्यासक्रमातही याचा विचार केला गेलेला आहे.
मास्टर ऑफ डिझाइनमध्ये
१)  डिझाइन थिंकिंग अँड इनोव्हेशन
२)  डिझाइन रिसर्च
३)  व्हिज्युअल कल्चर व ट्रेंड्स रिसर्च  फोरकास्ट
४)  सस्टेनिबीलिटी अँड क्राफ्ट स्टडिज
हे चारही विषय सर्व विद्यार्थ्यांना शिकावे लागतात. तसेच ४ डिपनिंग स्पेशलायझेशनमधून कोणत्याही एकाची निवड करावी लागते. त्यात प्रत्येकी ३ विषय असतात, जे व्यवसायाभिमुख असतात. यामध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीच्या सहकार्याने एक प्रकल्प पूर्ण करायचा असतो.
चार डीपिनग स्पेशलायझेशन अशा प्रकारे –
१) डिझाइन फॉर सोसायटी
२) एक्स्पिरीअन्स डिझाइन
३) डिझाइन स्ट्रॅटेजी,
४)थिअरॉटिकल स्टडिज इन डिझाइन.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या डिझाइन्स आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कामाची संधी विद्यार्थ्यांला मिळते. उदा. Design researchers, UIUX design, experiences designers, design strategist, sustainability manager, innovation manager or innovator, entrepreneur, craft designer, trend forecaster, exhibition designer, set designer व इतर अनेक.
दृश्यकलेच्या पदवीनंतर वेगळा मार्ग चोखाळायचा असेल तसेच त्यासाठी आपल्या नेहमीच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याची तयारी असेल तर नीफ्टच्या MDES – Design Space ची निवड एक चांगला पर्याय ठरू शकेल.
लेखक नॅशनल इन्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, मुंबईह्ण या संस्थेतील मास्टर ऑफ डिझाइन, डिझाइन स्पेसह्ण या  विभागाचे प्रमुख आहेत.
nitindrak@gmail.com
First Published on October 20, 2018 3:19 am
Web Title: article about design and art in design

No comments:

Post a Comment