Tuesday, December 11, 2018

करिअर वार्ता : परीक्षा हवी की नको? पिसा म्हणजे ‘प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ या चाचणीत २०१० मध्ये सिंगापूरने आपले वर्चस्व दाखवले.

करिअर वार्ता : परीक्षा हवी की नको?

पिसा म्हणजे ‘प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ या चाचणीत २०१० मध्ये सिंगापूरने आपले वर्चस्व दाखवले.


सिंगापूरला शालेय शिक्षणातील एक आघाडीचा देश मानले जाते. पिसा म्हणजे ‘प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ या चाचणीत २०१० मध्ये सिंगापूरने आपले वर्चस्व दाखवले. आपल्या मुलांना ही चाचणी देता यावी यासाठी सध्या आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पिसाचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर सिंगापूरच्या शिक्षण पद्धतीचा बोलबाला सुरू झाला. त्यानंतर तेथील चुणचुणीत, हुशार बालकांच्या सामान्यज्ञान, गणिती ज्ञानाची चुणूक दाखवणाऱ्या ध्वनिचित्रफिती, सिंगापूरच्या पाचवी, सहावीच्या वर्गासाठी असलेल्या परीक्षेतील गणिते अशा अनेक गोष्टींनी समाजमाध्यमांवर फेर धरला. आपल्याकडेही सिंगापूरसारखी ही पद्धती राबवण्याची चर्चा, दावे सातत्याने मात्र सोयीस्करपणे होत असतात. त्यासाठी तेथील शाळांना सुट्टी असताना अधिकारी सिंगापूरचा दौराही करून येतात. जो शिक्षण हक्क कायदा आपल्याकडे २००९ मध्ये अमलात आला तो कायदा २००३ मध्येच सिंगापूरमध्ये लागू झाला. त्यानुसार तेथील प्राथमिक वर्गातील मुलांना मोफत शिक्षण दिले जाते.
तर.. शिक्षणात अनेक वेगवेगळे प्रयोग करून जगाचे लक्ष वेधणाऱ्या सिंगापूरने नुकताच एक निर्णय घेतलाय, तो म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील परीक्षा, इयत्ता, चाचण्या हे सगळे बासनात बांधून ठेवण्याचा. सिंगापूरच्या शिक्षणमंत्र्यांनी याबद्दल नुकतीच घोषणा केली. ‘शिकणे म्हणजे स्पर्धा नाही,’ याची जाणीव मुलांना व्हावी हा या निर्णयामागील उद्देश. विद्यार्थी पुढील इयत्तेत गेला अथवा नाही हा मुद्दाच आता तेथे गौण होणार आहे.
शाळेच्या प्रगतिपुस्तकात यापुढे किमान आणि कमाल गुण, उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाल्याचा उल्लेख, विषयांच्या श्रेणी अशा कशाचाही उल्लेख प्रगतिपुस्तकांवर असणार नाही. पहिली आणि दुसरीसाठी साचेबद्ध परीक्षाही असणार नाहीत. मात्र परीक्षा नाहीत म्हणजे अभ्यास नाही असा काही तेथील नूर नाही. परीक्षा नसल्या तरी गृहपाठ, उपक्रम, समूहचर्चा, प्रश्नमंजूषा, खेळ या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. ती जबाबदारी शिक्षकांची असणार आहे. मात्र हे मूल्यमापन क्रमांक, गुण अशा परिभाषेत असणार नाही. जेणेकरून परीक्षा आणि स्पर्धेमुळे येणारा ताण, तुलनेमुळे येणारी निराशा या सगळ्यातून मुलांची सुटका होईल. त्याचप्रमाणे शिक्षक-पालकांच्या बैठकीत पालकांना दर महिन्याला मुलांच्या प्रगतीची माहिती देण्यात येईल. प्रगतिपुस्तकात गुण नसले तरी मुलांच्यातील बलस्थाने, कमतरता कळाव्यात, ती नेमकी कोणत्या पातळीवर आहेत, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास किती झाला आहे हे कळावे यासाठी प्रगतिपुस्तकात काही वेगळे रकाने तयार करण्यात येणार आहेत. आपल्याकडे मात्र शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घ्याव्यात की नाही या मुद्दय़ावर सुरू झालेली शिक्षण विभागाची परीक्षा अद्यापही संपलेली नाही. उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर खाडाखोड करत कच्चे काम केले जाते, तसे कच्चे काम करत करत परीक्षेवर उत्तर शोधण्यासाठी दरवर्षी नवे नवे प्रयोग सुरू आहेत.
संकलन – रसिका मुळ्ये
First Published on October 20, 2018 3:15 am
Web Title: article about career talks 2

No comments:

Post a Comment