Monday, December 31, 2018

शब्दबोध नुकत्याच झालेल्या कोजागरीला (हो कोजागरीच. गिरी नव्हे.) अनेक घरांत हे गाणं ऐकू आलं असेल.

शब्दबोध

नुकत्याच झालेल्या कोजागरीला (हो कोजागरीच. गिरी नव्हे.) अनेक घरांत हे गाणं ऐकू आलं असेल.

डॉ. अमृता इंदुरकर
बत्ता
अडकीत जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होता बत्ता
भुलोजीला लेक झाला
नाव ठेवा दत्ता.
नुकत्याच झालेल्या कोजागरीला (हो कोजागरीच. गिरी नव्हे.) अनेक घरांत हे गाणं ऐकू आलं असेल. घरांमधून खिडकीत ठेवलेल्या बत्त्याला बघून भुलोजीच्या लेकाचे दत्ता हे नाव ठेवून भुलाबाईच्या गाण्यांची सांगता झाली असेल. केवळ भुलाबाईच्या गाण्यामध्येच हा बत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो असे नाही तर आजही मराठी घराघरांमधील स्वयंपाकघरात मोठय़ा ऐटीत हा ‘बत्ता’ विराजमान असतो. पार स्वयंपाकघरापासून ते लोकगीतांपर्यंत स्वैर संचार करणारा हा ‘बत्ता’ शब्द कुठून आला असेल? बत्ता म्हणजे कुटण्याचे अथवा खलण्याचे असे एक दगडी, लोखंडी साधन. या शब्दाच्या मूळ उत्पत्तीबद्दल दोन मते आहेत. मराठी शब्दकोश नोंदीनुसार एक मत असे आहे की बत्ता हा मूळ प्राकृतमधून आलेला शब्द आहे. तर दुसरे मत असे आहे की बत्ता हा शब्द मूळ फारसीतून आला आहे. कारण फारसीमध्येही हाच अर्थ आहे. याला दस्ता असेही म्हणतात.
बडदास्त
‘लग्नात वरपक्षाकडील पाहुण्यांची काय बडदास्त ठेवली होती!’ लग्न समारंभात हमखास ऐकू येणारे हे वाक्य. बडदास्त म्हणजे पाहुणचार, उत्तम आदरातिथ्य हा अर्थ सर्वश्रुतच आहे. पण बडदास्त हा शब्द मूळ फारसी ‘बर्दास्त/ बर्दाश्त्’मधून तयार झाला आहे. पण बर्दाश्त म्हटले की कुणालाही हाच प्रश्न पडेल की हा शब्द तर सहन करणे यासाठी वापरतात मग बडदास्तशी काय संबंध? हिंदीत ‘कितना बर्दाश्त किया मैंने आजतक’ असे वाक्य नेहमीचेच आहे. पण फारसीमध्ये बर्दास्तचे अर्थ मेहमानी म्हणजेच पाहुणचार, व्यवस्था, शुश्रूषा करणे, सहन करणे इतके आहेत. ऐतिहासिक लेखसंग्रहात ‘तूर्त जखमांची वगैरे बर्दास्त होत आहे’ असा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ शुश्रूषा करणे या अर्थछटेवर बेतलेला आहे. याच बर्दास्तवरूनच कालांतराने मराठीत त्यामधील ‘र’चा लोप झाला आणि त्याची जागा ‘ड’ ने घेतली आणि ‘बडदास्त’ हे रूप तयार झाले जे आजही वापरात आहे.
amrutaind79@gmail.com
First Published on October 27, 2018 2:47 am
Web Title: article about vocabulary word

No comments:

Post a Comment