Monday, December 10, 2018

कलेचा करिअररंग : फाइन आर्ट ते डिझाइन कला (art), हस्तकला (craft) आणि सुयोजन (design) या वस्तुनिर्मितीच्या तिन्ही क्षेत्रांत एक अतूट नातं आहे.

कलेचा करिअररंग : फाइन आर्ट ते डिझाइन

कला (art), हस्तकला (craft) आणि सुयोजन (design) या वस्तुनिर्मितीच्या तिन्ही क्षेत्रांत एक अतूट नातं आहे.


महेंद्र दामले
ज्या विषयात पदवी घ्यायची त्याच विषयात पदव्युत्तर पदवीसुद्धा घ्यायची असा एक सर्वसाधारण प्रघात असतो. चित्रकलेत मात्र तसे नाही. फाइन आर्टची पदवी घेतल्यानंतर तुम्ही सरधोपट पद्धतीने न जाता, पदव्युत्तर पदवी डिझाइनमध्येसुद्धा घेऊ शकता. याच विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत.
मुळात आपण चित्रकलेतील शिक्षण घेण्याचा निर्णय कसा घेतला याकडे पाहू. फाइन आर्टला जाताना कुणाला चित्रकार, शिल्पकार व्हायचे होते. कुणाला चित्रकला हा एकच विषय आवडत होता. बाकीचे नावडते विषय होते म्हणून, कुणाला वेगळा मार्ग चोखाळायचा म्हणून. अशा विविध कारणांनी विद्यार्थी या शाखेकडे वळतात. या शक्यतांमधून आपण कलेकडे कसे पाहतो, ते स्पष्ट होते. तसेच आपल्या समाजात कला शिकण्याच्या कोणत्या संधी, शाखा उपलब्ध होत्या तेही दिसून येते. ज्यांना दृश्यकला ही केवळ भाषा किंवा अभिव्यक्ती म्हणून स्वीकारायची आहे ते, फाइन आर्ट्स, अप्लाइड आर्ट्स, आर्ट अँड क्राफ्ट आणि जाहिरात कलेकडे वळतात. कलेसाठी आपल्याकडे पारंपरिकपणे कला, कुसर, कौशल्य हे शब्द वापरले जातात. यातील कला म्हणजे समाज व संस्कृतीच्या कक्षेत केलेली कलानिर्मिती, कुसर म्हणजे तंत्रप्रधान कलावस्तुनिर्मिती आणि कौशल्य म्हणजे व्यापारउदिमासाठी लागणारे कल्पक नियोजनाचे सूत्र.
कला (art), हस्तकला (craft) आणि सुयोजन (design) या वस्तुनिर्मितीच्या तिन्ही क्षेत्रांत एक अतूट नातं आहे. कलेचे मूळ प्रयोजन सौंदर्यवस्तूच्या निर्मितीद्वारे सौंदर्याचा अनुभव देणे. हस्तकलेचे मूळ प्रयोजन आहे, नित्योपयोगी व सुशोभीकरणाच्या वस्तुनिर्मितीची परंपरा प्रवाही ठेवणे. तर सुयोजनाचे मूळ प्रयोजन आहे, यंत्रयुगात वस्तुनिर्मितीचे तंत्र व विक्रीव्यवस्था सुगम करणे.
आजवर फाइन आर्ट्सकडे फक्त अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून पाहिलं गेलं. त्यामागील संवेदनशीलतेचं योजन दुसऱ्या कोणत्या निर्मितीमध्ये होऊ शकते का, हे पाहिलं जातं. खरंतर फाइन आर्टचे शिक्षण ज्या संवेदनशीलतेची, कलाभाषेची जाणीव देते ती डिझाइन या क्षेत्राच्या शिक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत असणे गरजेचे असते. याच कारणाने कदाचित डिझाइनचे शिक्षण देणाऱ्या पहिल्यावहिल्या संस्थेत आधुनिक चित्रकलेत नावाजले गेलेले चित्रकारच शिक्षक म्हणून नेमले गेले होते. हे सगळे झाले ‘बाऊहाउस’मध्ये (१९१९ वायमार, जर्मनी ) ‘बाऊहाउस म्हणजे बांधणीचे घर. वॉल्टर ग्रुपीयस याने पुढाकार घेऊन कला आणि हस्तकला यांचा आधुनिक यंत्रयुगातील वस्तुनिर्मितीच्या तंत्रज्ञानाशी संगम घडवून आणला. यातूनच पुढे इंडस्ट्रिअल डिझाइन या क्षेत्राची महूर्तमेढ रोवली गेली. तसेच मशिन अ‍ॅस्थेटिक्ससारखी संज्ञाही रूढ झाली. या ठिकाणी शिक्षणाचा पाया सापेक्षतावाद हा होता. ज्याचाच अर्थ म्हणून सिद्धांतांना अवास्तव महत्त्व न देता प्रत्यक्ष करण्याची रीत व अनुभवावर लक्ष केंद्रित केले होते. याच ठिकाणी पहिल्यांदा मशीन निर्मितीच्या शक्यता व मर्यादा लक्षात घेऊन सौंदर्यपूर्णता व उपयोगिता यांचा समन्वय साधला गेला. अभियांत्रिकी, कला व हस्तकला या तिन्ही प्रणालींच्या मिलाफाने एक प्रणाली तयार करायची होती. या निर्मितीच्या केंद्रस्थानी होते, स्थापत्य. त्याचीच निर्मिती करण्यासाठी नव्या संकल्पनांची गरज होती. ज्यातून तयार झालेली ‘डिझाइन संस्कृती’ पुढे साऱ्या जगाने अंगीकारली. यामुळेच फाइन आर्ट, क्राफ्ट आणि डिझाइन या तिन्हीची शिक्षण क्षेत्रात एक साखळी तयार झाली. ज्याच्या केंद्रस्थानी होती, सर्जनशीलता.
एकाच वेळी, विशिष्ट शाखेचं शिक्षण घेतना त्यातील विचार पद्धती ही तिन्ही शाखांचा समग्र विचार करायला शिकवणारी. म्हणूनच वेगळ्या विषयात पदव्युत्तर पदवी घेण्याचा विचार हा रास्त ठरतो.
तरीही आज डिझाइनच्या क्षेत्रात कलाशाखेतील फारसे विद्यार्थी नाहीत. तंत्रविषयक व तंत्रविचार शिकवणारे विषय विभक्त आहेत. शिकवण्याची पद्धतही समग्र नाही. म्हणूनच कलावृत्तीच्या लोकांनीच वस्तुनिर्मितीच्या अर्थात डिझाइनच्या प्रक्रियेत उतरले पाहिजे. त्याचसाठी डिझाइन विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे गरजेचे आहे. एनआयएफटी अर्थात ठकाळ या संस्थेत मास्टर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम चालवला जातो.
मास्टर इन डिझाइन
एक्सपिरियन्स डिझाइन, डिझाइन स्ट्रॅटेजी, डिझाइन फॉर पीपल आणि थिअरॉटिकल स्टडीज इन डिझाइन या विशेष अभ्यासाच्या शाखा आहेत.
कालावधी- दोन वर्षे
अर्हता – पदवी उत्तीर्ण. प्रवेशपरीक्षा द्यावी लागते.
हा अभ्यासक्रम दिल्ली, बंगळूरु, मुंबई व कन्नूर येथील NIFTच्या केंद्रांमध्ये उपलब्ध आहे.
First Published on October 6, 2018 3:49 am
Web Title: article about fine art to designed

No comments:

Post a Comment